You are currently viewing राहूनच गेले

राहूनच गेले

जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या लेखिका कवयित्री अख्तर पठाण यांची अप्रतिम काव्यरचना

अम्मी तू आम्हाला चिऊ-काऊ चा घास भरवला,
तूला जेवू घालून तृप्त करायचे राहूनच गेले …

अब्बा तुम्ही कडेवर घेतले, चालायचे शिकविले,
तुम्हाला हात धरून चालवायचे राहूनच गेले …

अम्मी तू नेहमीच आमची वेणी घालून देत असे,
पण , तुझे केस विंचरायचे राहूनच गेले …

तुम्ही आमचे बालपण , मोठेपण पाहिले ,
पण, तुम्हाला म्हातारपणी सुख द्यायचे राहूनच गेले …

अम्मी तुझ्यासवे मनातले हितगुज़ करायचे,
सुखदु:खाच्या गोष्टी बोलायचे राहूनच गेले …

तुम्ही आम्हाला सहल- प्रवासाचा जीवनानुभव दिला ,
तुम्हाला पर्यटनाचे सुख द्यायचे राहूनच गेले …

पै-पै साठवून आवडीच्या वस्तूंचा संसार मांडला ,
पण, तुम्ही त्या साऱ्यांचा उपभोग घ्यायचे राहूनच गेले …

ऊर भरून येतो, गळा दाटून येतो ,
अम्मीच्या कुशीत अन् अब्बाच्या खांद्यावर रडायचे राहूनच गेले …

तुमच्या अनुभवाने आम्हाला जगण्याचे शहाणपण शिकविले ,
आज आम्ही सक्षम आहोत, हे सांगायचे राहूनच गेले …

अब्बा अम्मी च्या स्वप्नांचे घर आज प्रत्यक्षात दिसते,
पण, त्या घरात तुमच्या सोबत राहायचे … राहूनच गेले …

 

✍🏻 *अख्तर , समिना , हसिना , जावेद* *(पठाण)*

प्रतिक्रिया व्यक्त करा

15 − 10 =