You are currently viewing साहित्य, कला आणि समाजसेवेचा दिमाखदार “दिनकर सन्मान” सोहळा उत्साहात संपन्न

साहित्य, कला आणि समाजसेवेचा दिमाखदार “दिनकर सन्मान” सोहळा उत्साहात संपन्न

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :

साहित्य, कला, पत्रकारिता, शिक्षण, समाजसेवा आणि सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा विविध “दिनकर सन्मान” पुरस्कारांनी गौरव करणारा भव्य सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. कविसंमेलन, अभिवाचन, गीत प्रकाशन आणि पुरस्कार वितरणाने सजलेल्या या कार्यक्रमाला साहित्यप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आणि कार्यक्रमाचे आयोजक गुरुदत्त दिनकर वाकदेकर यांनी प्रास्ताविकातून “मराठी साहित्य व कला सेवा” संस्थेच्या दशकभराच्या साहित्य-सांस्कृतिक प्रवासाचा आढावा घेतला. मराठी भाषा, साहित्य आणि कलेसाठी सातत्याने कार्यरत राहण्याचा संस्थेचा संकल्प त्यांनी व्यक्त केला. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित मान्यवर, साहित्यिक, कलाकार, सहकार्य संस्था आणि रसिकांचे त्यांनी आभार मानले.

कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून लोकसंगीत क्षेत्रातील गायक नंदेश विठ्ठल उमप, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मंडळाच्या सचिव तसेच साहित्यिक, चित्रकार डॉ. मीनाक्षी पाटील, शिवसाहित्याचे सुप्रसिद्ध लेखक डॉ. हेमंतराजे गायकवाड तसेच दैनिक नवशक्तीचे संपादक प्रकाश सावंत उपस्थित होते. मान्यवरांचा सन्मानचिन्ह, शाल आणि पुस्तक देऊन गौरव करण्यात आला.

नंदेश विठ्ठल उमप म्हणाले, “लोककला आणि साहित्य यांचा वारसा जपणाऱ्या संस्था समाजाला सांस्कृतिक दिशा देतात. अशा उपक्रमांमुळे नव्या पिढीला प्रेरणा मिळते.”

डॉ. मीनाक्षी पाटील यांनी सांगितले, “साहित्य हे समाजमन घडवणारे प्रभावी माध्यम आहे. नवोदितांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे ही अत्यंत महत्त्वाची सांस्कृतिक सेवा आहे.”

डॉ. हेमंतराजे गायकवाड म्हणाले, “मराठी भाषा आणि संस्कृतीच्या संवर्धनासाठी साहित्यिक, कलाकार आणि सामाजिक संस्था यांनी एकत्र येणे ही काळाची गरज आहे.”

प्रकाश सावंत यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले, “पत्रकारिता, साहित्य आणि समाजकार्य यांचा संगम घडवणारे असे कार्यक्रम समाजात सकारात्मक ऊर्जा निर्माण करतात.”

कार्यक्रमातील विशेष आकर्षण ठरलेल्या भीमगीत प्रकाशन सोहळ्यात संस्थेचे सदस्य विलास सूर्यवंशी लिखित भीमगीताचे प्रकाशन मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. गाण्याच्या ताल, ठेका आणि लयीवर उपस्थित रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत साथ दिली.

पत्रकारिता क्षेत्रातील योगदानाबद्दल दैनिक नवशक्तीचे संपादक प्रकाश सावंत तसेच गुहागर सत्ताचे संपादक राजेंद्र मांडवकर यांना “दिनकर पत्रकारिता गौरव सन्मान” प्रदान करण्यात आला.

समाजसेवा आणि सांस्कृतिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल परळ येथील स्वामी संस्थेला “दिनकर रुग्ण सेवा सन्मान”, तितिक्षा इंटरनॅशनल, पुणे संस्थेला “दिनकर साहित्य व कला सेवा सन्मान”, मुंबईतील मैत्री संस्था तसेच संजीवनी सेवाभावी सामाजिक संस्था यांना “दिनकर सेवा सन्मान” प्रदान करण्यात आला.

