You are currently viewing आंतरराष्ट्रीय पर्वत दिनानिमित्त विविध कार्यक्रम

आंतरराष्ट्रीय पर्वत दिनानिमित्त विविध कार्यक्रम

माउंटेनिअरिंग असोसिएशन सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्टचे आयोजन.

वैभववाडी

११ डिसेंबर या आंतरराष्ट्रीय पर्वत दिना”च्या निमित्ताने ‘माउंटेनिअरिंग असोसिएशन सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट’ संस्थेच्यावतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
११ डिसेंबर हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय पर्वत दिन’ म्हणून साजरा केला जातो. सजीव सृष्टीमध्ये पर्वतांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. पृथ्वीच्या एकूण भूभागापैकी २३ टक्के भूभाग हा पर्वतरांगांनी व्यापलेला आहे.
पर्वत, विस्तीर्ण डोंगररांगा या पाणी ऊर्जा व अन्न यांचे नैसर्गिक स्त्रोत आहेत. ज्यावर संपूर्ण सजीवसृष्टी अवलंबून आहे. या सर्वांचा विचार करता पर्वतांचे जतन करण्यासाठी आणि येणाऱ्या काळात त्यांची होणारी हानी टाळण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाने २००३ पासून आंतरराष्ट्रीय पर्वत दिन साजरा करण्याचे ठरविले. अखिल महाराष्ट्र गिर्यारोहन महासंघ आंतरराष्ट्रीय पर्वत दिन साजरा करण्यासाठी अधिकृतरित्या संयुक्त राष्ट्र संघाची जोडला गेलेला आहे. या आंतरराष्ट्रीय पर्वत दिनाच्या निमित्ताने स्थानिक पातळीवर आपल्या गावाजवळील टेकडीवर, डोंगरावर जाऊन पर्वत पूजन करणे, पर्वत व पर्वतांवर अवलंबून असलेल्या निसर्गाच्या संवर्धनासाठी विविध सेमिनार, ऑनलाईन तसेच ऑफलाइन पद्धतीने आयोजित करणे, नवीन पिढीचे पर्वतांप्रति प्रेम वाढवण्यासाठी स्थानिक शाळा-महाविद्यालयांच्या माध्यमातून चित्रकला स्पर्धा, पोस्टर स्पर्धा, छायाचित्र स्पर्धा, शालेय मुला-मुलींसाठी रंजक व्याख्याने व स्वच्छता इत्यादी नानाविध उपक्रम राबवले जातात. अ.म.गि.महासंघ संलग्नित माउंटेनिअरिंग असोसिएशन सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट संस्थेच्यावतीने मागील वर्षापासून आंतरराष्ट्रीय पर्वत दिन साजरा केला जातो. यावर्षीही शनिवार दिनांक ११ डिसेंबर रोजी आंतरराष्ट्रीय पर्वत दिनाचे औचित्य साधून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. न्यू इंग्लिश स्कूल कसाल येथे सकाळी ठीक ९.०० वाजता ‘पर्वत वाचवूया, पर्वत जगवूया’ या विषयावर सामाजिक वनीकरण विभागीय वन अधिकारी श्री.सुभाष पुराणिक यांचे व्याख्यान आयोजित केले आहे. तसेच या निमित्ताने घेतलेल्या निबंध स्पर्धा बक्षीस वितरण व पर्वत पूजन कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे. तसेच माउंटेनिअरिंग असोसिएशन सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट आणि वैभववाडी येथील आनंदीबाई रावराणे महाविद्यालयातील इतिहास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने कोकिसरे-बांधवाडी येथे सकाळी ९.३० वा. सामाजिक वनीकरण वैभववाडीचे वनपाल श्री. प्रकाश पाटील, वैभववाडी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सी. एस. काकडे व जि. प. सदस्य श्री‌ सुधीर नकाशे यांच्या उपस्थितीत पर्वत पूजन कार्यक्रम आयोजित केला आहे. तसेच महाविद्यालयातील इतिहास विभाग आणि अरविंद सावंत सरदार माध्यमिक विद्यालय, नाधवडे यांच्यावतीने सकाळी ठीक १० वाजता नाधवडे येथील पर्यटन स्थळ असलेला बारमाही वाहणारा उमाळा स्वच्छता कार्यक्रमाचे आयोजन कलेले आहे. जिल्ह्यातील निसर्गप्रेमी, दुर्गप्रेमी व्यक्ती व संस्थानी या कार्यक्रमांमध्ये सहभागी व्हावे. पर्वतरांगांचे संवर्धन करणे, त्याविषयी अधिक जागरूक होणे ही काळाची गरज आहे म्हणून प्रत्येकांनी आपल्या स्तरावर कार्यक्रम आयोजित करुन पर्वतांप्रति कृतज्ञता व्यक्त करावी असे आवाहन माउंटेनिअरिंग असोसिएशन सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट संस्थेचे अध्यक्ष श्री. प्रकाश भाऊ नारकर, उपाध्यक्ष डॉ. कमलेश चव्हाण व सचिव एस.एन. पाटील यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

1 × two =