You are currently viewing प्रेम ……
  • Post category:लेख
  • Post comments:0 Comments

प्रेम ……

जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सदस्या राष्ट्रीय पुरस्कारित ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा.सौ.सुमती पवार यांचा लेख

आधीच सांगते , कदाचित आमच्या पिढीतील प्रेमा विषयीची
आमची मते नव्या पिढीला बुरसटलेले, मागासलेले वाटू
शकतात .. हा काळाचा महिमा आहे.. काळ सारखा पुढे
धावत असतो व आपल्या बरोबर सारे काही बदलून टाकतो.

खरं म्हणजे .. प्रेम ह्या शब्दाची व्याप्तीच आम्हाला कळत नाही, नि त्यातूनच असंख्य गैरसमज मनात निर्माण होतात.
हल्लीची पिढी फक्त एकच प्रेम जाणते, कोणते ते मी सांगण्याची गरज नाही.

अहो… प्रेम ही संकल्पनाच मुळी विश्वव्यापी आहे.माणसाला
प्रेमाची पहिली ओळख ती, तो जन्मल्या बरोबर मातृ प्रेमाची..!
आईने पदराखाली घेताच जे प्रेम निर्माण होते व आजीवन निभावले जाते ,त्या प्रेमाला तुम्ही कसली उपमा द्याल ? अहो,
ते प्रेम इतके पवित्र इतके मंगल आहे की दोन्ही कडून निर्माण
झालेल्या भावना मांडायला देखील शब्द नाहीत .मात्र त्याचा
अनुभव जन्मणारा प्रत्येक जीव घेतो माग तो माणुस असो की
पशु पक्षी.. ही मंगल भावना, ओसांडणारे अतोनात प्रेम सर्वत्र
सारखेच आहे यात तिळमात्र शंका नाही…

 

मातृ प्रेमा नंतर दुसरी ओळख होते ती पितृ प्रेमाची, ते ही
तितकेच पवित्र व मंगल असते. आई इतकाच पिता ही
आपल्या पिलांवर भरभरून प्रेम करतो. प्रसंगी स्वत:च्या
गरजांना पूर्ण मुरड घालून आपल्या लाडक्यांचे लाड पुरवतो .
केवळ त्यांच्या साठीच जगतो असे म्हटले तरी चालेल .

माता पित्यांचे पाठोपाठ दुसरे अपत्य येताच त्यांचे ही असेच
घट्ट ऋणानुबंध जुळतात व लहान लहान भाऊ बहिणी एकमेकांवर लहानपणी तरी निदान जीवापाड प्रेम करतात .
पुढे या स्वार्थाच्या बाजारात स्वार्थाशी गाठ पडल्यावर अपवादाने त्यात अंतराय निर्माण होतो व मने दुखावली जातात
ती कायमचीच …

बघा .. महान मंगल असे मातृ पितृ प्रेम , नंतर जीवाला जीव
देणारे भावा बहिणीतले अपार प्रेम अशी जमिनी पासून
आभाळा पर्यंत प्रेमाची व्याप्ती आहे …

आणि मग त्यानंतर येतो तो शृंगार … वाह वा .. किती सुंदर
उपमा दिली आहे हो आपल्या पुर्वजांनी पती पत्नीच्या प्रेमाला… ! शृंगार हा शब्द उच्चारताच नववधूच्या अंगावर
रोमांच फुलावे नि अधिरतेने आयुष्यभर साथ निभावणाऱ्या
या सख्या सोबत्याची तिने वाट पहावी व परिचय होताच
विश्वासाने त्याच्या खांद्यावर मान टाकावी व त्याने ही आश्वासक हातांनी तिला थोपटावे व त्या स्पर्शातून च तिला
कळावे … होय राणी .. मी तुझाच आहे, तुझाच राहणार तू
निश्चिंतपणे माझ्या खांद्यावर मान टेकव व निर्धास्त मनाने
हा आपला नवा संसार सांभाळ , मी तुला कुठल्याही गोष्टीची
कमतरता भासू देणार नाही.