साहित्य क्षेत्रातील योगदानाबद्दल डॉ. स्मिता निखिल दातार यांना “दिनकर साहित्य सन्मान” (सर्वोत्कृष्ट कादंबरी – “एक होती हिडिंबा”), डॉ. मानसी पाटील यांना “दिनकर साहित्य सन्मान” (सर्वोत्कृष्ट काव्यसंग्रह – “मनगाभारा”), डॉ. योगेश जोशी यांना “दिनकर साहित्य सन्मान” (सर्वोत्कृष्ट माहितीग्रंथ – “वंद्य वंदे मातरम्”) तसेच वारकरी प्रकाशनचे राहुल मुंढे यांना “दिनकर साहित्य सन्मान” प्रदान करण्यात आला.

प्रायोगिक रंगभूमीवरील वैविध्यपूर्ण प्रयोगांसाठी प्रा. अरविंद निगळे यांना “दिनकर रंगकर्मी सन्मान” प्रदान करण्यात आला. पॅरिस ऑलिम्पिकसह अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये चेसबॉक्सिंग प्रकारात भारताचे प्रतिनिधित्व करून सुवर्ण आणि रौप्य पदक पटकावणाऱ्या स्नेहा वायकर यांना “दिनकर खेलरत्न सन्मान” देऊन गौरविण्यात आले. उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्यांच्या यशाचे अभिनंदन केले.

साईनाथ रामपूरकर आणि विजय निगडकर यांना “दिनकर सेवा सन्मान”, समीर करंगुटकर यांना “दिनकर कला गौरव सन्मान”, शरद दळवी यांना “दिनकर शिक्षण सन्मान”, अनुज केसरकर यांना “दिनकर साहित्य सन्मान” तसेच पीयूष मनसुख कारिया यांना “दिनकर भाषा गौरव सन्मान” प्रदान करण्यात आला.

कार्यक्रमात आयोजित कविसंमेलन आणि अभिवाचन कार्यक्रमाने उपस्थित रसिकांना मंत्रमुग्ध केले. ज्योती राखुंडे, विवेक वसंत जोशी, सीमा खान शेख, रूपाली निलेश जाधव, कल्पना दिलीप मापूसकर, धनंजय पांडुरंग पाटील, सरोज सुरेश गाजरे, कल्पना उबाळे, प्रकाश वानखेडे, अपर्णा अनिल पुराणिक, डॉ. मानसी पाटील, कृपा राकेश म्हात्रे आणि मनोहर वाळिंबे यांनी कविता सादर केल्या. अदिती अजित नैराळे, मीनल शेकटकर कांबळे, चंद्रकांत दढेकर आणि नमिता नितीन आफळे यांनी प्रभावी अभिवाचन सादर केले. सहभागी साहित्यिकांचा सन्मानचिन्ह, शाल आणि पुस्तक देऊन गौरव करण्यात आला.

कार्यक्रमाच्या आयोजनात विशेष सहकार्य करणाऱ्या राकेश तळगावकर आणि कामाक्षी क्रिएटिव्ह टीमचा “दिनकर सेवा सन्मान” प्रदान करून विशेष सत्कार करण्यात आला. त्यावेळी श्रद्धा कानडे, प्रेरणा साळकर, विनय कांबळे आणि छायाचित्रकार समीर चव्हाण उपस्थित होते.

कार्यक्रमाला शुभेच्छा देण्यासाठी विश्वभान प्रतिष्ठानचे प्रा. जगदीश संसारे, आयआयटी पवईचे मिलिंद मिरजकर, मुंबई महापौर आदर्श शिक्षिका पुरस्कार प्राप्त व साहित्यिका जयश्री हेमचंद्र चुरी तसेच कॅटरिंग असोसिएशनचे पदाधिकारी शंकर शेट्टी उपस्थित होते.

नमिता नितीन आफळे यांच्या प्रभावी सूत्रसंचालनाने संपूर्ण कार्यक्रमात उत्साह, नेमकेपणा आणि सांस्कृतिक भारदस्तपणा कायम राखला.

साहित्य, कला, पत्रकारिता आणि समाजसेवा क्षेत्रातील मान्यवरांना एकाच व्यासपीठावर गौरविणाऱ्या या सोहळ्याने उपस्थितांची मने जिंकली. साहित्य, कला आणि समाजसेवेचा सुंदर संगम घडवणारा हा सोहळा उपस्थितांसाठी संस्मरणीय ठरला.

प्रतिक्रिया व्यक्त करा