You are currently viewing बदलत्या काळाप्रमाणे शिक्षकांनीही स्वतःला बदलावे; वर्षा गायकवाड

बदलत्या काळाप्रमाणे शिक्षकांनीही स्वतःला बदलावे; वर्षा गायकवाड

एस. आर. दळवी फाऊंडेशकडून कोरोनायोद्धे शिक्षकांचा टॅब व महाशिक्षक पुरस्काराने सन्मान

मुंबई
कोरोना काळात वैद्यकीय, पोलिस, महसूल खात्यासह शिक्षकांनीही आपला जीव धोक्यात घालून अमूल्य योगदान दिले आहे. विलवडे गावातील सुपुत्राने स्थापन केलेल्या एस. आर. दळवी फाऊंडेशनने या शिक्षकांच्या सेवेची दखल घेऊन या कोरोनायोद्धे शिक्षकांना समसंग टॅब व महाशिक्षक पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याचा मान्यवरांच्याहस्ते सन्मान केला. या फाऊंडेशनचे व्यवस्थापकीय विश्वस्त रामचंद्र दळवी व सीता दळवी यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात आला.
नरीमन पाईंट येथील यशवंतराव चव्हाण सेटंरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या या शिक्षक सन्मान सोहळ्याच्या व्यासपिठावर राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षाताई गायकवाड, ग्लोबल टिचर्स पुरस्कार प्राप्त रणजितसिंह डिसले, चाणक्य इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक लिडरशिपचे संचालक डॉ. राधाकृष्ण पिल्लई, मनशक्ती केंद्राचे विश्वस्त प्रमोद शिंदे, स्वेअर पांडाचे आशिष झालाणी, मनशक्तीचे मयुर चंदने, एस आर फाऊंडेशनचे व्यवस्थापकीय विश्वस्त रामचंद्र दळवी व सीता दळवी आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड म्हणाल्या, शालेय शिक्षण विभाग हा क्रांती करणारा विभाग आहे. शिक्षण क्षेत्रात बदलत्या काळाप्रमाणे बदल होत आहेत. वाढत्या स्पर्धेत जिल्हा परिषदेतील शाळांच्या फक्त इमारती व पायाभुत सुविधा देऊन चालणार नाही तर शिक्षकानी सुद्धा आधुनिक तंत्रज्ञान, नवीन कल्पना, संकल्पना आत्मसात करून बदल स्विकारावेत असे आवाहन केले.
यावेळी रणजितसिंह डिसले यांनी कोरोनाकाळात डॉक्टरांनी लोकांचे जीव वाचवले पण शिक्षकांनी भविष्य वाचवले. त्यामुळे या शिक्षकांचा सन्मान करताना टॅब देऊन या संस्थेने वेगळा व चांगला पायंडा पाडल्याचे सांगुन डिजिटलचा वापर वाढवून या टॅबचा वापर शिक्षकांनी विद्यार्थ्यांसाठी करावा असे आवाहन केले. रामचंद्र दळवी यांनी कोराना काळात शिक्षकांनी केलेल्या कार्याचा गौरव व्हावा यासाठी पुरस्कार देण्याचे जाहीर केल्यानंर त्यासाठी राज्यातून १५८ नामांकने आली त्यातून ७ शिक्षकांना महाशिक्षक पुरस्कार व सॅमसंग टॅब तर ५ शिक्षकांचा विशेष पुरस्कार देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले.
यावेळी सीता दळवी यांनी शिक्षक विद्यार्थ्यांचे पर्यायाने देशाचे भविष्य घडवित असताना आणखी काय करता येईल यासाठीच एस आर फाउंडेशनने Teachers Talks app हे व्यासपीठ शिक्षकांसाठी निर्माण केले. या ऍपच्या माध्यमातून शिक्षक एकाच व्यासपीठावर येणार असून विचारांची देवाण घेवाण होणार आहे. त्यामुळे शिक्षकांनी यात सहभागी होऊन आपल्या कल्पना, संकल्पना व सुचना या ऍपवर मांडाव्यात असे आवाहन केले. यावेळी राधाकृष्ण पिल्लई, प्रमोद शिंदे, डिजीटल तज्ञ नयन भेडा यांनी शिक्षक, शिक्षणपद्धती व बदलते रुप यावर आपली मते व्यक्त केली.
या कार्यक्रमात विवेकानंद मधुकर डेसले, वरुणाक्षी भारत आंबरे, बापू सुखदेव बावीसकर, मनोज बापू सुतार, लिंबराव गणपतराव बोंडगे, भगवान मनोहर बुऱ्हांडे, दर्शन पोचिराम भंडारे या ७ शिक्षकांना महाशिक्षक पुरस्कारासह सॅमसंग टॅब देण्यात आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

nineteen − eighteen =