You are currently viewing तुझ्या पाऊलांनी

तुझ्या पाऊलांनी

जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य लेखक कवी दीपक पटेकर यांचा अप्रतिम ललितलेख

मातीने माखलेल्या तांबड्या बुंद रस्त्यांनी हिरव्यागार साडीवर रानफुलांची वेणी माळावी तशी रस्त्याच्या कडेला रानफुले अगदी मनसोक्त फुलली होती….वाऱ्याच्या मंद झुळुकेने मस्तीत डौलाने डुलत होती….पवन स्पर्शाने बावरलेल्या कुसुमदलांनी सारा आसमंत गंधाळून सोडला होता…. रस्त्यावरच्या लाल धुळीने माखलेल्या तृणांच्या पाती त्या कोवळ्या कुसुमदलांच्या घर्षणाने शहारत होत्या….मोहित होत होत्या.
गंधाळलेल्या लाल बुंद रस्त्याने एक अस्पष्ट चेहरा दूरवरून माझ्या दिशेने येताना दिसत होता…हळुवार वाहणाऱ्या वाऱ्यावर तिचे रेशमी केस हवेत झोका घेत होते….वाऱ्यावर उडणाऱ्या केसांशी स्पर्धा करत तिच्या साडीचा पदर खडकावर आदळणाऱ्या लाटांसारखं उंच झेपावत होता….आणि पुन्हा सागरात जाऊन विसावणाऱ्या लाटांप्रमाने अंगाशी येऊन बिलगत होता…जणू काय तिच्या शरीराच्या आंतरिक ओढीने तो खेचला जात होता…..शरीराला लपेटून जणू मिठीच मारत होता….जसजशी ती जवळ आली…तेव्हाच धुक्याची चादर दूर होऊन तिचा मोहक चेहरा स्पष्टपणे दिसू लागला….हवेतील बाष्पकणांनी तिच्या रेशमी केसांवर गर्दी केली होती….झाडावरून टपकणारे दवबिंदूंचे तुषार तिच्या अंगा अंगावर सांडले होते…दवबिंदूंच्या गारेगार स्पर्शाने आणि हवेतील गारव्याने तिचे अंग शहारले….अन नाजूक कोमल तनावर रोमांच उभे राहिलेले…
ती….माझ्या आयुष्यात उमललेलं भावफुल….जेव्हा ती नजरेसमोर आली तेव्हाच उमजले… होय हिच ती….माझी स्वप्नसुंदरी…

*तुझ्या पाऊलांनी*
*भाग्य माझे उजळले*
*अंतरीचे भावफुल ते*
*हृदयी माझ्या फुलले*

ती….नखशिखांत सुंदर…पौर्णिमेच्या चंद्रालाही लाजवेल असा असा गोरा…गोमटा… लावण्याने सजलेला…सुंदर मुखडा…गालावर खळी… ओठांवर हलके हास्य अन नशीली अदा…. भाळी अर्ध चंद्रकोर…नाकात नथनी…कर्णीयांत डुलणारी मोहक कर्णफुले…खांदावर रुळणारे रेशमी केस अन सौंदर्याला साजेशीच गोऱ्या गुलाबी तनावर शोभणारी मोरपंखी रंगाची नक्षीदार साडी…जणू हिरव्यागार निसर्गात फुललेले ते एक …भावफुलच…
तुझ्या पाऊलांनी उंबरठा ओलांडूनी…. तू जीवनी आलीस….भाग्य माझं तेव्हाच उजळले….सूर्याच्या सोनेरी किरणांनी दारातुनी आंत यावे अन सारे घर सोन्याने मढवून टाकावे…तशीच तू आयुष्यात आलीस अन माझं जीवन तुझ्या येण्याने सुखमय…आनंदमय करून सोडले…
आठवणीतील ती पहिली बेधुंद रात्र….अन तुझं खुलून उठणारे…नशा चढवणारे…बेभान करून सोडणारे सौंदर्य…..तो नाजूक स्पर्श….अंगावर उभे राहणारे…रोमांचित करणारे शहारे…फुलपाखराने यावे अन हळुवारपणे कुसुमदलांवर बसून पुंकेसरातून अमृत शोषून तन मन तृप्त करून सोडावे….तशाच तुझ्या ओठांच्या पाकळ्या उमलल्या अन तुझ्या नी माझ्या मिलनाने तृप्त झाल्या…..हेमंत ऋतूतील गारठ्यातही सर्वांगावर अग्नीज्वाला भडकवून गेल्या…
खरंच….तुझ्या पाऊलांनी उजळलेलं माझं जीवन आज सर्वस्वी तुझंच आहे…..बकुळीने अंगणी फुलावे अन सारे अंगण…घर सुगंधीत करावे….तशीच आहेस तू…..जीवनी आलीस अन जीवन सुगंधीत करत राहिलास…..कायमचीच बकुळी सारखीच….!!!

©[दिपी]🖋️
दीपक पटेकर, सावंतवाडी
८४४६७४३१९६

प्रतिक्रिया व्यक्त करा

1 × 5 =