You are currently viewing प्रजासत्ताक दिन चिरायू होवो
  • Post category:लेख
  • Post comments:0 Comments

प्रजासत्ताक दिन चिरायू होवो

*माझी लेखणी समूहाच्या संस्थापिका कवयित्री लेखिका सौ.आम्रपाली घाडगे (आमु) यांचा प्रजासत्ताक दिनाच्या औचित्य साधून लिहिलेला अप्रतिम लेख

अचानकच खिडकीच्या दिशेकडून म्युझिक सिस्टिमवर मोठ्या आवाजात वाजणारा गाण्याचा अस्पष्ट आवाज कानी ऐकू येऊ लागला. हातातल्या कामाकडे दोन मिनिटं दुर्लक्ष करून वाजणारे गाणे एकाग्रतेने ऐकण्याचा प्रयत्न करू लागले. आपोआप कुतूहलतेने पावले खिडकीकडे वळली तेव्हा तो गाण्याचा आवाज स्पष्टपणे ऐकू येऊ लागला. “ए मेरे वतन के लोगों, जरा आँख में भरलो पानी” खिडकीजवळ जाताच समोरील दृश्य पाहून आणि गाणे ऐकून लक्षात आले की आज २६ जानेवारी , आपला राष्ट्रीय सण आहे आणि माझं मन नकळत भूतकाळात गेले.

नववर्षाभिनंदन करण्यात आणि उरल्या सुरल्या मित्र मैत्रिणींना चार आण्याचे भेटकार्ड देण्यात दोन तीन दिवस सहज जायचे आणि मग उत्सुकता असायची ती त्या वर्गांमध्ये फिरणार्‍या नोटीस रजिस्टरची. जानेवारीची चार पाच तारीख झाली की नोटीसचे रजिस्टर घेऊन शाळेचे शिपाई मामा वर्गात यायचेच.आमच्याकडे पाहून लागा तयारीला आता अशा सहेतूक नजरेने पाहून हसतमुखाने निघून जायचे. २६ जानेवारीची तयारी म्हटलं की आमच्या शाळेत जणू घरचाच एखादा शुभकार्य सोहळा असायचा. त्यातच हिवाळ्यातील थंडीचे दिवस निसर्ग पण कमालीचा बहरलेला असायचा. सर्व आवडीची फुले याच दरम्यान फुलायची.जाई,जुई,झेंडू,कुंद, गुलाब ,केवडा,शेवंती,चांदीपाट (तगर) अहाहा! आणि हा नयनरम्य देखावा आमच्या शाळेच्या आवारातच फुललेला असायचा.

