You are currently viewing वालाच्या शेंगा

वालाच्या शेंगा

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य कवी श्रीनिवास गडकरी लिखित अप्रतिम काव्यरचना*

*वालाच्या शेंगा*
———————–

पहाट वेळी सचैल न्हाले वळणावरचे शेत सुगंधी
वालाच्या त्या गंधाने मग मनास आली अपार धुंदी
हिरवे हिरवे वेल पसरले जणू गालीचे मखमालीचे
आनंदाने शीळ मारती रावे कुठल्या राना मधले

धुक्यात सारे शेत बुडाले उन्हे कोवळी कुठे हरवली
इवल्या इवल्या फुलांफुलांनी इंद्रधनुष्यी सजून गेली
चमचम करती किरणे नाजुक वाऱ्यासंगे खेळ खेळती
चतुरासंगे राघू, मैना उभ्या पिकांवर भीरभीरती

कुण्या गावची नार निघाली या वाटेने बाजाराला
जडावलेले अंग तुझे अन हिरवी काकणं दो हाताला
भल्या सकाळी का घुटमळते तुज ओढ अशी का शेताची
सुगंध याचा लुटावयाला तुज साथ असे भरताराची

भरास येता सारी पिके शेतामध्ये लागे हंडी
हौसेने मग कुणी टाकितो कांदे, नारळ, वांगी अंडी
लेकी येती माहेराला, जामाताचे कधी आगमन
त्यांचासाठी बेत आखती फुलून जाई सारे अंगण

श्रीनिवास गडकरी
रोहा पेण पुणे
9130861304
केवळ नवसहितच पुढे पाठवावे
@ सर्व हक्क सुरक्षित
04.01.2023

प्रतिक्रिया व्यक्त करा