You are currently viewing असते गरज सोबतीची..(व्हॅलेन्टाईन)
  • Post category:लेख
  • Post comments:0 Comments

असते गरज सोबतीची..(व्हॅलेन्टाईन)

जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्यकवी लेखक दीपक पटेकर यांचा ललितलेख

सोबत…..सोबती…. आयुष्याची गरज…जीवनातील प्रत्येक क्षण हा एखाद्या कामात व्यस्त राहून किंवा विचारांमध्ये गुंतून निघून जात नसतो तर जीवनातील सुखदुःख वाटून घेण्यासाठी….यशाला सुखाची मखमली किनार लावण्यासाठी अन दुःखाला किनाऱ्यावरूनच तडीस दूर सारण्यासाठी गरज असते ती सोबतीची…खऱ्याखुऱ्या व्हॅलेन्टाईनची…
बालपणी शेजारच्या मुलीसोबत शाळेत जायचे तेव्हा मस्करीत का होईना तिच्या नावाने चिडवायचे…त्यावेळी का चिडवतात याची पुसटशी देखील कल्पना नसायची….घरातील कुणाच्या तरी एखाद्या लग्नात नवीन नवरी घरात यायची आणि काकी, वहिनी अशी नवी नाती मिळायची….तेव्हा समजायचं..लग्न म्हणजे आपल्या सोबतीला एक मुलगी येते…बालिशच समज असायची ती… तरीही बालपणी शेजारच्या, वर्गातील मुलींसोबत खेळताना, बागडताना मात्र त्यांच्याशी असलेलं आपलं नातं समजत नव्हतं…केवळ तेव्हा गरज असायची ती खेळण्यासाठी सोबतीची…मित्र-मैत्रिणींची…. रानोमाळी फुललेल्या फुलांच्या मळ्यामध्ये रंगबिरंगी फुलपाखरे जोडीने बागडत असायची….लक्ष वेधून घ्यायची ती पिवळी फुलपाखरांची जोडी…एका फुलावरून दुसऱ्या फुलावर बसत…पुंकेसरातून रस प्राशन करायची….मध्ये एकमेकांशी भिडायची…हवेत घिरट्या घालायची….आणि उडत उडत दूर निघून जायची…त्यांचं नातं काय होतं…. मित्र-मैत्रिणी की आणखी काही हे समजत नसलं तरी बागडणारी, खेळणारी फुलपाखरे पाहतच लहानाचे मोठे झालो…अगदी तसंच बालपण साथ सोबत करत आनंदात गेलं…बालपणी कोणी चिडवतात म्हणून सोबत मात्र कधीच सोडली नाही….मुंबई सारख्या सिमेंटच्या जंगलात…फ्लॅट संस्कृतीमध्ये मुलांना सोबत नसते….बंद दरवाजाच्या आतमध्ये मोबाईल, टीव्ही हीच त्यांची सोबती…परंतु गाव खेड्यात अगदी बालपणापासून मित्र..मैत्रिणी…यांची सोबत मिळत असते…बागेतील,माळावरील बागडणाऱ्या फुलपाखरांसारखीच…

*बालपणीचे मित्र-मैत्रिणी*
*जणू बागेतली फुलपाखरे*
*चिमटीत धरता निसटून जाती*
*बोटांवर सांडुनी रंग खरे*

कॉलेज म्हणजे मोकळं रान….तिथे सोबतीची वानवा नसतेच…..मजा…मस्तीत… दोस्तांच्या संगतीत दिवस मस्त जातात…मजा मस्तीच्या रंगेल जीवनात एखादी मुलगी आवडावी…आणि तिने मनात घर करून जावं….सतत तिच्या सहवासाची…. सोबतीची आस मनाला लागून रहावी… जसं पावसाने बेधुंद कोसळावं… अन धरेला चिंब भिजवून सोडावं… वरुणाने घिरट्या घालत…..हसत हसत ते प्रणय दृश्य पहावं…..वरुणाच्या नाजूक स्पर्शाने झाडे,,,वेली,,, पाने,,,फुलांनी शहारून जावं ..लाजाळूने लाजावं…अन पावसाचं धरेशी झालेलं मिलन…..पाऊस बेधुंद कोसळत असतानाही धरेने आपल्या प्रियकराला केलेली सोबत….मनाला आनंद देऊन जाते….अगदी तशीच….
आपल्याला आवडणाऱ्या मुलीची….सोबत नेहमीच आनंद द्यायची… कधीतरी वाटायचं….तिला विचारावं…..”आयुष्यभर अशीच सोबत देशील का?”
पण मग मनात विचार यायचा….
“माझ्या अशा विचारण्याने ती दुःखी झाली तर? तिने आपली सोबत सोडली तर?”
सोबत सुटण्याच्या भीतीने विचारायचं राहूनच जायचं…अन कधीतरी तिचं लग्न ठरायचं… अन मैत्र म्हणून कायमच सोबत राहायचं….ती निघून जायची सोबतीच्या आठवणी मनात कायम कोरून ठेवून….

*आठवणी माझ्या जपून ठेव*
*भरलेल्या काळ्याकुट्ट ढगांपरी*
*बरसतील बेधुंद धरेवरी जरी*
*स्वप्न चुरगळुन तू गेलीस खरी*

मनात असेच विचार येत असतानाच…जीवनाच्या नव्या वळणावर….आयुष्याच्या जोडीदाराने हात हात देत…दारावरचं माप ओलांडून घरात प्रवेश करावा… अन सुख दुःखात….कधीही सोबत न सोडण्याचं वचन देत….मधुचंद्राच्या रात्री….असंख्य तारकांच्या साक्षीने एकरूप व्हावं….जीवनाच्या प्रत्येक घडीला भक्कमपणे पाठीशी रहावं… अन खऱ्या अर्थाने आयुष्याची भागीदार म्हणून…. अर्धांगिनी बनून सोबत करावी….
होय…
गरज असतेच सोबतीची…
उतार वयात हातातली काठी कधीतरी खाली पडते….तेव्हा कंबरेला हात धरत खाली वाकताना खांदावर हात ठेवून काठी अलगद उचलून देण्यासाठी….
अनंत विचारांचे वादळ मनात घोंगावत असताना….मनातल्या भावना जाणण्यासाठी….. शेजारी बसून…मांडीवर हात ठेवून “कसला विचार करता?…..
आपल्यापेक्षा सुखात असणारी माणसं पाहून दुःखी होऊ नका….ज्यांना मुलबाळ नाही, त्यांचं कसं होत असेल? हा विचार करून आपल्यापेक्षा दुःखात असणाऱ्या पेक्षा आपण किती सुखात आहोत हे विचार करा…”
असे समजुतीचे चार शब्द सांगण्यासाठी सोबत ही हवीच….
तोंडात दात शिल्लक नसतानाही “आजोबा हा अर्धा लाडू तुम्हाला देतो…..पण मला गोष्ट सांगा ना…..मला खांदावर घेऊन फिरवा ना…”
असा हट्ट करणारे नात…नातू यांचे हट्ट पुरवीत…त्यांचे मित्र बनून सोबत करण्यासाठी….
खरंच…
आयुष्यात काय मिळवलं…काय गमावलं हेच समजण्यासाठी…शेवटच्या क्षणापर्यंत…..वास्तवात जगण्यासाठी…
असते गरज सोबतीची…
शेवटच्या श्वासापर्यंत…आपली व्हॅलेन्टाईन म्हणून….!!!

©[दिपी]🖊️
दीपक पटेकर, सावंतवाडी
८४४६७४३१९६

प्रतिक्रिया व्यक्त करा