You are currently viewing कणकवली नगरपंचायततर्फे कोविड सेंटर पुन्हा सुरू करणार – नगराध्यक्ष समीर नलावडे

कणकवली नगरपंचायततर्फे कोविड सेंटर पुन्हा सुरू करणार – नगराध्यक्ष समीर नलावडे

जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी व पुरेसा कर्मचारी, डॉक्टर वर्ग द्यावा

कणकवली

सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनाची वाढती रुग्ण संख्या विचारात घेत जिल्हाधिकाऱ्यांनी कोविड केअर सेंटर उभारण्याबाबत सूचना दिल्या आहेत. कणकवली नगरपंचायत कोविड रुग्णांकरिता यापूर्वी सुरू केलेले कोविड केअर सेंटर पुन्हा सुरु करण्यास तयार आहे. मात्र त्याकरिता जिल्हाधिकाऱ्यांनी नगरपंचायतच्या कोविड केअर सेंटर करिता पुरेसा कर्मचारी वर्ग व डॉक्टर उपलब्ध करून द्यावे अशी मागणी कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी केली आहे. नगरपंचायतच्या वतीने कोविड सेंटर च्या माध्यमातून मोफत सेवा दिल्याने गोरगरीब रुग्णांना मोफत सेवा दिली होती. जिल्हाधिकार्‍यांनी आता पुन्हा एकदा नगरपंचायतीच्या कोविड सेंटरला परवानगी दिल्यास गोरगरीब रुग्णांना या कोविड सेंटरचा फायदा होणार आहे. कणकवली नगरपंचायतच्या वतीने या पूर्वी सुरू केलेल्या कोविड केअर सेंटर मध्ये पुरेशा सुविधा देण्यात आल्या होत्या. रुग्णांमधूनही या कोविड केअर सेंटर बाबत समाधान व्यक्त केले होते. या कोविड केअर सेंटर मध्ये दिलेल्या सुविधांमुळे येथे एकही कोविड रुग्णांचा मृत्यू झालेला नाही. मात्र त्यानंतर कोविड रुग्णांची संख्या कमी झाल्यामुळे शासन आदेशानुसार कोविड केअर सेंटर बंद करण्यात आले होते. मात्र आता जिल्ह्यात पुन्हा कोविड रुग्ण वाढू लागल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी कोविड केअर सेंटर सुरू करण्या बाबत सूचना दिल्या आहेत. कणकवली नगरपंचायत त्या दृष्टीने तातडीने पावले उचलण्यास सज्ज आहे. मात्र याकरिता आवश्यक असणारा आरोग्य कर्मचारी वर्ग व डॉक्टर उपलब्ध करून दिल्यास रुग्णांना योग्य उपचार व सुविधा देणे नगरपंचायत ला शक्य होणार आहे. त्यामुळे जिल्हाधिकार्‍यांनी याबाबत नगरपंचायतला कोविड सेंटर सुरू करण्यास परवानगी देऊन सहकार्य करावे. यामुळे रुग्णसंख्या रोखण्यासाठी व कोविड रुग्णांना वेळेत योग्य ते उपचार देण्यासाठी नगरपंचायत प्रयत्न करू शकते अशी माहिती नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा