You are currently viewing स्वप्नांच्या दुनियेत…
  • Post category:लेख
  • Post comments:0 Comments

स्वप्नांच्या दुनियेत…

विविध वृत्तपत्रातून सातत्याने लिखाण करणाऱ्या आदर्श शिक्षिका, नेशन बिल्डर अवॉर्ड, सावित्रीची लेक पुरस्कार प्राप्त लेखिका, कवयित्री सौ.सुजाता पुरी यांचा अप्रतिम लेख

*खुले जो आँख तो ख्वाबो के दर नही मिलते*
*खिजा के देश मे खुशबू के घर नही मिलते*

असं म्हणतात कि डोळे उघडले कि स्वप्नांच्या दुनियेत जायचे दार दिसत नाही. स्वप्नांची दुनिया खूप अजब आहे.कधी कोणते स्वप्न पडेल हे कोणालाच सांगता येत नाही. स्वप्न पडत नाहीत असा माणूस सापडणे दुरापास्तच.
काही लोकांना हा नित्याचाच आनंद तर काहींना अधून मधून याचे दर्शन होते.
स्वप्न हा प्रत्येक माणसाच्या जिव्हाळ्याचा आणि अनुभवाचा घटक आहे. स्वप्नांचा उल्लेख पुराणात ही आढळतो.ज्ञानेश्वरीतील दुसऱ्या अध्यायात एक ओवी आहे –

*परिमधे जे प्रतिभासे,ते निद्रिता स्वप्ना जैसे*
*तैसा आकारू हा मायावशे, सत्व रुपी*

पण स्वप्न म्हणजे काय हे विचारले तर अगदी योग्य कुणालाच सांगता येणार नाही. म्हणूनच स्वप्नांची दुनिया ही गुढ असते.स्वप्ने फक्त झोपेतच दिसतात असे नाही तर जागेपणी ही आपण उघड्या डोळ्यांनी स्वप्ने पाहत असतो.
खरं तर आपलं अवघं आयुष्य हे जणू अपूर्ण स्वप्नांमागे धावत असतं, कधी हताश होऊन शांत बसत असतं.
काहीजण स्वप्नात झपाटून जातात आणि अतोनात कष्ट करून ती स्वप्ने सत्यात उतरवतात.आपण सर्व जण एक स्वप्न पूर्ण झालं कि नजरेत पुन्हा नवीन स्वप्न सजवतो आणि त्याच्या पाठीमागे लागण्यात व्यस्त होऊन जातो.कधी कधी नाही तर बऱ्याच वेळा आपण पाहिलेल्या स्वपनांचा भंग ही होत असतो.तरी ही स्वप्ने पाहण्याचे वेड मात्र काही कमी होत नाही.दुखावलेल्या मनाने आपण काही काळानंतर परत स्वप्न पाहण्यासाठी तयार होत असतो. स्वप्न पाहण्यासाठी पैसे मोजावे लागत नाहीत. नाही तर त्यावर फक्त श्रीमंतांचा अधिकार राहिला असता.
वयाच्या प्रत्येक टप्प्यावर आपल्याला वेगवेगळी स्वप्ने पडत असतात.झोपेत कोणती स्वप्ने पाहावीत हे आपल्या हातात नसते. त्या बाबतीत आपण पराधीन असतो.तिथे आपली इच्छा असून चालत नाही.पण जागेपणी पाहिली जाणारी स्वप्ने आपण आपल्या इच्छेप्रमाणे पाहत असतो. म्हणूनच दिवा स्वप्नांना जागेपणीचे मनोराज्य असे म्हटले जाते.
लहानपणी आपण पटकन मोठे केव्हा होऊ व मोठे झाल्यावर काय करू याची दिवास्वप्ने पहात असतो. तरुणपणाच्या दिवा स्वप्नांची तर मजाच सांगायला नको. कारण त्या काळात आपण आपल्याला एक राजपुत्र अथवा राजकन्येच्या रूपातच पाहात असतो.वास्तवापासून अनभिज्ञ असणारे आपण काटेरी रस्त्यापासून खूप दूर असतो आणि फुलांच्या राज्यात रममाण होत असतो.सगळ्यात जास्त दिवास्वप्न ही तारुण्यातच पाहिली जात असावी.स्वप्न जरी फुकट असली तरी त्यांचा पाठलाग करताना मात्र आपल्याला किंमत ही मोजावीच लागते. वृद्धपणी मात्र वृद्ध कोणती स्वप्ने पाहत असतील हा ही प्रश्नच आहे. दररोजच्या जीवनातल्या जीवन संघर्षातून व्यक्तीची काही काळ सुटका करण्यासाठी दिवास्वप्न उपयोगी पडतात. यामुळे मनाला क्षणिक आनंद प्राप्त होतो.परंतु याचा अतिरेक होता कामा नये.नाही तर काही ही कष्ट न करता दिवास्वप्न पाहणाऱ्यांची काय अवस्था होते हे आपण आपल्या अवतीभोवतीच्या उदाहरणातून पहातच असतो.
भूतलावरील सर्वच प्राण्यांना झोप नावाची देणगी मिळालेली असते. झोपेमध्ये आपण एका अजब दुनियेत असतो. ती दुनिया म्हणजेच स्वप्नांची दुनिया होय . म्हणूनच झोपेला स्वप्नांची जननी असे म्हटले आहे. हलक्या झोपेपासून तर गाढ झोपेपर्यंत होणाऱ्या झोपेच्या प्रत्येक आवर्तनात आपल्याला स्वप्नं पडत असतात. कधी कधी स्वप्नात न भूतो न भविष्यती अशी परिस्थिती ही आपल्याला पाहायला मिळते. मानसिक ताण तणावाचा,दबल्या गेलेल्या भावनांचा, अतृप्त इच्छांचा चेहरा आपल्याला आपल्या स्वप्नात पाहायला मिळतो. म्हणुनच स्वप्नाद्वारे मानसोपचार तज्ञांना व्यक्तीच्या मनावर उपचार करणे ही सोपे होते. कारण आपल्या समस्या माणूस असा बोलत नाही परंतु आपल्याला कोणती स्वप्ने पडतात हे मात्र तो सहजासहजी सांगू शकतो. स्वप्ने ही भीतीदायक, सुखदायक,आनंददायक , आश्चर्यकारक कशी ही पडू शकतात.व्यक्तिपरत्वे प्रत्येक स्वप्नांचा अर्थ हा वेगवेगळा असू शकतो म्हणूनच आपल्याला पडणारी स्वप्ने व त्यांचे अर्थ याबाबत अंधश्रद्धा बाळगण्यापेक्षा निकोप जीवनशैलीसाठी शास्त्रीय दृष्टीने विचार करणे महत्त्वाचे आहे. म्हणूनच असे म्हणावेसे वाटते कि
*ध्येये अशी ठेवा जी स्वप्नात येतील आणि स्वप्ने अशी पहा ती सत्यात उतरवता येतील.*
————————-

*✒️सुजाता नवनाथ पुरी*
अहमदनगर
8421426337

प्रतिक्रिया व्यक्त करा

2 × 4 =