आमच्या शाळेचे मोठे आवार होते,ज्यावर आम्ही सराव करायचो. जेव्हा सव्वीस जानेवारीचा कार्यक्रम ठरवला जायचा तेव्हा कुठला विद्यार्थी कुठल्या सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग घेणार हे त्यावेळीं आमचे गुरुवर्यच ठरवायचे. मुलांच्या विविधांगी कलेचे,कौशल्याचे वर्षभर व्यवस्थित निरीक्षण करूनच त्या मुलांची योग्य ती निवड केली जायची. काही विद्यार्थी अष्टपैलू असायचे त्यात आम्ही पण आलोच; त्यांना मात्र सगळीकडे सहभागी होणे अक्षरशः बंधनकारक असायचे. मग गीत गायन असो की लेझिम असो डम्बेल्स असो भाषण, निबंध ,रांगोळी आणि अशाच कित्येक क्रिडास्पर्धेचे पण नियोजन असायचे आणि मग स्पर्धेसाठी सुरू व्हायचा तो सराव तो ही अगदी कसून
पण खरंच सांगायचे म्हणजे ज्यावेळी आम्ही प्राथमिक शिक्षण घेत होतो त्यावेळी प्रजासत्ताक दिन याचा खरा अर्थच माहिती नव्हता; पण तरीही त्यावेळीं आमच्या निरागस मनात एक वेगळीच राष्ट्रप्रेम जागृती व्हायची.पंचवीस जानेवारीला तर आम्ही या देशप्रेम ऊर्जेमुळे संपूर्ण शाळा, वर्ग, क्रिडांगण अगदी नव्या नवरीला नटवावे तसे नटवायचो.आमच्या काळात सजविण्यासाठी विशेष काही वस्तुही नसायच्या केवळ एक वस्तू ती म्हणजे पतंगाचा विविधरंगी कागद आणि घरून तयार करून आणलेली गव्हाच्या पिठाची खळ. आम्ही वर्ग आणि शाळेचे भलेमोठे क्रिडांगण झाडून झटकुन घ्यायचो. मग प्रत्येक विद्यार्थ्यांला किंवा तिघा चौघांचा समूह करून ठराविक कामं हाती घ्यायचो जसं एकाने पताका कापायच्या मग छोट्या मुलांनी प्रत्येकाला एक रंग देऊन ती कापलेली पताका घेऊन त्या पताका दुसऱ्या विद्यार्थी गटाकडे जे ती पताका सुतळीला खळीने चिटकवायचे काम करायचे. त्यांना अगदी शिस्तीत नेऊन द्यायचे.मग त्या तयार पताकाची सुतळी मोठे विद्यार्थी शाळेच्या आवारात बांधत असत आणि मग उरलेल्या पताका मिळवण्यासाठी आम्ही धडपड करायचो. ते आपापले वर्ग सजवण्यासाठी. सायंकाळचे पाच सहा वाजेपर्यंत तरी आम्ही शाळेतच असायचो.त्यावेळी हे सर्व करण्यासाठी आम्हाला आमच्या कुठल्याही गुरुजनांचा प्रतिबंध कधीच नसायचा. ती आमचीच आवड होती आणि आमचे पालक सुध्दा त्यावेळी आमच्या सुखात सुख मानायची.
मग सजावटीचे काम झाले की आठवण यायची ते उद्याच्या सकाळच्या तयारीची मग लगबगीने घरी जायचो आणि मग आमच्या स्वतःच्या सजावटीच्या तयारीला लागायचो. शाळेचा गणवेश स्वच्छ धुऊन इस्त्री करून ठेवणे, सॉक्स, बूट जोडी तयार करून ठेवणे, कधी भाषण कधी गीत गायन असेल तर त्याचीही रंगीत तालीम घरच्या घरी करणे असा एकंदरीत पूर्वतयारीत दिवस जायचा. मग उगवायची प्रजासत्ताक दिनाची रम्य पहाट; पहाटे पाचला उठून पटापट सर्व उरकून तयार होऊन शाळेचा ढोल वाजायचा त्या दिशेने पळत सुटायचो. त्या सुंदर सकाळी शाळा पण कशी नटून थटून बसलेल्या ललनेसारखी सुंदर दिसायची. सर्व मुलं मुली अगदी नुकत्याच उमलल्या फुलासारखे ताजेतवाने आणि टवटवीत दिसायचे. क्रिडांगणावर आखलेल्या पांढर्‍या रंगाच्या पट्ट्यात आम्ही सर्व विद्यार्थी वर्गानुसार जाऊन उभे राहायचो आणि मग हातात हात घालून दोन दोन जणांची रांग करून प्रभात फेरीला सुरुवात व्हायची.आमच्या संपूर्ण परिसरातून प्रभातफेरी निघायची. आमच्या वेगवेगळ्या जय घोषणांनी संपूर्ण परिसर अगदी निनादून जायचा आणि आमचा तो देशप्रेम उत्साह पाहण्यासाठी घरातला प्रत्येक जण उत्साहाने आपल्या दारात किंवा गल्लीच्या तोंडावर येऊन उभा राहायचा. कुठून यायचा तो उत्साह ? काय होता प्रजासत्ताक ? कशासाठी होता ? आमच्या कोवळ्या मनाला त्याचा जराही गंध नव्हता; तरीही प्रत्येक कोवळे मन अगदी बेंबीच्या देठापासून “प्रजासत्ताक दिन चिरायू होवो” ही घोषणा अगदी घसा बसेपर्यंत देत असे. कसला स्वार्थ नाही की कशाचा मोठेपणा नाही की समाजाकडून कसलीच अपेक्षा नाही. कारण होते ते बालमन निरागस, निर्हेतुक.
मग शाळेच्या क्रिडांगणावर सर्वांनी येऊन रांगेत उभे राहून टाचणी पडेल तर आवाज होइल इतक्या शांततेत ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पाडायचा.मग विविध स्पर्धा,लेझिम,छोटासा सांस्कृतिक कार्यक्रम व्हायचा. हे सर्व पाहण्यासाठी प्रत्येक पालकांनाही आवर्जून निमंत्रित केले जायचे. शाळेचा परिसर अगदी खचाखच भरून जायचा.शेवट व्हायचा तो आवडीच्या गोष्टीने जो की आम्हाला गोड खाऊ मिळायचा. त्यात ही एक शिस्त असायची तो खाऊ खायचाच थोडाही न खाली पाडता कारण तो राष्ट्रीय सणाचा प्रसाद असायचा.

अचानक खाण्यावरून आठवले आणि परत वर्तमानात आले चेहऱ्यावर आणि मनात राष्ट्रप्रेम तसंच होत आणि सोसायटीतल्या जय हिंद जय हिंदच्या गाण्यासोबत मी पण गुणगुणत नाश्त्याची तयारी करू लागले.

आम्रपाली घाडगे (आमु)

प्रतिक्रिया व्यक्त करा

16 − thirteen =