You are currently viewing विठ्ठल रखुमाई शेतकरी संघटनेच्या स्मार्ट मीटर विरोधी उपोषणाला यश

विठ्ठल रखुमाई शेतकरी संघटनेच्या स्मार्ट मीटर विरोधी उपोषणाला यश

विठ्ठल रखुमाई शेतकरी संघटनेच्या स्मार्ट मीटर विरोधी उपोषणाला यश…

सावंतवाडी
महाराष्ट्र सरकारच्या वतीने महाराष्ट्रात स्मार्ट मीटर बसविण्यास सुरुवात झालेली असून सरकारने विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी घरगुती ग्राहकांना स्मार्ट मीटर बसवले जाणार नाही असे आश्वासन दिले होते परंतु निवडणुकीच्या पश्चात तात्काळ सिंधुदुर्ग जिल्ह्यात स्मार्ट प्रीपेड मीटर बसविण्यास सुरुवात झालेली असून ज्या ग्राहकांचे वीज मीटर बंद अवस्थेत आहेत किंवा वीज मीटर बाबत ज्या ग्राहकांची तक्रार आहे अशा ग्राहकांना कोणतीही पूर्वकल्पना न देता नवीन स्मार्ट मीटर बसवून ग्राहकांची फसवणूक केली जात आहे. सावंतवाडी तालुक्यातील कारिवडे, चराठा आदी परिसरात अशा पद्धतीने स्मार्ट प्रीपेड मीटर बसविल्याने विठ्ठल रखुमाई शेतकरी संघटनेचे अध्यक्ष तथा माजी शिक्षण व आरोग्य सभापती मंगेश तळवणेकर यांनी उपोषणाची नोटीस दिनांक ७ मार्च रोजी दिली होती. सदर नोटीसीच्या अनुषंगाने बुधवार दिनांक १२ मार्च रोजी सकाळपासून उपकार्यकारी अभियंता कार्यालय महावितरण सावंतवाडी येथे संघटनेच्या वतीने मोठ्या प्रमाणावर ग्राहक तथा ग्रामस्थांना घेऊन उपोषण करण्यात आली.
या उपोषणाला वीज ग्राहक संघटनेने पाठिंबा दर्शवत वीज ग्राहक संघटनेचे प्रभारी जिल्हाध्यक्ष संजय लाड, जिल्हा सचिव दीपक पटेकर, जिल्हा उपाध्यक्ष गणेश तथा बाळ बोर्डेकर, पुंडलिक दळवी, सदस्य संतोष तावडे, संजय नार्वेकर, सदानंद केदार, लक्ष्मण परब यांनी भाग घेतला.
स्मार्ट प्रीपेड किंवा टीओडी मीटर बसविण्यास हरकत असल्याबाबत एक महिन्यापूर्वी संपत देसाई यांच्या नेतृत्वाखाली कुडाळ येथील महावितरणच्या मंडळ कार्यालयावर हजारोंच्या संख्येने मोर्चा नेला होता. त्यावेळी महावितरणचे अधीक्षक अभियंता श्री साळुंखे यांनी स्मार्ट प्रीपेड किंवा टिओ डी मीटर बसवणार नाही, असे लेखी आश्वासन दिले होते. परंतु काही शहरी व ग्रामीण भागात लोकांना कोणतीही माहिती न देता २००० च्या वर स्मार्ट प्रीपेड तसेच टीओडी मीटर घराबाहेर बसविले आहेत. या स्मार्ट प्रीपेड मीटरचा दुष्परिणाम म्हणजे ज्यावेळी मोबाईलचा रिचार्ज संपतो त्यावेळी जसा मोबाईल बंद होतो तशाच प्रकारे रिचार्ज संपल्यावर स्मार्ट प्रीपेड मीटरची लाईट बंद होणार. ज्या गावांमध्ये आजपर्यंत मोबाईल रेंज पोहोचलेली नाही त्या गावातील लोकांना पुन्हा रिचार्ज मारेपर्यंत अंधारात राहावे लागेल. अशा वेळी आजारी किंवा वृद्ध लोकांना जीवावर बेतण्याची पाळी येऊ शकते. त्यामुळे विठ्ठल रखुमाई शेतकरी संघटनेने स्मार्ट प्रीपेड किंवा टीओडी मीटर बसविण्यासाठी विरोध केला आहे.
आजपर्यंत सावंतवाडी शहर सह तालुक्यामध्ये जेथे जेथे हे स्मार्ट प्रीपेड मीटर बसविले आहेत ते सर्व मीटर तातडीने काढून पूर्वीप्रमाणे घरात इलेक्ट्रॉनिक मीटर बसविण्यात यावे, अशी मागणी विठ्ठल रखुमाई शेतकरी संघटनेच्या वतीने अध्यक्ष मंगेश लक्ष्मण तळवणेकर सहित ग्रामस्थांनी केली आहे.
विठ्ठल रखुमाई शेतकरी संघटनेच्या आजच्या या उपोषणाला यश आले असून कार्यकारी अभियंता कुडाळ यांच्या सूचनेनुसार उपकार्यकारी अभियंता सावंतवाडी यांनी वरिष्ठ पातळीवरून जोपर्यंत पुढील आदेश प्राप्त होत नाहीत तोपर्यंत सावंतवाडी तालुक्यातील वीज ग्राहकांना स्मार्ट प्रीपेड मीटर किंवा टी ओ डी मीटर बसविणार नाहीत असे लेखी आश्वासन दिले. उपकार्यकारी अभियंता शैलेश राक्षे यांच्या लेखी आश्वासनानंतर विठ्ठल रखुमाई शेतकरी संघटनेचे अध्यक्ष मंगेश तळवणेकर यांच्या सह ग्राहकांनी उपोषण स्थगित केले.
यावेळी शब्बीर मणियार, लक्ष्मण देऊलकर, अशोक घोगळे, बसत्या गोम्स, संदीप चराठकर, लता डिमेलो, मारिया अल्मेडा, मीनाक्षी जाधव, सुनिता कांबळे, स्वाती चराठकर, बबन आमुनेकर, रोशनी जाधव, रेणुका टक्केकर, आदींसह जवळपास ८० ग्रामस्थ उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा