You are currently viewing अनादि मी…!

अनादि मी…!

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य लेखक कवी हेमंत सांबरे यांनी आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांच्या पुण्यतिथी निमित्त लिहिलेला लेख*

 

*अनादि मी…!*

भारताच्या मुख्य भूमिपासून शेकडो मैल दूर …अगदी दूर… जिथे कुणाला ही कळणार नाही, अशा अज्ञात ठिकाणी … आजच्याच दिवशी एका देहाला अखेरची घरघर लागली होती, प्राण तळमळत होते व तेजस्वी डोळे मिटू लागले होते..

अखेर दूर देशीच्या त्या भयंकर कारागृहात त्या महान आत्म्याने ते जर्जर शरीर सोडले एकदाचे … लौकिक अर्थाने हा आत्मा अनंतात वगैरे विलीन होणार नव्हताच … कारण या आत्म्याने भीष्म प्रतिज्ञा केली होती, “मी मरून जाईन. पण या दुष्ट, चांडाळ, प्रजाभक्षक इंग्रजांना मेल्यानंतर ही शांतता लाभू देणार नाही!”

आणि तेच खरे झाले. या आत्म्याने अवघ्या काही महिन्यातच एक तेजस्वी शरीर धारण केले… विनायक दामोदर सावरकर या नावाचे … आता तो आत्मा अगदी मुक्त झाला होता व त्याला कुठलेही बंधन उरले नव्हतेच! मग तो थांबला कधीच नाही, त्याने अनेक शरीरे धारण केली… कधी ते होते … मदनलाल धिंग्रा, कधी अनंत कान्हेरे, कधी भगतसिंग, कधी राजगुरू आणि अशा अगणित नररत्नांचे…. पुढे मग तो आत्मा त्या दुष्ट इंग्रजांना या देशातून घालवूनच शांत झाला!

त्या महान आत्म्याच्या मुक्तीचा प्रवास सुरू झाला तो दिवस होता, १७ फेब्रुवारी १८८३, ठिकाण होते, एडनचे कारागृह आणि ते शरीर होते वासुदेव बळवंत फडके यांचे!!

१८५७ चे स्वातंत्र्य समर थंड होऊन बऱ्यापैकी कालावधी उलटला होता. भारतीय जनमानस गुलामगिरीच्या वातावरणात जणू काही सरावल्यासारखे झाले असतानाच, वासुदेव बळवंत फडके व त्यांच्या सहकाऱ्यांनी उठाव केला.

ब्रिटीश सरकारने त्यांच्यावर आरोप ठेवले…

१. ब्रिटिश सत्तेविरुद्ध युद्ध पुकारणे.

२. सत्तेविरुद्ध अप्रिती निर्माण करणे.

३. दारुगोळा व शस्रे गोळा करणे.

४. लुटालूट करणे.

असे चार भयंकर आरोप ठेवण्यात आलेले वासुदेव बळवंत फडके हे पहिलेच क्रांतिकारक !

वासुदेव बळवंतांना इंग्रजांची जुलमी सत्ता कधीच मान्य नव्हती. ते म्हणतात, “ज्या भूमीच्या पोटी आपण जन्म घेतला, तिच्याच पोटी सर्व लेकरे झाली, त्यांनी अन्न – अन्न करत उपाशी मरावे, आणि आपण कुत्र्याप्रमाणे पोट भरत राहावे हे मला पाहवले नाही म्हणून ब्रिटिश सरकारविरुद्ध मी बंड पुकारले!!!”

भयंकर दुष्काळ पडलेला असताना कुठल्याही ठोस उपाययोजना न करता ब्रिटिश सरकारने लोकांना मरणासन्न अवस्थेत सोडून दिले होते. स्वजनांचे होणारे हाल बघून वासुदेव बळवंताचे मन पेटून उठले. इंग्रज लोक आपल्या देशाचे कधीही व कुठलेही भले करणार नाहीत, आपला देश लुबाडणे हेच एक त्यांचे ध्येय आहे, त्यामुळे या देशातून त्यांना घालवून द्यायचे असेल तर अजून एक सशस्त्र लढा उभा करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही याची त्यांना मनोमन खात्री पटली.

पण आजूबाजूची परिस्थिती पूर्ण विरुद्धच होती, त्यांना अनुकूल असे काहीच दिसत नव्हते. वासुदेव बळवंत एका युरोपियन कंपनीत नोकरीला होते आणि त्यांचा पगार होता तीस रुपये, म्हणजे आजच्या काळानुसार तब्बल दीड लाख रुपये. त्यांची आई आजारी असूनही त्यांना कंपनीने रजा नाकारली, आईच्या वर्षश्राद्धाला जाण्यासाठी ही त्यांची रजा नामंजूर करण्यात आली. ही सुरुवात होती त्यांचा ब्रिटिशांविषयी राग वाढण्याची. पण त्यांनी जे बंड पुकारले, ते मात्र सर्वसामान्य रयतेचा कळवळा आल्याने हेच काय ते खरे!!

पुण्यात आपल्याला योग्य साथीदार मिळणार नाहीत हे लक्षात घेऊन ते खेडोपाडी फिरू लागले व त्यांची गाठ रामोशी (म्हणजेच रामवंशी) लोकांशी पडली, त्यांच्यात लढवय्या बाणा अजून शिल्लक होता. अर्थात, स्वतः वासुदेव बळवंत काही कमी तयारीचे नव्हते. वासुदेव बळवंतांचे गुरू होते वस्ताद लहुजी साळवे! अण्णासाहेब पटवर्धन, बाळ गंगाधर टिळक अशा अनेक तरूण देशभक्तांनी लहुजींच्या आखाड्यात तलवारबाजी, दांडपट्टा, लाठीकाठी, कुस्तीचे प्रशिक्षण घेतले होते. लहुजी वस्तादांच्या तालमीत वासुदेव बळवंतांनी आपले शरीर अतिशय काटक व पीळदार बनवले होते. ते स्वतः धावत्या घोड्यावरून बंदुकीने अचूक नेम साधायचे, पाठीच्या बाजूने अशी उलटी भिंत चढून जायचे, कित्येक मैल अंतर पळत जायचे, भर पुरात उडी मारणे, तुटक्या कड्यावरून उड्या मारणे अशा धाडसी गोष्टी ते सहजतेने करायचे. काही दिवसांच्या प्रयत्नांनी रामोशी लोकांचे सैन्य तयार झाले होते व धनासाठी अनेक श्रीमंत सावकार, धनिक यांच्यावर दरोडे टाकून ते स्वराज्यासाठी पैसे गोळा करू लागले. पुढे त्यांच्या कार्यात दौलतराव नाईक, पिलाजी नाईक, रामा कोळी, कोंडू मांग, खुशाबा साबळे, गणोबा पालकर, कोंडाजी न्हावी, सखाराम महार असे विविध जातींमधील सहकारी मिळाले, ते वासुदेव बळवंतांना ‘महाराज’ म्हणायचे. वासुदेव बळवंतांना ब्रिटिशांचे मुळीच भय नव्हते. एका बाजूला इंग्रज सरकार त्यांना पकडण्यासाठी “चार हजार रुपये बक्षीस मिळेल” अशी पोस्टर्स लावत असे, त्याच पोस्टर्सच्या शेजारी वासुदेव बळवंतांची स्वाक्षरी असलेले पोस्टर झळके, “जो कोणी मुंबईच्या गव्हर्नरचे डोके मारून आणेल, त्याला पाच हजार रुपयांचे बक्षीस मिळेल.” क्रांतीची बीजे जेव्हा पेरली जातात तेव्हा कोणते बीज उगवेल आणि कोणते बीज नष्ट होईल हे निश्चित नसतेच, पण कुणीतरी सुरवात करून ते पेरावेच लागते, वासुदेव बळवंत फडके व त्यांच्या सैन्याने तेच केले होते.

याच दरम्यान वासुदेव बळवंतांच्या लक्षात आले की, कुटुंबाचे सर्व पाश तोडून आता कायमचे पुढे गेले पाहिजे. म्हणूनच आपली पत्नी गोपिकाबाई यांना त्यांच्या माहेरी जुन्नर येथे सोडून आले. आपल्या अत्युच्च ध्येयाच्या प्राप्तीसाठी त्यांनी मोहाचे सगळे धागेदोरे स्वतःहून उध्वस्त केले होते. देशाला स्वातंत्र्य मिळावे म्हणून वासुदेव बळवंत फडके व त्यांच्या कुटुंबाने आपल्या सगळ्या सुखांचा त्याग केला, स्वतःच्या जिवाचीही पर्वाही केली नाही.

वासुदेव बळवंत आपल्या प्रयत्नांमध्ये यशस्वी झाले नाहीत म्हणून त्यांच्या क्रांतिकार्याचे महत्व कमी होत नाही, कारण त्यांनी पेटवलेल्या मशालीनेच क्रांतिकारक पेटून उठले. आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके हे त्यांचे प्रेरणास्थान राहिले!!

या सगळ्याच शूर वीरांचा इतिहास, त्यांच्या स्मृती, त्यांच्या कुटुंबियांचा त्याग यांची आठवण पुसण्याचा सतत व वेळोवेळी प्रयत्न झाला असे दिसून येते. हे का झाले असेल? अनेक प्रश्न पडतात व पडतच राहतात!

ब्रिटिश सरकार व स्वातंत्र्यानंतर देशात जे सरकार होते त्यांनी मुद्दाम स्वीकारलेल्या धोरणांत याचे कारण दिसून येते. आपल्या भारत देशाला केवळ अहिंसेच्या जोरावर स्वातंत्र्य मिळाले हे चुकीचे तत्व जनतेच्या मनावर दीर्घकाळ ठसविले गेले! मग कसे कळेल या क्रांतीवीराचें कष्ट, त्यांच्या त्यागाचे महत्त्व?? ज्या ब्रिटिशांनी लढून, झगडून, विविध प्रकारचे कावे करून भारत देश आपल्या ताब्यात घेतला त्यांनी इतक्या सहजासहजी केवळ अहिंसात्मक आंदोलनांमुळे देश सोडला असता का ??

कवी गोविंदांची कविता आहे, ‘रणावीण स्वातंत्र्य कोणा मिळाले?’ ती वाचल्यावर लक्षात येईल की, सत्य काय आहे? कवी गोंविंद काय म्हणतात…

रणावीण स्वातंत्र्य कोणा मिळेना ।

असा भूतकालीन सिद्धांत जाणा।

स्वराज्येच्छुनें पाहिजे युद्ध केलें।

रणावीण स्वातंत्र्य कोणा मिळालें?।।

आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांची आज पुण्यतिथी, त्यांना विनम्र अभिवादन!

 

© हेमंत सदाशिव सांबरे

संपर्क – 9922992370 .

ई-मेल – camsambare@gmail.com

प्रतिक्रिया व्यक्त करा

five × four =