You are currently viewing “प्रवाही मतदार… आणि प्रवाही कार्यकर्ते”….. 

“प्रवाही मतदार… आणि प्रवाही कार्यकर्ते”….. 

सिंधुदुर्ग :

निवडणूका, मतदार आणि कार्यकर्ते ही एक गंमतच आहे. नाथ पै, मधु दंडवते, अटलजी,जॉर्ज फर्नांडिस, रामभाऊ म्हाळगी अशा काही राजकीय पटलावर होवून गेलेल्या तपस्वीकडे राष्ट्र उभारणीचं, समाजबांधणीच ध्येय होत. या समर्पित देशभक्तांचे विचार ऐकण्यासाठी लोकं आतुर झालेले असायचे. हा इतिहास झाला. यापुढे कधीही राजकारणात अशी हिमालयाची उंची असणारी कर्तबगार समर्पित माणसं मिळणे फारच कठीण.

भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांनी लोकशाहीची चौकट घटनेच्या माध्यमातून तयार केली… पण आजची निवडणूक प्रक्रिया आणि टोकाच्या वाममार्गाने सत्ता काबीज करण्यासाठी कार्यरत असलेले सर्वच राजकीय पक्ष आणि नेते तसेच वाममार्गाने मिळवलेल्या पैशावर पोसलेल्या गुंडाच्या टोळ्या यांचा सहजपणे वापर यामुळे या देशातील लोकशाही ही आता व्हेंटिलेटरवर असून ती शेवटची घटका मोजत आहे. चाळीस वर्षांपूर्वी लोकसभेत किंवा राज्याच्या विधानसभेत जनतेच्या प्रश्नावर व्यापक चर्चा व्हायची. सत्ताधारी व विरोधक हे एका वैचारिक आणि जनसामान्यांचे कल्याण याला प्राधान्य देवून वैचारिक मांडणी करायचे. याचा तपशील आपल्याला पेपरमध्ये किंवा आकाशवाणीवर ऐकायला मिळायचा. आज कोट्यवधी रूपयांचा चुराडा करून संसदेच व विधानमंडळाचं कामकाजाचं प्रक्षेपण केल जात. ज्यामध्ये हाणामाऱ्या, टिवल्याबावल्या, असंस्कृत, असंबद्ध आणि असंसदीय प्रसंग पहावे लागतात.

बँका किंवा काही आर्थिक संस्थाच्या निवडणूकीत कोट्यवधी रुपयांचा वापर करून त्या संस्था ताब्यात ठेवण्याचा सगळेच राजकीय पक्ष आटोकाट प्रयत्न करत असतात.. एक मत दोन लाखाना,तीन लाखाना विकत घेतल… अशी जेव्हा चर्चा होते… त्या अफवा मुळीच नसतात… ते एक भीषण वास्तव आहे… एक मतदार जेव्हा त्याच्या कुटुंबासह मतदान होईपर्यंत एखाद्या आलिशान हॉटेलमध्ये ठेवायचा. दोन दिवस मस्त मजा करायची.. दारू, मटण, मासे यावर यथेच्छ तावं मारायचा एवढचं नव्हे तर आपल्या मताचा तब्बल एक लाख रूपयाला सौदा करायचा. अर्थात ज्या “तथाकथित चारित्र्यवान उमेदवाराने दुरद्रुष्टी ठेवून ही या धंद्यात गुंतवणूक केलेली असते तो त्या आर्थिक संस्थेवर निवडून गेल्यावर ती संस्था लुटण्यासाठी सज्ज असतो. या सगळ्यात चिड आणणारी गोष्ट ही आहे.. मतदारांचा हा सौदा करण्यासाठी स्वच्छ आणि चारित्र्यवान चेहऱ्याचा बुरखा पांघरलेल्या “प्रवाही” कार्यकर्त्याकडे ही जबाबदारी सोपवलेली असते… आणि अगदी ही जबाबदारी तो चोख पार पाडत असतो कारण ताब्यात आलेल्या आर्थिक संस्थेमध्ये भविष्यातील लाभाकडे त्याची नजर असते… सर्वसामान्य कार्यकर्त्याला आता निवडणूका हा शब्दच विसरायला पाहिजे. .. कारण आता दिवसेंदिवस ‘मतदार आणि कार्यकर्ते दोघेही फारचं प्रवाही झालेले आहेत….

प्रतिक्रिया व्यक्त करा

four × 4 =