You are currently viewing तुझ्या वाचून करमेना अन तुझ्याशिवाय जमेना

तुझ्या वाचून करमेना अन तुझ्याशिवाय जमेना

नेत्यांच्या पत्रकार परिषदा विकासावर कधी होणार?

संपादकीय….

सावंतवाडी नगरपालिकेच्या निवडणुका येत्या काही काळात होण्याच्या दृष्टीक्षेपात असतानाच भविष्यात होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीची तयारी म्हणजे लग्नाच्या आधीच वरात अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. सावंतवाडी नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडीत गेल्या पाच वर्षात कोणी काय विकास केला याचे मोजमाप जनतेच्या दरबारात ठेवण्यापेक्षा आणि भविष्यात सावंतवाडी शहरासाठी आपले विकासात्मक व्हिजन काय असेल याचा आराखडा शहरवासीयांना न दाखवता कुराघोडीचे राजकारण जन्म घेत असल्याचे पुरावेच जनतेच्या दरबारात सादर होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे सावंतवाडी वासीयांचे मात्र बिन तिकिटाचे मनोरंजन होत आहे.
दोन दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेत आमदार दीपक केसरकर यांनी भविष्यातील विधानसभेसाठी सावंतवाडी मतदारसंघातून महिलेला उमेदवारी देण्याबाबत सूचक विधान केले होते. राजकारण म्हटल्यावर असे छोटेमोठे बॉम्ब फुटतच असतात, परंतु त्याला हवा दिली की त्याची आग पसरते. त्यामुळे राजकीय बॉम्ब गोळ्यांना कित्येकदा उत्तर न देता आपल्या कामातून शांत करणे शहाणपणाचे ठरत असते. केसरकर यांनी महिलेला उमेदवारी देण्याबाबत विचार व्यक्त करून मागील निवडणुकीत ही आपली शेवटची टर्म असणार असे म्हटलेले खरे करण्याचा प्रयत्न केलेला दिसून येतो. त्यामुळे पुढील विधानसभेसाठी केसरकर शिवसेनेकडून उमेदवार नसतील अशी माहिती त्यांच्याच वक्तव्यावरून समजते.
आमदार दीपक केसरकर यांच्या विधानावर विरोधकांकडून प्रतिक्रिया येणार नाही असं होणारच नाही हे निश्चित होतं. कारण तुझ्याशिवाय करमेना आणि तुझ्यावाचून जमेना हीच तर राजकारणाची परिस्थिती असते. केसरकरांच्या विधानावर सावंतवाडीत माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी पत्रकार परिषद घेत दीपक केसरकरांवर निशाणा साधला. दीपक केसरकर यांना मातोश्रीच्या उंबऱ्याच्या आत प्रवेश नाही, ते उमेदवार कसा काय ठरविणार? असा प्रश्न उपस्थित करत केसरकरांची पक्षात किंमत राहिली नसल्याचेही विधान केले. महाविकास आघाडी करून लढण्याची भाषा करणाऱ्या केसरकरांनी हिम्मत असेल तर शिवसेना म्हणून लढून दाखवावे. केसरकरांच्या कोट्यवधींच्या घोषणा म्हणजे येड्यांची जत्रा. सावंतवाडी विधानसभेला महिला उमेदवार देण्याची घोषणेचे आपण स्वागत करतो, परंतु केसरकरांमध्ये लढण्याची हिम्मत नसल्यानेच त्यांनी माघार घेतल्याचेही सांगितले.
सावंतवाडी शहराचे जबाबदार माजी नगराध्यक्ष म्हणून केलेली ही वक्तव्ये केवळ शहरवासीयांचे मनोरंजन करून गेली. सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रत्येकाच्या मोबाईल मध्ये चित्रफिती वाजत होत्या आणि लोक हसून त्याचा आस्वाद घेत होते, काही ताशेरे ओढत होते तर काही खिल्ली उडवत होते. त्यामुळे 5G कडे झेपावणाऱ्या युगात राजकारणातून येणारी वक्तव्ये कोणी गंभीरपणे घेत नसून मनोरंजनाचे साधन म्हणूनही त्याचा उपयोग केला जातो. सावंतवाडीचे नगराध्यक्ष असताना केसरकरांनी सावंतवाडीला विकास काय असतो हे दाखवून देतानाच शहरात गार्डन, प्रशस्त रस्ते, पादचार्यांसाठी, मॉर्निंग, इव्हनिंग वॉकसाठी फुटपाथ, इंदिरा गांधी कॉम्प्लेक्स, सुविधांसहित मासळी मार्केट, लोकांचा विरोध मोडीत काढून मोकळा श्वास घेणारी बाजारपेठ, अशा एक ना अनेक विकासाच्या संकल्पना प्रत्यक्षात आणल्या होत्या. त्यामुळेच सायंकाळी विरंगुळ्यासाठी सावंतवाडीकर आज तलावाच्या काठावर, गार्डन मध्ये निवांत बसू शकतात. गेल्या दोन वर्षात पॉम्पस हॉटेलसमोरील उखडलेल्या फुटपाथच्या फरशा देखील बसवलेल्या नाहीत त्यामुळे लोकांना तलावाच्या काठावर फिरताना त्रास होतो, शहराचा पाणीपुरवठा तर दिवसाच्या कोणत्या वेळेत होतो हे देखील समजत नाही. शहरात गटारातच इमारती, बंगल्याचे ड्रेनेज सोडले जात आहे, त्यामुळे दुर्गंधी पसरली आहे, डासांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर झाला आहे. डास निर्मूलननासाठीची फवारणी तर होताना दिसलीच नाही. अशा एक ना अनेक समस्या आ-वासून उभ्या असताना विकासावर बोलण्यापेक्षा टीकाटिप्पणी करण्यातच राजकारणी धन्यता मानत आहेत.
एकीकडे वेंगुर्ला सारखे शहर विकास साची स्पर्धा करत आहे, तर सावंतवाडीत विकास शोधावा लागत आहे अशी परिस्थिती असताना जनतेशी कसलेही देणेघेणे नसलेले राजकारणी केवळ आपली पोळी भाजून घेण्यासाठी राजकारण करत असून त्यातून मनोरंजन होतं, परंतु शहरवासीयांच्या हिताचा एकही निर्णय होत नाही.
शहराच्या विकासाशी कोणतेही सोयरसुतक नसणाऱ्या राजकीय लोकांना शहरवासीयांनी देखील निवडणुकीतून योग्य ते उत्तर देणेच आवश्यक आहे, अन्यथा भविष्यातील पाच वर्षे दडखील केवळ मनोरंजनावरच वाया जातील यात शंकाच नाही.

प्रतिक्रिया व्यक्त करा