You are currently viewing दिलखुलास जगूया

दिलखुलास जगूया

अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद पुणे संस्थेच्या ठाणे जिल्हा उपाध्यकक्षा सौ.मुग्धा कुंटे यांचा अप्रतिम लेख

एखादी गोष्ट उगाळत बसणे हा काही लोकांचा स्थायीभाव असतो. मग ते सुख असो, दु:ख असो की आणखी काही. तेच तेच विचार करायचे आणि त्यातच गुंतून रहायचं. कोणी जवळचं भेटायला आलं काय किंवा कोणी पहिल्यांदा भेटत असलं काय. आपण आपलं एकच एक विषय काढून चघळत बसायचं.कितीही बोलून हलकं वाटलं तरी गुंते सुटत नाहीतच! प्रश्नांना उत्तरं मिळतीलच असं नाही. फक्त ताणल्या जातील गोष्टी! एखादा मोठा आजार झालेल्या माणसाला डॉक्टर काय सांगतात? आपल्याला काय झालंय त्याचा सतत विचार न करता त्यातून बाहेर येऊन त्याच्याशी लढा. तेच तेच आठवून आणि बोलून बरं होता आलं असतं तर सगळे दोन चार दिवसात बरे नसते का झाले? आपल्याकडे नातेवाईक तेच तर करतात.

या शरिरांच्या आणि मनांच्या न संपणाऱ्या दुखण्यापलीकडे घडणाऱ्या कितीतरी गोष्टी असतात ज्या बोलायच्या राहून जातात कारण आपण लक्षच देत नाही तिकडे. उलट आणखी अडकत जातो स्वत:शी नाहीतर लोकांशी होणाऱ्या चर्चेत. छान पाऊस पडत असताना चाललेल्या प्रवासातसुद्धा एखादा माणूस किती चिकचिक आहे, चिखलामुळे कपडे खराब होतात, छत्री सांभाळावी लागते, कंटाळा येतो असेच बोलत राहिला तर?

तसंच एखादं बिनसलेलं नातं. न जमलेली नोकरी, न पचलेले अपमान ह्यातच एखादी व्यक्ती घुटमळत राहते. किंवा आयुष्याच्या एखाद्या वळणावर हरवलेली माणसं, सतत येणारी संकटं यातच मनाला भिरभिरत ठेवते.अशाने आयुष्याचा प्रवास हा न संपणारा रटाळ आणि कंटाळवाणा वाटायला लागेल नाहीतर काय!

उलट वेगवेगळी माणसं, बदलत जाणारे आकाशाचे रंग, मातीची रूपं, झाडांचे आकार , सावल्यांचे थांबे, अगदी रस्त्याकडेची रानफुलं सुद्धा एकसारख्या लांबलचक रस्त्याला नवा अर्थ देतात. संकटाच्या चर्चेपेक्षा भेटणारी नवी माणसे, भोवतीचा निसर्ग, पुढच्या आयुष्याची स्वप्ने ह्यात जीव रमवला तर नवी उभारी येते.

आयुष्याचा प्रवास असा रमतगमत करावा की खाचखळग्यांची जाणीव कमीत कमी व्हावी.रस्ता कधी संपला हे कळूच नये. प्रवास ही चर्चा करायची गोष्टच नाही मुळी, अनुभवयाची गंमत आहे!!!

म्हणून मिळालेल्या आयुष्याशी समरस होऊन जाऊ या! आणि दिलखुलास जगूया.

*सौ मुग्धा मंगेश कुंटे*
*ठाणे जिल्हा उपाध्यक्षा*
*9702878635*

प्रतिक्रिया व्यक्त करा

5 × one =