You are currently viewing नारी शक्ती डॉ.संगीता दीपक तुपकर

नारी शक्ती डॉ.संगीता दीपक तुपकर

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत….सन्मान नारी शक्तीचा..

नारी शक्ती डॉ.संगीता दीपक तुपकर

८ मार्च जागतिक महिला दिन. महिलांनी स्वतःच्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याच्या स्मरणार्थ हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो. भारताच्या इतिहासात अनेक थोर व्यक्तिमत्त्व होऊन गेली डॉ.विजयालक्ष्मी पंडित पासून इंदिरा गांधी, सिंधुताई सकपाळ पर्यंत अनेकांनी आपल्या कार्यातून आपला ठसा उमटविला आहे. प्रत्येक जिल्ह्यात तालुक्यात अनेक महिला आपल्या कार्यातून आपली वेगळी ओळख निर्माण करत असतात. सावंतवाडी शहरातील डॉ.संगीता दीपक तुपकर या देखील अशाच एक महिला आहेत, ज्यांनी आपल्या कार्यातून आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
डॉ. संगीता दीपक तुपकर या उच्चविद्याविभूषित असून त्यांनी आयुर्वेदामध्ये डॉक्टर ही पदवी संपादन केली आहे. संस्कृत मधून एम.ए., डिप्लोमा इन योगा, योग सायन्समध्ये एम.ए. तसेच फूड अँड न्यूट्रिशन मध्येही डिप्लोमा केला आहे. आपल्या योग शिक्षणाचा उपयोग त्यांनी सावंतवाडी शहरातील अनेक महिलांना योगाचे प्रशिक्षण देऊन केला आहे. गेली वीस वर्षे त्या सावंतवाडी शहरात आयुर्वेदिक डॉक्टर म्हणून सेवा देत असतानाच योगाचे शिक्षण सुद्धा देत आहेत. अनेक मासिके तसेच वृत्तपत्रातून त्यांची आरोग्यविषयक सदरे प्रसिद्ध झालेली असून आरोग्यविषयक व्याख्यान त्या देत असतात. योगा, न्यूट्रिशन, हर्बल औषधी, लोकसंख्या व पर्यावरण इत्यादी विषयांवर त्यांनी व्याख्याने दिलेली आहेत. गेली काही वर्षे त्या बीएससी नर्सिंग कॉलेज कुडाळ व साहेब रिसर्च सेंटर सावंतवाडी येथे लेक्चरर म्हणून सेवा देतात. समता महिला मंडळ सावंतवाडी व सिंधुदुर्ग जिल्हा जैन परिवार यांच्या त्या सक्रिय सदस्य आहेत.
गेली दोन वर्ष सावंतवाडी माठेवाडा येथील श्री.काडसिद्धेश्वर सेवा समिती ट्रस्ट व अध्यात्म केंद्र या ठिकाणी डॉ.तुपकर योग प्रशिक्षणाचे वर्ग घेतात. दररोज सकाळी एक तास व संध्याकाळी एक तास माठेवाडा येथे श्री.काडसिद्धेश्वर मठात त्यांचे योग शिक्षणाचे वर्ग चालतात. योग शिक्षणाच्या वर्गाच्या माध्यमातून डॉ. संगीता तुपकर यांनी अनेक महिलांना योगातून रोगमुक्ती कडे नेण्याचे अमूल्य कार्य करत केले आहे. डॉ.संगीता तुपकर यांच्या योग वर्गाच्या माध्यमातून सावंतवाडी शहरातील अनेक महिलांनी योग शिक्षणाचे प्रशिक्षण घेऊन त्यातून रोग मुक्तीकडे पाऊल टाकले आहे. तसेच दिवसभरातील ताण-तणावापासून दूर राहण्यासाठी होत असलेला योग शिक्षणाचा फायदा अनेकांना डॉ.संगीता तुपकर यांच्या वर्गातून मिळाला आहे. सावंतवाडी शहरातील अनेक महिलांनी डॉक्टर संगीता तुपकर यांच्या वर्गाचा लाभ घेतला आहे. महिला दिनाच्या निमित्ताने महिलांनी योग शिक्षणाचा संकल्प करून स्वतःच्या आरोग्याच्या दृष्टीने व सुडौल, निरोगी, रोगमुक्त शरीर ठेवण्यासाठी योग शिक्षण घेणे अत्यंत आवश्यक असून दररोज केलेल्या योगा मधून जीवनातील अनेक रोग मुळापासून कसे दूर राहतील यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. आयुष्यात प्रत्येकाला शिकण्यासाठी गुरुची गरज असते आणि गुरु शिवाय कुठलेही शिक्षण घेता येत नाही. डॉक्टर संगीता तुपकर यांच्या योग वर्गाचा लाभ इतरही महिलांनी जरूर घ्यावा असे आवाहन महिला दिनाच्या निमित्ताने करण्यात येत आहे.
डॉ.संगीता दीपक तुपकर यांनी महिलांना योगाच्या माध्यमातून रोगापासून व ताणतणावापासून मुक्त राहण्यासाठी केलेले प्रयत्न अतुलनीय आहेत. संवाद मीडिया समाजाच्या हितासाठी झटणाऱ्या नारी शक्तीचा सन्मान करत असतोच. समाजाभिमुख कार्यासाठी संवाद मीडिया डॉ.संगीता तुपकर यांचा नारी शक्ती म्हणून सन्मान करत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा