You are currently viewing मंतरलेले घरकुल

मंतरलेले घरकुल

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचाच्या सन्मा.सदस्य तथा कोकण मराठी साहित्य परिषद शाखा मालवणच्या आजीव सदस्य लेखिका कवयित्री आदिती मसूरकर लिखित अप्रतिम ललित लेख*

 

*🌹मंतरलेले घरकुल🌹*

 

*आईच्या गर्भात*

*बीज अंकुरले*

*नवी सृष्टी पाहण्या*

*मन आतुरले*

गर्भात असताना बाळाची नाळ ही आईच्या उदराशी जोडलेली असते . नऊ महिने बाळ आईच्या गर्भपिशवीत सुरक्षित असते . आईचे उदर हेच त्याचे विश्व असते . पुढे बाळाची पूर्ण वाढ झाल्यानंतर आईच्या उदरातून बाळ जन्म घेते . विधात्याने निर्मिलेल्या या सुंदर सृष्टीत पदार्पण करते .

घराचा कुलदीपक बनून , वंशाचा दिवा बनून किंवा घरची लक्ष्मी , धनलक्ष्मी बनून हे बाळ घरात प्रवेश करते. एवढ्याशा त्या नाजूक बाळाची दृष्ट काढून , तुपाच्या वातीने त्याला ओवाळून , धान्याच्या राशीवर झोपवून या बाळाला थाटामाटात घरात आणले जाते . धुमधडाक्यात त्याचे स्वागत होते . बाळाच्या आगमनाने हे छोटेसे असो किंवा मोठा बंगला ते घर राहत नाही . ते होते आनंदाने नांदणारे गोकुळ .

या घरकुलात चैतन्याचा अखंड झरा वाहत असतो . बाळाचे आजी – आजोबा , काका – काकी , आत्या , आई-बाबा , भावंडे सर्वचजण त्या बाळाभोवती रिंगण घालत असतात . रक्ताच्या नात्याने जोडलेला हा नात्यांचा बंध , घराच्या भिंतींना मजबूत करण्याचे काम करतो . त्या नात्यांच्या मायेतील ओलाव्याने भिंतींना गिलावा करण्याचे काम करतो . माणसांनी गजबजलेली ही वास्तू प्रसन्न मनाने , हसतमुखाने तथास्तु असा आशीर्वाद देत असते .

आई-बाबांना आपल्या मुलांचा , आजी – आजोबांना नातवंडांचा लळा लागतो . बाळाच्या इवल्याशा पावलांनी व बोबड्या बोलांनी घरभर हास्याचे , कौतुकाचे कारंजे उधळत असतात . अंगण थुई थुई नाचत असते . नात्यांची ही वीण एवढी घट्ट होते , की त्याचा एक छान गोफ तयार होतो . तो गोफ खेळत असताना कधी वर्ष निघून जातात कळतही नाही .

मुले मोठी होतात . शिक्षण , नोकरी निमित्ताने ते घराबाहेर पडतात . पंख फुटलेल्या पाखरांसारखी ही पाखरे दूरदेशी निघून जातात . पिकलेले झाडाचे पान हे कधी ना कधी गळून पडतेच . त्याप्रमाणे वृद्ध आजी-आजोबा , हे जग सोडून जातात . माणसांनी गजबजलेले ते घर अचानक रिकामं होतं . जे स्वयंपाकघर खाद्यपदार्थांच्या सुवासाने दरवळलेले असायचे , त्या स्वयंपाकघरात मिणमिणत्या गॅसवर एक दोनच पदार्थ शिजताना दिसतात . जेवणाची पंगत , हास्य विनोद करत , खाण्याचा आग्रह करत , विविध पदार्थांवर ताव मारणे . या सर्वच गोष्टी अचानक बंद होतात . त्या वास्तूत स्मशान शांतता पसरते . दररोज तिन्ही सांजेच्या वेळी ऐकू येणारे शुभंकरोती , राम रक्षाचे श्लोक बंद होतात .

प्रेम , माया , ममता , वात्सल्याने काठोकाठ भरलेला तो घडा अचानक रिकामा होतो . घराच्या बोलक्या भिंती अबोल होतात . अंगणात बहरलेली फुले कोमेजून जातात . माणसांच्या संगतीने डुलणारी ती हिरवीगार झाडे निस्तेज बनतात . घराचे सारे वैभवच माणसांसोबत निघून जाते .

नोकरीतून निवृत्त झालेले बाबा व संसाराच्या रहाटगाड्यातून थोडीशी मुक्त झालेल्या आईला हा रिकामा वेळ नकोसा वाटतो . रिकाम्या झालेल्या त्या घरात काय करावे ? असा प्रश्न पडतो . चिंता काळजीच्या वारुळात मन अडकते . डोळे वाट पाहू लागतात . कधी आपली पिल्ले या घरट्याकडे परततील ? प्रेमाने भरलेला , या घराच्या मातीचा सुगंध त्यांना परत आपल्या घरकुलाकडे खेचून आणेल का ? नात्यातील मायेच्या सुगंधाने मंतरलेले हे घरकुल पुन्हा बहरेल का ?

*नात्याच्या सुगंधाने*

. *मंतरलेले माझे घरकुल*

*कधी बहरेल नव्याने*

*गजबजलेले गोकुळ*

 

*✒️© सो. आदिती धोंडी मसुरकर*

*आजीव सदस्य कोमसाप शाखा मालवण*

*ओम गणेश हाऊसिंग सोसायटी*

*इंद्रप्रस्थनगर कुडाळ सिंधुदुर्ग*

*EmaiI Id aditeemasurkar@gmail.com*

*Mobile Number*

9404395563

7744850670

प्रतिक्रिया व्यक्त करा