You are currently viewing सुगंधीत ओंजळ

सुगंधीत ओंजळ

जागतिक साहित्य कला व्यक्तिमत्व विकास मंच…. लालित्य नक्षत्रवेल समूह सदस्य लेखक कवी दीपक पटेकर यांचा अप्रतिम ललीतलेख

*सुगंध जाई जुईचा*
*नसानसात भिनला*
*श्वेतवर्ण फुलांच्या*
*रंगात जीव रंगला*

नाजूक हिरव्या फांदीवर श्वेतवर्णीय नाजूक जाई जुई फुलली….जाई जुईचा मंद सुगंध नसानसात भिनला… जणू शिंपित चांदणे चंद्रमा नभांच्या आड दडला…चांदोबाने चांदणे शिंपावे तशी जाई जुई फांदीवर फुलुनी आली… वेलींची पानेही फुलांच्या आड लपली.. बहरलेली जाई जुई…मी नाजूक बोटांनी तोडली…खरंच तोडताना नकोशी वाटली गं…! पण चांदणे तुझ्या माथी सजलेलं पाहणे म्हणजे अवर्णनीय…!
आठवतो का गं तुला तो जाईचा गजरा…?
आपल्या पहिल्या भेटीत…तू लाजत लाजत भेटावयास आलेलीस…मला पाहताच लाजेने मान खाली घालुन बसलीस.. अन्..तुझ्या गालांवर गुलाबी लाली चढली होती….अगदी आमच्या दारासमोरच्या गुलाबाच्या गुलाबी फुलांसारखीच…तुझे गोबरे गुलाबी गाल त्या गुलाबांसारखेच गोलमटोल झाले होते…नजर झुककेली होती तरीही….नजरेतून प्रेम ओसंडून वाहत होतं…. निर्झरातून वाहणाऱ्या निर्मळ पाण्यासारखे…. नकळत मी तुझा हात हाती घेतला…माझ्या स्पर्शाने…तू बावरलीस…शहारलीस…अंग अंग मोहरून गेलं होतं तुझं…वसंतात मोहरून येणाऱ्या बहाव्यासारखंच….हळद लागलेल्या नवरीसारखा बहावा सुद्धा लाजून पिवळा धम्मक झाला होता…अगदी तशीच तू सुद्धा लाजून चूर झाली होतीस… अन्…मी तुझ्या हाती जाईचा गजरा दिला होता…तुझ्या गालावर स्मित हास्य उमटले अन्….चित्रात कोरतात तशीच सुंदर खळी गालावर खुलली….त्या जाईच्या मोहक सुगंधाने तू सुद्धा गंधाळली होतीस…डोळे मिटून जाईचा सुगंध नसानसात शोषून घेत होतीस…डोळे मिटलेल्या त्या चंद्रासम गोल चेहऱ्यात मी मात्र स्वतःलाच हरवून बसलो होतो….फुलांवर भाळणाऱ्या भुंग्यासारखाच…!
आजचा दिवसही माझ्यासाठी अगदीच खासच आहे….हा तोच दिवस आहे आपल्या पहिल्या भेटीचा….आजही तुझ्यासाठी बागेतील जाईची शुभ्रधवल अगदी तुझ्यासारखीच नाजूक फुलं तोडून आणलीत मी, माझ्या ओंजळीतून…. तुझ्या ओंजळीत देण्यासाठी…आज पुन्हा एकदा पहायचं आहे मला तू त्या जाईच्या सुगंधाने मोहित झालेली…गंधाळलेली….सुगंधी फुले साथ सुटल्यावरही आपला सुगंध आठवणी म्हणून सोडून जातात म्हणे….जाईच्या फुलांनी माझ्या ओंजळीत सांडलेल्या सुगंधाने तुझ्या बाहुस स्पर्श करताच त्या सुगंधाच्या ओढीने माझ्या हातांवर नकळत टेकवलेले तुझे गुलाबी गाल…. अन्…माझ्या बाहुपाशात अलगद विसावलेली तू…..म्हणजे…सागर किनाऱ्याच्या बाहुपाशात लाटांनी संथपणे विसावत जावं अन् किनाऱ्याशी एकरूप व्हावं …तसंच….दिसत होतं ते प्रणयदृश्य….!
जाईच्या फुलांनी भरलेली ओंजळ जेव्हा तू तुझ्या चेहऱ्याकडे नेलीस तेव्हा भासत होती मज….तू पौर्णिमेला चांदण्यांनी भरलेल्या आभाळासारखीच….चंद्रासारखा तुझा मुखडा खुलून गेला होता जाईच्या नाजूक शुभ्र फुलांनी….तू परिधान केलेल्या पांढऱ्या शुभ्र वस्त्रात…. भासत होतीस स्वर्गातील रंभा…मेनका… अप्सराच जणू…*ये चांद सा मुखडा…चेहरा तेरा… दिल में से दिल ले गया मेरा*… अन्…मी स्वतःला हरवून घेतलं होतं तुझ्या अवर्णनीय सौंदर्यात….. श्र्वासांनाही चोरणाऱ्या त्या जाईच्या सुगंधी मोहक फुलांत…!!!

©(दीपि)
दीपक पटेकर, सावंतवाडी
८४४६७४३१९६

प्रतिक्रिया व्यक्त करा

20 + six =