You are currently viewing हर्ष हा मनी रहावा
  • Post category:लेख
  • Post comments:0 Comments

हर्ष हा मनी रहावा

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य लेखक, कवी दीपक पटेकर यांचा लेख*

*अंत्य ओळ लेखन*

*हर्ष हा मनी रहावा*

आयुष्याच्या पहाटेला
असतात संगे सवंगडी अनेक…
मैत्रीचा कट्टा जमल्यावर
वाटतो मौल्यवान एक एक…

खरंच रे…किती छान मैत्री जमली आपली…मित्र मैत्रिणी असतात रे…वेळ घालविण्यासाठी…कधी मौजमजा करण्यासाठी तर काही असतात केवळ …..अगदी असावेत म्हणून… नावापुरते. काहीजण असतात जीवाला जीव देणारे..सुखदुःखात सोबत राहणारे…सावलीप्रमाणे. तर काही सावली अंगावर पडू नये याचीही काळजी घेणारे.
पण आपलं तसं नाही….
आपण कधी कसे एकत्र आलो हे कदाचित आठवतही नसेल…पण गेली तीन दशके एकत्र आहोत हे ही नसे थोडके…काटेरी झाडावर चढणाऱ्या नाजूक वेलीला झाडाच्या काट्यांची भीती कधीच नसते….तर मिळणाऱ्या आधारासाठी…अन प्रेमापोटी ती वेल झाडावर उंच उंच चढते,,, फुलते,,,बहरते…फळेही देते…..आयुष्यभर काटेरी झाडाला घट्ट बिलगून असते…काटे तिला टोचतही नाहीत..अन कधी तिचा झाडाला त्रास होत नाही. ती झाडाला घट्ट मिठी मारूनही आपले कार्य करत असते अन झाड आपल्या कामात व्यस्त असते…तरीही बंधन अतूट…”फेव्हीकॉल का मजबूत जोड” असंच.. अगदी तसंच झाड अन वेलीसारखंच आहे आपलं मैत्रीचं अतूट…अभंग…नातं. या मैत्रीच्या नात्यात कटूता आली तरी आनंद कधी कमी होतच नाही…मैत्रीतला तोच आनंद….*हर्ष हा मनी रहावा* असंच नेहमी वाटत राहतं.
वारकऱ्यांचा टाळ जेव्हा टाळावर आढळतो तेव्हाच त्यातून मंजुळ ध्वनी बाहेर पडतो…तबल्यावर बोटांचा होणारा घणाघातच तबल्यातून सूर बाहेर काढतो…पेटीच्या सुरांवर चालणारी बोटे आणि ओढलेल्या भात्यांमुळे पेटीचा श्वास गुदमरत नसेल का? पेटीला भरलेल्या हवेचा त्रास होत नसेल का? …..परंतु
पेटीच्या भात्यात हवा भरल्याशिवाय पेटीच्या सुरांमधून तो मंत्रमुग्ध करणारा ताल बाहेर पडणारच नाही…
खरंच रे…
आपल्या मैत्रीतही तसंच आहे…
कोणीही चुकला…वेडावाकडा वागला की आपली शब्दरूपी बोटे त्याच्या डोक्यावर टपली मारतात…टाळ रुपी कठोर शब्दही हृदयावर घाव घालतात..तर….काहीवेळा अबोला धरून मैत्रीत खंड पडेल असा भीतीचा भाता ओढून छातीत हवा देखील भरली जाते…पण…
अखेरीस अखंड असणाऱ्या आपल्या मैत्रीत समोर आल्यावर लवलेशही नसतो त्या मारलेल्या शब्दरूपी टपलीचा…कठोर टाळांच्या घणाघाताचा अन छातीत भरलेल्या भीतीच्या हवेचा… असतो तो भेटीचा आनंद…हर्ष…मोद.

*सुखांना भेटतो सुखांना वाटतो*
*आयुष्यभर हृदयी आम्ही सुखांना आनंदाने थाटतो…*
*नसतो कधी राग ना असतो मनी द्वेष*
*क्षण क्षण आम्ही जीवनभर सुख हर्षाने लुटतो…*

आयुष्यात प्रयत्न केला तर सर्वकाही कमावता येतं… मिळवता येतं… आणि टिकवता देखील येतं..
पण मैत्री…मित्र-मैत्रिणी…ते ही जिवाभावाचे…सख्ख्याहूनही सख्ख्या नात्यांचे मिळवणे आणि कायम टिकवणे ही तर रस्त्यावर दोरी बांधून खेळ करणाऱ्यांच्या खेळापेक्षाही मोठी कसरत…
शब्दाने दुखावत नाही….सहवासाशिवाय सुखावत नाही….बोलल्याशिवाय जगत नाही अन अंतरीच्या ओढीने झालेल्या क्षणिक भेटीवर भागत नाही अशी मैत्रीचं आयुष्यात हर्ष आनंद सुख समाधान देऊ शकते…
अगदी तशीच आहे ना आपली मैत्री…
निस्सीम, निरागस…पहाटेच्या सोनेरी प्रकाशात….फुलाने हळूच फुलून यावे..दवबिंदूंनी यथेच्छ पाकळ्यांवर चमकून घ्यावे…पाखरांनी हलकेच मध शोषुनी जावे….उन्हाने तप्त प्रकाश टाकून संयम पहावे… तरीही फुलाने फुलतंच रहावे… बहरावे… सुगंधाची उधळण करत मोहरावे…तशीच आहे आपली मैत्री….
ऊन वारा पाऊस…वादळ…
कुणीही येवो…सर्वांना झेलून आनंद, हर्षाची उधळण करणारी अखंडित…अभेद्य राहणारी अनमोल मैत्री…म्हणून तर मनाच्या अंतरी सदैव वाटत राहते *हर्ष हा मनी रहावा*…..

©[दिपी]✒️
दीपक पटेकर, सावंतवाडी
सिंधुदुर्ग, ८४४६७४३१९६
२१/१२/२१

प्रतिक्रिया व्यक्त करा

5 × five =