You are currently viewing निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात पुन्हा दहशत?

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात पुन्हा दहशत?

सतीश सावंत समर्थक संतोष परब यांच्यावरील हल्ला राजकीय वादातून?

संपादकीय

निवडणुका आल्या की गेली कित्येक वर्षे जिल्हावासीयांच्या मनात धाकधूक असते. कणकवली येथे तीन दशकांपूर्वी झालेली श्रीधर नाईक यांची हत्या आणि शांत असलेल्या जिल्ह्यात त्यावेळी निर्माण झालेली अशांतता अनेक वर्षे धगधगत होती. गेल्या पाच सात वर्षातच जिल्हा शांततेच्या मार्गावर आल्याची चिन्हे दिसू लागली होती. जिल्ह्यात झालेल्या निवडणुका शांततामय वातावरणात पार पडत होत्या, परंतु पूर्वीचे नारायण राणे यांचे समर्थक आणि सध्याचे शिवसेनेचे नेते सतीश सावंत यांची सत्ता असलेली सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणूक जाहीर झाली आणि कणकवलीत सतीश सावंत यांचे कट्टर समर्थक संतोष परब यांच्याचर दोन अज्ञात इसमांनी छातीवर चाकूने वार करून जीवघेणा हल्ला केला. बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या कट्टर कार्यकर्त्यांवर झालेला हल्ला म्हणजे जिल्ह्यात पुन्हा एकदा राजकीय दहशत सुरू झाली की काय? असा संशय वाटू लागला आहे.
निवडणुकीच्या दरम्यान पूर्वीपासून जिल्ह्यात झालेल्या रक्तरंजित घटनांमुळे अनेक वर्षे जिल्हा निवडणुकांच्या दरम्यान दहशतीखाली असतो. गेली काही वर्षे दीपक केसरकर यांनी जिल्ह्यात शांतता प्रस्थापित होण्याच्या दृष्टीने राजकीय मैदानावर पूर्ण तयारीनिशी उतरले आणि तेव्हापासून जिल्ह्यात मोकळ्या वातावरणात निवडणुका झाल्या होत्या. मतदानाचे सरासरी प्रमाण देखील वाढले होते. परंतु जिल्हा बँक निवडणूक प्रतिष्ठेची बनवली जात असतानाच जिल्हा बँकेचे अध्यक्ष व शिवसेनेचे नेते असलेल्या सतीश सावंत यांच्या कट्टर समर्थक शिवसेनेचे सरपंच असलेल्या संतोष परब यांच्यावर कणकवलीत झालेला प्राणघातक हल्ला हा राजकीय दृष्टिकोनातून झाला की अन्य कारणांनी हे संशयास्पद असून बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हल्ला झाल्याने हल्ल्याकडे राजकीय हल्ला म्हणूनच बघितले जात असून जर जिल्ह्यात पुन्हा राजकीय राडे सुरू झाले तर मतदार निवडणुकांपासून फारकत घेतील आणि त्यामुळे सत्याच्या मार्गाने निवडणूक लढणारे मागे पडतील याचा दुष्परिणाम म्हणजे बँकेसारख्या संस्थांवर हुशार अभ्यासू लोक सत्तास्थानी न आल्याने जिल्हा बँक जी आज राज्यात नावाजलेली आहे ती रसातळाला जाईल आणि जिल्ह्याचे सामाजिक दृष्ट्या नुकसान होईल जे जिल्ह्यातील शेतकरी, व्यापारी, छोटे व्यावसायिक, बचतगट आदींच्या दृष्टीने अहितकारक असेल. जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेत्यांनी, नागरिकांनी एकत्र येऊन जिल्ह्यात सुरू झालेल्या हल्ला प्रकरणी आवाज उठविणे आवश्यक आहे.
राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांनी कणकवलीत झालेल्या हल्ल्यावर प्रतिक्रिया देताना “जर ही घटना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झाली असेल तर ते नक्कीच निषेधार्थ आहे, कारण या घटनेमुळे बरेच दिवस शांत असलेल्या जिल्ह्यात पुन्हा एकदा दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे, आणि हे कृत्य जिल्ह्यातील शांत सुसंस्कृत नागरिक कदापि सहन करणार नाहीत” असे म्हटले आहे. राष्ट्रवादीच्या सावंतवाडी तालुकाध्यक्षांची ही बोलकी प्रतिक्रिया जिल्ह्यात राजकीय अशांतता निर्माण होत असल्याचीच ग्वाही देत आहे, तसेच जिल्ह्यातील नागरिकांना दहशतीच्या विरोधात खंबीरपणे उभे राहण्याचे अप्रत्यक्षपणे सुचवीत आहे. येत्या काही दिवसात जिल्ह्यातील नगरपालिकांच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत त्यामुळे असे हल्ले म्हणजे भीतीयुक्त वातावरण निर्मिती तर केली जात नाही ना? असेही प्रश्न जिल्ह्यातील सुज्ञ लोकांच्या मनात उपस्थित होत आहेत. जिल्ह्यात अशाप्रकारे दूषित वातावरण जर कोणीही निर्माण करत असेल तर जिल्हावासीयांना मतपेटीतून त्याला उत्तर देणे अपेक्षित आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

17 − eight =