 

यातूनच मग जो विश्वास निर्माण होतो त्यातूनच मग सृजनाची
नवी चाहूल लागते व त्यांच्या आनंदाला मग पारावार उरत नाही. माणसापासून माणूस निर्माण करणारी शृंगार ही भावनाच इतकी पवित्र आहे की त्यातूनच नवा समाज निर्माण
होऊन सृष्टीकर्त्याचे उद्दिष्ट साध्य होऊन हे सृष्टी चक्र अव्याहत पणे चालू राहते. ज्याचा आपण सारेच एक पुरावा आहोत .

 

हे सारे इतके सुंदर इतके नियमित असतांना आम्ही आजकाल प्रेमाचा जो बाजार मांडला आहे तो उबग व शिसारी आणणारा
आहे.सेक्स आणि प्रेम यांची जी गल्लत चालली आहे ती अत्यंत अशोभनिय आहेच पण संस्कृतीचा ऱ्हास करणारी आहे.
सेक्स आणि प्रेम या सर्वस्वी भिन्न गोष्टी आहेत . शृंगारातून
प्रेम निर्माण होतेच , पण आजकाल या सर्वच गोष्टी हद्दपार
होऊन त्याला विकृत स्वरूप प्राप्त झाले याला पाश्चात्य
संस्कृतीचे अंधानुकरण ही जबाबदार आहे.

 

आपल्या कडील चार आश्रम आपली संस्कृतीची उत्तम
जोपासना करत होते. योग्य वयात योग्य गोष्टी अंगिकारण्याचे
ते शिक्षण होते ते सोडून नको त्या गोष्टींच्या मागे आपण का
धावत आहोत ? योग्य वेळी लग्न करा ना ..? कोणाची आडकाठी आहे ..? नाही पण , आम्हाला आता नको त्या वेळी
नको त्या गोष्टी करायच्या आहेत.. अशाने कशी संस्कृती
टिकणार..?

मा. तात्यासाहेब.. कुसुमाग्रज म्हणतात..

“ प्रेम कर भिल्ल सारखं बाणावरती खोचलेलं
माती मध्ये उगवून सुद्धा आभाळात पोचलेलं”

ही प्रेमाची महती आम्हाला कधी कळणार …?
अरे , खरं प्रेम करतोस ना? मग सांग की डोळ्यात डोळा
घालून, तिथे काय कुणाच्या बापाची भीती आहे ?

 

पाश्चांत्यांचे अनुकरण करतांना त्यांच्या नको त्या गोष्टीच
फक्त घेतल्या गेल्या.. फक्त बाह्यानुकरण झाले.त्यांची करडी
शिस्त, चिकाटी , जुने ते जपण्याची प्रवृत्ती,अजोड असे राष्ट्रप्रेम हे आपण घेतले का? अहो आपल्या मातेवर..मायभूमीवर बिनदिक्कतपणे आपण थुंकतो…जणू जन्मसिद्ध
हक्क असल्या सारखे ….

हा वाह्यातपणा आपल्याला कुठे घेऊन जाणार आहे माहित
नाही नि खऱ्या प्रेमाची ओळख आम्हाला कधी होणार आहे
माहित नाही. लग्न या संस्थेचे पावित्र्यच नष्ट होणार आहे काय
अशी भीती आता वाटू लागली आहे …प्रेम हे विश्वव्यापी आहे,
प्रेयसी आणि प्रियकर इतकेच ते संकुचित नाही.. हे विश्वच
माझे घर “अशी त्याची व्याप्ती आहे …

कालाय तस्मै नम: …

या शिवाय आपण दुसरे काय म्हणू शकतो …

आणि हो …

……. ही मते फक्त माझीच आहेत ….

प्रा.सौ.सुमती पवार,नाशिक
(९७६३६०५६४२)
दि : १३ फेब्रुवारी २०२२
वेळ : ६ : ५२

प्रतिक्रिया व्यक्त करा