You are currently viewing कोकणातील साळशी येथे प्रथमच सापडली उभ्या दगडावरील दोन कातळशिल्प

कोकणातील साळशी येथे प्रथमच सापडली उभ्या दगडावरील दोन कातळशिल्प

देवगड :

 

साळशी येथील नैसर्गिक व्हाळा लगतच एक प्राचीन पुष्करणी आहे. या भागात नुकतेच सिमेंट काँक्रीटचा बंधारा घालुन धरण बांधण्यात आले. तेव्हा या भागातील वाढलेले जंगल तोडुन साफसफाई करण्यात आली. धरणा लगतच एक दहा-पंधरा फुट उंचीची मोठी धोंड असून या दगडावर काहीतरी लिपी कोरलेली आहे असे वाटल्याने साळशी येथील श्री. मुकुंदकाका भटसाळस्कर यांनी इतिहास संशोधन मंडळाच्या श्री. योगेश धुपकर यांच्या कानावर ही गोष्ट घातली. कोणता तरी शिलालेख सापडलाय हे कळताच तातडीने साळशी मोहीम दिंनाक १७ मार्च रोजी आयोजित करण्यात आली. यावेळी इतिहास संशोधन मंडळाच्या संशोधकांना दोन पेट्रोग्लिफ्स म्हणजेच कातळचित्रे सापडली आहेत. इथे या नैसर्गिक भव्य दगडावर एका बाजुस दगड तासुन सपाट केला आहे. त्यावर दोन प्राणी कोरलेले आहेत.

साळशी इथल्या या कातळचित्रा विषयी अधिक माहीती सांगताना पुरातत्व अभ्यासक श्री. रणजित हिर्लेकर म्हणाले, “आता पर्यंत गेल्या काही वर्षांमधे रत्नागिरी पासून कुडाळ वेंगुर्ल्या पर्यंत दिड हजारहुन अधिक कातळचित्रे अनेक संशोधकांच्या व हौशी अभ्यासकांच्या प्रयत्नातुन उजेडात आली आहेत. ही सर्वच कातळचित्रे जमिनी लगत सपाट कातळावर कोरलेली आहेत. जमीनी लगत सपाट कातळावर कोरलेली कातळचित्रे हे कोकणचे वैशिष्ठ्य आहे. अफगाणिस्थान, गांधार, काश्मीर या भागातील जी कातळचित्रे आढऴतात ती उभ्या दगडांवर कोरलेली आढळतात. अशी उभ्या दगडांवरील कातळचित्रे अपवाद वगळता कोकणात आजवर कुठेही आढळलेली नाहीत. साळशी येथील उभ्या दगडावरील ही अशी दोन कातळचित्रे कोकणातील प्रथमच सापडली आहेत. त्यामुळेच साळशी येथील ही कातळचित्रे विशेषत म्हणावी लागतील.” या कातळचित्रांचा शोध घेण्याच्या या मोहीमेत श्री. रणजित हिर्लेकर यांचे सोबत, श्री. योगेश धुपकर व अजित टाककर हे सहभागी होते. अशा रितीने देवगड तालुक्यातील कातळचित्रांच्या यादीत एक वेगळ्या वैशिष्ठ्यपुर्ण कातळचित्राची भर पडली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

17 + 13 =