You are currently viewing प्रतिभा की प्रतिष्ठा …

प्रतिभा की प्रतिष्ठा …

जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या लेखिका कवयित्री प्रा.सौ.सुमती पवार यांचा अप्रतिम लेख

मंडळी ..
प्रतिभा नि प्रतिष्ठा म्हणा , म्हणाल तर स्वतंत्र आहेत ,
म्हणाल तर परस्परावलंबी आहेत किंवा एकमेकांना
पुरक आहेत म्हणाल तरी चालेल.खूप वेळा प्रतिभा
प्रतिष्ठेला खेचून आणते म्हटले तरी चालेल. बरे ही
प्रतिभा ही फक्त साहित्य क्षेत्रातच असते असे नाही तर
ती अनेक क्षेत्रात अन् अनेक प्रकारची असते. साहित्यातील
प्रतिभावंत हे उत्तुंग दर्जाचे साहित्य निर्माण करतात.
अर्थात, उच्च कोटीची प्रतिभा असल्याशिवाय उच्च कोटीचे
साहित्य निर्माण होऊच शकत नाही हे ही तितकेच खरे आहे.

या बाबतीत साहित्य क्षेत्रातील अनेक दिग्गजांची नावे समोर
येतात.पु. ल देशपांडेंपासून ग. दि माडगुळकर ते कुसुमाग्रज
अशा अनेक महान व्यक्ती( त्यांची यादी खूप मोठी आहे)
साहित्य क्षेत्रात अढळ ताऱ्या सारखे चमकत आहेत .त्यांच्या
अलौकिक प्रतिभेने त्यांना चिरंजीव केले आहे. चंद्र सूर्य
असे पर्यंत ते ही अमर असतीलच असतील.आता आपण संगीत क्षेत्राकडे वळलो तर येथिल प्रतिभा वेगळीच आहे.
चित्रपट क्षेत्रातील सर्वच लोक गायकासह अत्यंत प्रतिभावान
असावे लागतात. निर्माता व दिग्दर्शक तर आधी मनात चित्रपट
निर्माण करतात व मनात बघतात सुद्धा व नंतर मग प्रत्यक्ष काम सुरू होते.गायकाचा तर अक्षरश: कस लागतो म्हटले
तरी चालेल. त्या गायक गायिकेला शास्रीय संगिताचे ज्ञान
असावेच लागते आणि रागांचे सुद्धा. या साऱ्या परिक्षा जो पास
होतो तोच या क्षेत्रात टिकतो.गीतकार तर एवढे प्रतिभावान
असतात की सिनेमातील प्रसंगानुरूप ते गाणी लिहून देतात.
ती इतकी चपखल असतात की सिनेमा पाहतांना आपण थक्क
होऊन जातो.

वर वर्णिलेले सारे प्रतिभावंत प्रतिष्ठेला खेचून आणतात हे
म्हणणे वावगे ठरू नये. आपल्या उच्च दर्जाच्या अलौकिक
प्रतिभे मुळे अतिशय निर्दोष व सुरेल गाणी गाऊन हे गायक
कलावंत पद्मश्री, पद्मभूषण अशा पदव्या मिळवतात व लता
सारखी प्रतिभावंत तर विश्व गाजवून भारतरत्न किताब मिळवत इतिहासातील सोनेरी पान बनून राहते. सारेच संगितकारही प्रतिभावंत असावेच लागतात तरच ती गाणी
कालप्रवाहात टिकून राहतात. काही हिंदी मराठी गाणी
कधी ही नामशेष होणार नाहीत इतकी ती प्रगल्भ विचारसरणीतून उतरली आहेत.(इथे नावे किती घ्यावीत
हा प्रश्न आहे.)हा सारा प्रतिभेचाच प्रताप नाही काय ?
आणि ह्या प्रतिभेनेच त्यांना प्रतिष्ठा मिळवून दिली नाही काय?
म्हणून त्या परस्पर पुरक आहेत .

 

आता साहित्य व चित्रपट क्षेत्राशिवाय इतर अनेक क्षेत्रातही
ही प्रतिभा काम करते. जगातले सर्व उच्चकोटीचे शास्रज्ञ
याचे उत्तम उदाहरण आहे.मादाम मेरी क्यूरी ते आपले ए पी जे अब्दुल कलाम यांच्या सारखी प्रतिभा प्रज्ञा कुठे सापडेल काय? विक्रम साराभाईं पासून तर आता या क्षेत्रात काम
करणाऱ्या खालच्या कर्मचाऱ्यांनाही सालाम ठोकावा इतकी
ही मंडळी महान आहेत .फक्त त्यांचे क्षेत्र वेगळे, प्रतिभा वेगळी
एवढेच! वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या कंपन्यांचे मालक
ही कमी प्रतिभावान नसतात . केवळ ते व्यापार करतात म्हणून
त्यांच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. इथे आपल्याला
टाटांपासून ते अंबानी पर्यंत सर्वांचीच दखल घ्यावी लागेल.
त्यांच्या अलौकिक प्रतिभेने, ते सन्मान पैसा प्रतिष्ठा खेचून
आणतात मग ते आपल्याला आवडो अथवा न आवडो!
तसेच तुमचे आणखी एक आवडते क्षेत्र आहे ते क्रिकेट !
इथे ही तुमच्या प्रतिभेचा कस लागतोच!! गावस्कर सचिन
सह अनेक नावांचा आपल्याला इथे विचार करावा लागेल.
इथे टिकून राहणे येरा गबाळ्याचे काम नाहीच.

थोडक्यात .. प्रतिभा की प्रतिष्ठा म्हणण्या ऐवजी आपल्याला
प्रतिभा व प्रतिष्ठा असेच म्हणावे लागेल. प्रतिभेने कमावलेली
प्रतिष्ठा हीच खरी प्रतिष्ठा असते. पैशाने कमावलेल्या प्रतिष्ठेला कोणी विचारत नाही हेच खरे आहे.म्हणून प्रतिभावंत
व्हावे, तोच जगाला वंदनिय असतो. बेगडी प्रतिष्ठा काही कामाची नसते.थोडक्यात प्रतिभा नि प्रतिष्ठा ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू नाहीत काय ? नक्कीच आहेत .
चित्रकारां विषयी तर मला प्रचंड आदर वाटतो, इतकी उच्च
कोटीची चित्रे ते काढतात .म्हणून म्हणते ही प्रतिभा सर्वच
क्षेत्रात काम करते, सर्वत्र तिचे अनन्यसाधारण महत्व आहे.
राजा रविवर्माला कोण विसरू शकतो सांगा बरं ?

“स्वदेशे पुज्यते राजा विद्वान सर्वत्र पुज्यते”
उगाच नाही म्हटले जात !

आणि हो , ही फक्त माझीच मते आहेत.

प्रा.सौ.सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)
दि : १३ जून २०२२
वेळ : संध्या.७ : १७

प्रतिक्रिया व्यक्त करा

15 + fourteen =