You are currently viewing काय बोलू ..? वाटे खंत …

काय बोलू ..? वाटे खंत …

जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या राष्ट्रीय पुरस्कारित ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा.सौ.सुमती पवार यांची अप्रतिम काव्यरचना

नारी शक्ती नारी नेता
तरी म्हणवते अबला तू
अवकाशी तू विरून गेली
होणार कधी ग सबला तू ….

एक दिवस ग गाती गोडवे
बंदीखाना रोज नवा
पायी शृंखला छन् छन् छननन
शृंगार रोज तो नवा हवा ….

आहे दुटप्पी नर हा मोठा
घरात नारी कुलवंत
परनारी ग ह्यांच्या साठी
काय बोलू …? वाटे खंत …

देव्हाऱ्यात हे बसविती ग
आभासाला भुलू नको
जगात चाले रोज काय ग
नजरेआड तू करू नको …

खरे बोलणे पाप ठरे ग
मुसक्या बांधून वावरती
घरोघरी ग माहित आहे
नारीची ती काय गती …?

स्वतंत्र कधी होणार बाई तू ?
दिवास्वप्न मजला वाटे
नरा सवे ग नारी सुद्धा
फोडतील ग बघ फाटे …

पायी बेड्या तुझ्या नशिबी
मला न वाटे सुटतील
जुन्या जाऊनी नव्या फारतर
बघ तू नक्की येतील ..

आशावाद हा खोटा बाळगून
लिहित नाही मी काही
झळझळीत हे अंजन तुमच्या
डोळां घालते मी बाई …

नकोच आहे पुढे जावया
हरएक पुरुषाला नारी
जरा कुठे पाऊल टाकता
कावळे टोचती अन् घारी …

सुटका व्हावी तुरूंगातुनी
जरी वाटले रोज मना
उदार आहे पुरूष कोणता ?
जरा मला हो सांगा ना …

प्रा.सौ. सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)
८ मार्च २०२२
वेळ: रात्री १० : १८

प्रतिक्रिया व्यक्त करा

15 − 8 =