You are currently viewing उत्कटता नववर्षाची.
  • Post category:कथा
  • Post comments:0 Comments

उत्कटता नववर्षाची.

सावित्रीच्या लेकी, नेशन बिल्डर, आदर्श शिक्षिका पुरस्कार प्राप्त, विविध वर्तमानपत्रातून सातत्याने लिखाण करणाऱ्या लेखिका, कवयित्री सौ सुजाता पुरी यांचा नव्या वर्षाच्या प्रारंभावर लिहिलेला अफलातून लेख

*नव वर्षाच्या आरंभी*
*आली चेहऱ्यावर झळाळी*
*मनामनात संकल्प नवे*
*आयुष्याला आली नव्हाळी*

झाडं तीच असतात पण प्रत्येक ऋतूत येणारा बहर मात्र नवा असतो. रात्र तीच असते पण दररोज येणारा सूर्योदय मात्र नवा असतो. अगदी त्याच प्रमाणे वर्ष येतात वर्ष जातात, परंतु नव्या वर्षाचा आरंभ हा काही नवीन आनंद देणारा असतो. आयुष्यातून दूर जाणाऱ्या प्रत्येक गोष्टीला हसून निरोप देता आलं कि माणसाचं जगणं सोपं होत असतं म्हणूनच आपणही आनंदाने सरत्या वर्षाला निरोप देत असतो. तो निरोप देत असताना मनात गर्दी होत असते ती असंख्य भल्या बुऱ्या आठवणींची आणि नकळत घडलेल्या घटनांची. कोरोनामुळे लगतच्या दोन वर्षात जे वर्ष सरले याचे दुःख मानावं कि नवीन वर्षाचे स्वागत आनंदाने करावं हेच समजेनासे झाले आहे. कारण येणारा काळ,येणारे नवीन वर्ष कसे असेल, दुःख काय नि आनंद कसा आपल्या पुढ्यात असेल या कल्पनेने मन मात्र अगदी विचलित झाले आहे. या काळात आपल्या असंख्य जिवलग व्यक्तींना आपण कोरोणामुळे गमावले आहे. ज्यांच्या जीवनाची खात्री होती त्यांची जीवनज्योत कोरोणामुळे अचानक मालवली आहे आणि कित्येकांच्या आयुष्यात दुःखमय अंधकार पसरला आहे. परंतु थांबेल ते जीवन कसलं.असंख्य सुखदुःख पोटात घेऊन क्षणाक्षणाने चालत राहणे हाच जीवनाचा स्थायी स्वभाव आहे. म्हणूनच आज आपण या वर्षाच्या अंतात पोहोचलो आहोत. येणारा नवा सूर्य नवीन झळाळी आणि सगळ्या दुःखांचा अंधकार नाहीसा करणारा प्रकाश आणणार या कल्पनेने आपणही मनात आनंदी झालो आहोत.
अनेक जण नवीन वर्षाच्या स्वागतासाठी नव्या संकल्पना सह सज्ज झालेले आहेत. परंतु हा आनंद साजरा करताना निसर्ग प्रणालीत आपण व्यत्यय निर्माण करायला नको याचे भान मात्र प्रत्येकाने ठेवायला हवे. नाही तर शिक्षा द्यायला निसर्ग हजर असतो हे आपण अनुभवलेलंच आहे. पोटासाठी मरमर करणाऱ्या आणि दोन वेळच्या जेवणाची भ्रांत असणार्‍या लोकांनी नवीन वर्षाचा आनंद कसा साजरा करावा आणि जुन्या वर्षाचं काय आठवावं हा ही प्रश्न पडतो.

*भरून आली ओंजळ ज्यांची, त्यांनी दोन फुले द्यावी*
कवितेच्या या ओळी प्रमाणे आपणही नववर्षाचा आनंद बेफामपणे साजरा करताना कुठंतरी या जीवांचा विचार मनात जागा ठेवावा.
आज काल आनंद साजरा करण्याचे प्रकार आणि त्यातील वृत्ती पाहिली तर संवेदनशील मनाला धक्का पोहोचतो. आनंदाच्या कोणत्याही क्षणाला आता केक कापणे ही पाश्‍चात्त्य वृत्ती बळावत आहे.त्यात वावगे काही नसले तरी ती साजरी करण्याची पद्धत पाहता कुणाचा जीव जाईल अशा पद्धतीने आनंद साजरा करण्यात काय हाती येते हाच प्रश्न पडतो. पाश्चात्य पद्धतीचे अनुकरण करणे वाईट नसले तरी अनुकरण कोणत्या गोष्टींचे करावे हे समजण्याचे शहाणपण आपल्याजवळ असायला हवे. मागे एकदा सोशल मीडियावर वाढदिवस साजरा करताना मित्रांच्या ग्रुपचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यामध्ये केकचा नाकातोंडाला थापून वापर करून वाढदिवस असलेल्या मुलाचा जीव गेला होता. आनंद मिळवण्याची ही कुठली राक्षसी वृत्ती. आज काल काही ठिकाणी डीजेचा वापर ही इतक्या प्रचंड प्रमाणात होतो कि आपल्या आनंदामुळे इतरांना किती त्रास होतो याचे भानही आपल्याला राहत नाही. कोरोना काळात माणसे ऑक्सिजन अभावी तडफडून मरताना आपण पाहिली आहेत.ऑक्सिजनसाठी पैसे मोजताना ही आपण पाहिलेले आहे. त्यामुळेच आपल्याला निसर्गातून फुकट मिळणाऱ्या ऑक्सिजनची किंमतही समजली आहे. असे जरी असले तरी कोणत्याही आनंदाच्या क्षणी प्रचंड आवाज करणारे आणि प्रचंड प्रदूषण करणारे फटाके फोडायला मात्र आपण कमी करत नाही. आनंदाची ही कोणती हिडीस वृत्ती? खरंतर निसर्ग वेळोवेळी आपल्याला खुणावत असतो, इशारे देत असतो. परंतु आपण मात्र त्याकडे आपल्या आनंदाच्या भरात दुर्लक्ष करतो आणि आपल्याच पायावर आपण कुऱ्हाड मारून घेत असतो. आनंद साजरा करू नये असे माझं म्हणणं बिल्कुल नाही. परंतु आपल्या आनंदामुळे इतरांना त्रास होणार नाही. निसर्गाची हानी होणार नाही याची काळजी घेऊन साजरा केला जाणारा आनंद हा आनंदाचे डोही आनंद तरंग याच प्रमाणे वाढत जाणारा असतो. इतरांच्या दुःखाविषयी मनामध्ये संवेदनशीलता बाळगून सर्वांविषयी प्रेम आणि आदर बाळगून आपण ही अनोखा आनंद मिळवू शकतो.
नवीन वर्षाचा पहिला दिवस प्रसिद्ध असतो तो म्हणजे संकल्पासाठी. मनात संकल्प करायचे आणि ते पहिल्या दिवशी कसोशीने पाळायचे, इतर दिवसांचं माहित नाही बरं का. पण पहिल्या दिवशी मात्र संकल्प पाळलाच जातो. म्हणूनच गमतीने असं म्हटलं जातं कि नवीन वर्षाचा पहिला दिवस हा संकल्प वाल्यांचा असतो. असो. गमतीचा भाग सोडून देऊन आपण ही काहीतरी चांगलं करण्याचा संकल्प करूयात. मग त्यात वाचन असेल, लेखन असेल, निसर्गाची जोपासना असेल आणि अगदी माणुसकीने वागणेही असेल हे सुद्धा संकल्प छान आहेत. परंतु ते जर पूर्ण झाले तरच. आरोग्य राखण्याचा संकल्प ही उत्तमच. ज्या ज्या गोष्टीमुळे आपलं जगणं सुंदर होतं आणि त्याचबरोबर आपल्या अवतीभवती असणाऱ्या माणसांचेही जगणं सुंदर होतं त्याचं गोष्टी खर्‍या तर चांगल्या असतात. फक्त दिनदर्शिका संपली आहे म्हणून नवीन वर्षाचा आरंभ, नाही तर रात्रही तीच दिवसही तोच. माणसंही तीच आणि अवतीभवतीचा निसर्गही तोच. तरी ही आपण नव्याने धुंद व्हायचं आणि नव्या आनंदाने आनंदी व्हायचं.
सर्वांना या नववर्षाच्या मनापासून शुभेच्छा.
————————

प्रतिक्रिया व्यक्त करा