You are currently viewing असं कुठं असतं का राव?

असं कुठं असतं का राव?

जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या राष्ट्रीय पुरस्कारित ज्येष्ठ सदस्या लेखिका कवयित्री प्रा.सौ.सुमती पवार यांनी काव्याचे केलेले रसग्रहण

चौऱ्याऐंशी लक्ष योनीनंतर
जन्म दिलास माणसाचा
हाच एक जन्म जिथून
मार्ग खुला मोक्षाचा

दिलंस एक मन त्यात
अनेक विचारांचा वावर
आणि म्हणतोस आता
या विचारांना आवर

दिलेस दोन डोळे
सौंदर्य सृष्टीचे बघायला
आता म्हणतोस मिटून घे
आणि बघ तुझ्यातल्या स्वतःला

नानाविध चवी घेण्यास
दिलीस एक रसना
आणि आता म्हणतोस
अन्नावर ठेवू नकोस वासना

जन्मापासून नात्यांच्या
बंधनात अडकवतोस
बंध सगळे खोटे असतात
असं आता म्हणतोस

भाव आणि भावनांचा
इतका वाढवतोस गुंता
आणि मग सांगतोस
व्यर्थ आहे ही चिंता

संसाराच्या रगाड्यात
पुरता अडकवून टाकतोस
म्हणे शांतपणे ध्यान कर आता
अशी कशी रे मजा करतोस??

मेजवानीने भरलेले ताट
समोर बघून उपास करायचा
हाच अर्थ का रे
सांग बरं मोक्षाचा?

वर बसून छान पैकी
आमची बघ हो तू मजा
पाप आणि पुण्याची
मांड बेरीज आणि वजा

माहीत नाही बाबा मला
मिळेल की नाही मोक्ष
*तू जवळ असल्याची फक्त*
*पटवून देत जा साक्ष . . . .*

॥श्री॥

या कवीचे कौतुक करायला माझ्या जवळ शब्द नाहीत
इतके परखड वास्तव कवीने या कवितेतून मांडले आहे.
ज्याने जन्म दिला, सुंदर सृष्टी निर्माण केली , हे सुंदर जग
बघण्यासाठी दृष्टी दिली. बांधा बांधावर पोषण व तृप्ती
करणारी नानाविध प्रकारची धनधान्ये व फळे दिली, त्यांचा
रसास्वाद घेणारी जिव्हा दिली ..

माणसा पासून माणूस निर्माण होऊन समाज अव्याहत जिवंत
रहावा म्हणून सुंदर श्रृंगार भावना दिली, मातेला दूध व बापाला
कठोर कर्तव्ये दिली,प्रेम माया सौहार्द या भावना देऊन समाज
रचना केली …

हे इतके उपभोगायचे सोडून विरक्ती घ्यायची का… ?
हाच प्रश्न कवीने विचारला आहे.. म्हणून ते म्हणतात,
“असं कुठे झालं का राव..” .. हे कसं शक्य आहे .. आम्ही
ते उपभोगायलाच हवे ..

गीतेतला” कर्मवाद सांगतो, मनुष्य जन्म मिळाला आहे त्या
नुसार देवाने दिलेले कर्म म्हणजे संसार करा . संसार त्यागण्याची गरज नाही.सारे भोग घ्या, उपभोगा …फक्त
माझे “नाम” विसरू नका.प्रत्येक गोष्ट मला अर्पण करा.
बस्स … आणखी काही नको. ही कर्मे करतांना तुम्ही सन्मार्गावर चाललात की, तुमचा मोक्ष निश्चित आहे.

कर्म सोडणे पाप आहे. कर्म करणे नव्हे .. किती सोपे तत्वज्ञान
आहे. म्हणून संन्यास घेण्याची , उपास तापास करून देह
कष्टविण्याची गरज नाही … “फक्त फलाशा सोडा”
काय फळ मिळेल ? मिळेल की नाही ? याची चर्चा नको.
फक्त नेमून दिलेले काम करा , बाकी गोष्टी माझ्यावर सोपवा.

खूप खूप धन्यवाद .. इतक्या सोप्या भाषेत कर्मवाद मांडला
तुम्ही …

Thanks again…

सुमती पवार नाशिक …
(९७६३६०५६४२)
दि : १० फेब्रुवारी २०२२
वेळ : ३ : १४

प्रतिक्रिया व्यक्त करा

sixteen + 18 =