You are currently viewing भुईबावडा घाटरस्ता ७ मे पूर्वी दुरूस्ती करा, अन्यथा बेमुदत उपोषण – किरण विचारे

भुईबावडा घाटरस्ता ७ मे पूर्वी दुरूस्ती करा, अन्यथा बेमुदत उपोषण – किरण विचारे

वैभववाडी तहसिलदारांना निवेदनाद्वारे इशारा…

वैभववाडी

गतवर्षी मुसळधार झालेल्या पावसाने भुईबावडा घाटरस्ता मोठ्या प्रमाणात खचला आहे. रस्त्याच्या मध्यभागी मोठमोठया भेगा पडल्याने या मार्गावरील वाहतूक काही दिवस बंद करण्यात आली होती. याठिकाणी पर्यायी मार्ग काढण्यात आला आहे. मात्र दुसरा पावसाळा आला तरी घाटरस्त्याचे अद्यापही काम करण्यात आलेली नाही. तरी ७ मे पूर्वी घाट रस्ता दुरूस्ती न झाल्यास ११ मे रोजी भुईबावडा, ऐनारी पंचक्रोशीतील ग्रामस्थांना घेऊन घाटरस्त्यात बेमुदत उपोषण करणार असल्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते किरण विचारे यांनी वैभववाडी तहसिलदार यांना निवेदनाव्दारे दिला आहे.

गतवर्षी झालेल्या मुसळधार पावसाने भुईबावडा घाटरस्ता मोठ्या प्रमाणात खचला होता. याठिकाणी पर्यायी मार्ग काढून वाहतूक सुरू करण्यात आली आहे. मात्र अवजड वाहतूक करण्यास हा मार्ग धोकादायक बनला आहे. करुळ घाटरस्त्याला पर्यायी मार्ग म्हणून भुईबावडा घाटमार्गाची ओळख आहे. मात्र या घाट रस्त्याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. तसेच एसटी वाहतूक पूर्ववत झाली असून खचलेल्या घाटरस्त्याचे कारण सांगून एसटी प्रशासन यामार्गावरून एसटी बस सोडण्यात नकार दर्शवित आहे.

त्यामुळे गेली दोन वर्षापासून दशक्रोशीतील जनतेचे हाल होत आहे. तरी तात्काळ घाट रस्त्याची दुरूस्ती करावी अन्यथा दि. ११ मे रोजी पंचक्रोशीतील ग्रामस्थांना घेऊन भुईबावडा घाटरस्त्यात बेमुदत उपोषण करणार असल्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते किरण विचारे यांनी वैभववाडी तहसिलदार यांना निवेदनाव्दारे दिला आहे. निवेदन देताना माजी शिवसेना उपतालुका प्रमुख जनार्दन विचारे, चंद्रकांत विचारे, धकटू जाधव, रमेश मांडवकर, प्रकाश गुरव आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा