You are currently viewing स्वर्ग नक्की कुठे आहे …

स्वर्ग नक्की कुठे आहे …

जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त लेखिका कवयित्री प्राध्यापिका सौ सुमती पवार यांचा अप्रतिम लेख

“तुझ्या डोळ्यात मला स्वर्ग दिसतो…”
प्रेमात पडलेला तरूण प्रेयसीला वारंवार सांगतो…
“मला तुझ्या मिठीत मला स्वर्ग दिसतो” …
खरंच किती खऱ्या आहेत या भावना..! अक्षरश: शंभर
टक्के सत्य आहेत या भावना !अहो, स्वर्ग म्हणजे काय ?
स्वर्ग म्हणजे सुखकारकता, सौख्य, आनंद, आनंदाची परिसामा,अल्हाददायक व सुरक्षित वातावरण, प्रेमाची परिपूर्ती,डोळ्यांना व मनाला तृप्त करणारे वातावरण इ.इ.
म्हणजे स्वर्ग.. हो ना?

एखादा तरूण किंवा तरूणी जेव्हा प्रथम दर्शनातच प्रेमात
पडतात, व ज्या नजरेने व आतुरतेने एकमेकांकडे पाहतात
ते जे थोडेसे क्षण आहेत ते त्यांना स्वर्ग सुख देतात. बघा,
गेले का ते काश्मिरच्या चिनार वृक्षांच्या खाली ? नाही ..
कारणच नाही … ते स्वर्ग सुख त्यांना एकमेकांच्या सहवासाने
मिळते.वृक्षांच्या नव्हे, आता जोडीला चिनार असतील तर
उत्तमच ! पण ते चिनारा कडे बघतच नाहीत. ते एकमेकांत
बघतात, त्यांना एकमेकात बघण्यात सुख आहे.कारण ते
दोघे एकमेकांना आवडतात. इथे हे आवडणे ही फार महत्वाचे
आहे. न आवडणाऱ्या व्यक्तीबरोबर कसले आले सुख ?

 

म्हणजे पहा, आपल्याला प्रिय असलेल्या व्यक्तिच्या सहवासात आपल्याला सुख आहे, त्याला तुम्ही स्वर्गसुख
म्हणा किंवा आणखी काही म्हणा..
मग हे सुख फक्त प्रियकराच्या मिठीत आहे का ? नाही अजून
ते खूप गोष्टीं मध्ये आहे. ४/५ वर्षांची मुलगी जेव्हा आईला प्रेमाने मिठी मारते ते मग काय असते ? एखादा बाप जेव्हा जत्रेत पोराला जत्रा नीट दिसावी म्हणून खांद्यावर घेऊन फिरवतो ते काय असते ? कष्टकरी आई लुगड्याची झोळी
करून बाळाला त्यात टाकून काम करते ते त्या बाळासाठी
काय असते? म्हाताऱ्या आई वडिलांना जवळ फारशी पुंजी
नसतांना एखादा मुलगा जेव्हा त्यांना काशी यात्रा घडवतो ते
त्या आई बापांसाठी काय असते? रात्री सगळी कामे आटोपून
पत्नी जेव्हा अत्यंत विश्वासाने पतीच्या कुशित विसावते ते
काय असते?

 

आई जेव्हा पदराखाली घेऊन बाळाला दूध पाजते ते काय
असते? खूप दिवसांनी माहेरपणाला आलेली मुलगी आईच्या
कुशित शिरते ते काय असते ? लहान लहान भाऊ बहिणी
भाऊबीजेला अत्यंत प्रेमाने ओवाळतात तेव्हा त्यांच्या नजरेतले
भाव काय सांगतात ? मंडळी हे सगळे प्रसंग एव्हाना तुमच्या
नजरेसमोरून तरळून गेले गेले असतीलंच.. बघा,नुसती उजळणी केली तरी अंगावर रोमांच फुलले मग हे सारे प्रसंग
तर आपण रोज अनुभवतो ना? मग हेच स्वर्गसुख नव्हे काय?

 

एक काम करा ..तुम्ही एकटेच काश्मिरला जा. आणि बसा
चिनारच्या झाडाखाली ? गुलमर्ग सोनमर्गला जाऊन एकटे
बर्फावर बसा .. अहो, तुम्ही म्हणाल , वेड लागलंय का मॅम
तुम्हाला? अहो, तेच सांगण्याचा प्रयत्न मी करतेय् ना?
तुमचे सुख तुमच्या प्रिय व्यक्तिंमध्ये आहे मग जोडीला निसर्ग
आहे, संगित आहे, कला आहेत पण मुख्य तुमची आपली माणसे आहेत लक्षात ठेवा.किती ही महागडा महाल दिला पण
तुमची प्रिय माणसे नसतील तर तो महाल तुम्हाला गोड वाटणार नाही, उलट झोपडीत तुमची माणसे जवळ असतील
तर झोपडीचा स्वर्ग बनेल.थोडक्यात स्वर्ग बाह्य वस्तूत निसर्गात
नाही.पण निसर्गात सोबत तुमची माणसे असतील तरच तो
निसर्ग तुम्हाला आनंद देऊ शकतो.थोडक्यात काय आपल्या
घराचाच आपल्याला प्रेमाने स्वर्ग बनवता येतो हे लक्षात ठेवा.

बागा, उद्याने, काश्मिर, हॅांगकॅांग हे सारे तुमची माणसे जवळ
असतील तरच गोड वाटतील अन्यथा नाही. म्हणून स्वर्गसुख
शोधायला बाहेर हिंडू नका. आपल्या आजूबाजूला आपल्या
वर्तनाने स्वर्ग निर्माण करा. म्हणतात ना ..

“ तुझे आहे तुज पासी
पण तू जागा विसरलासी”

कस्तुरीमृग ज्या प्रमाणे बेंबीत कस्तुरी असतांना तिच्या
शोधार्थ धावत सुटतो त्या प्रमाणे आम्ही माणसे सुखाच्या
शोधात धावत सुटतो. वास्तविक तुम्हीच सुख आहात पण
तुम्ही ते पूर्णपणे विसरला आहात .
म्हणून म्हणते ,स्वर्ग नक्की कुठे आहे …
तर मंडळी .. स्वर्ग तुम्ही म्हणाल तिथे आहे..
झोपडीत आणि महालात ही आहे …
पण शेवटी..” आपली माणसे जिथे आहेत…
तोच स्वर्ग आहे ….

धन्यवाद….

आणि हो , ही फक्त माझी मते आहेत बरं…

प्रा.सौ.सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)
दि : २८ मार्च २०२२
वेळ : दुपारी १ वाजता.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा