You are currently viewing १९ नोव्हेंबर…..आंतरराष्ट्रीय पुरुष दिन

१९ नोव्हेंबर…..आंतरराष्ट्रीय पुरुष दिन

पुरुषही भावनाप्रधान…..संवेदनशील असतात

१९ नोव्हेंबर हा आंतरराष्ट्रीय पुरुष दिन म्हणून जगातील अनेक देशांमध्ये साजरा केला जातो. भारतात २००७ सालापासून “जागतिक पुरुष दिन” साजरा केला जातो. जागतिक महिला दिवस हा ८ मार्च रोजी सर्वत्र साजरा करतात, अनेक ठिकाणी वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून महिला दिनाचे वैशिष्ट्य जपले जाते. महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करतात, अशा अनेक गोष्टींमधून नेहमीच महिला या समाजात प्रभावीपणे मांडल्या जातात. परंतु महिलांचा मान सन्मान करताना अनेकदा पुरुष हा झोकाळालाच गेला आहे. पुरुषाकडे “तो पुरुष आहे” याच दृष्टीने पाहिल्यामुळे त्याचे कर्तृत्व, समाजातील, घरातील योगदान याकडे मात्र साफ दुर्लक्ष केलं गेलं आहे.
पुरुष नेहमीच प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर असतो, मग ते कुटुंबाप्रति असलेलं कर्तव्य असो, समाजाप्रती असलेली जबाबदारी, कामाप्रति असलेली निष्ठा. कर्तव्य भावनेतून तो नेहमीच सर्व करत असतो. परंतु तरीही कुटुंबानेच नव्हे तर समाजाने, अगदी साहित्य क्षेत्रानेही काही अपवाद वगळता पुरुषाची हेटाळणीच केली आहे. लेखक असो वा कवी प्रत्येकाने “आई” या विषयावर अमाप लेखन केलं आहे, आई प्रति असलेला आदर, प्रेमशब्दातून वागण्या, बोलण्यातून व्यक्त केलं आहे. आई ही थोरच असते, आपल्या लेकराला नऊ महिने स्वतःच्या उदरात जपते आणि लेकरू बाहेर येताच वात्सल्याने त्याची काळजी वाहते. आईचे वेगवेगळे पैलू प्रत्येकाने मांडलेत. परंतु…..

*बाप नावाचा माणूस*
*बरेच खस्ते खातो*
*तरीही कुटुंबासाठी*
*दिवस रात्र राबतो*

राबराब राबून आपल्या कुटुंबाचा भार डोईवर वाहणारा पुरुष मात्र क्वचितच रेखाटला जातो. महिलांच्या भावना, समाजातील संघर्ष, दुःख, संवेदना ही सहज मांडल्या जातात, पण पुरुषालाही मन असते, भावना असतात हे मात्र सहजपणे विसरतात. स्त्रीवादी दृष्टिकोनातून बरेच लेखन आजपर्यंत होत आले आहे, त्यात लेखकाला खोलवर जाऊन भावना मांडता येतात, भावस्पर्शी, हृदयस्पर्शी लेखन म्हणून वाचल्याही जातात. पुरुषाच्या भावना मात्र पुरुष हा मूलतःच रागीट, तापत स्वभावाचा, व्यसनी असे भासवून पुरुषाची प्रतिमाच बदलून ठेवली आहे. स्त्रिया भावनाप्रधान दाखवल्या जातात आणि पुरुष आपल्या भावना, दुःख, अश्रू आतल्या आत गोठवून ठेवत असल्याने “भावनाशून्य” असल्यासारख्याच जगासमोर आणला जातो.

*बाप झाल्यावर पुरुषामध्ये कित्येकदा भावना जिवंत होतात*

पुरुष हा सुद्धा भावनिक, प्रेमळ, मायाळू असतो, त्याला आपल्या भावनांचे प्रदर्शन मांडता येत नाही, कित्येकदा स्वतःचं पुरुषी व्यक्तिमत्त्व जपण्यासाठी डोळ्यातून वाहणारे अश्रू लपविण्याची किमया साधावी लागते. बाप असलेला पुरुष मात्र आपल्या भावना लाडक्या मुलीला सासरी जाताना तरी अश्रू होऊन दाखवून देतो.
*उर भरे तो बापाचा*
*टेकता डोकं छातीवरी*
*आशीर्वाद देतो बाप*
*ठेवी हात डोईवरी*

पुरुष हा देखील मायेच्या ओलाव्याने ओतप्रोत भरलेला असतो, मृगाच्या आगमनाने रानोमाळ हिरवागार व्हावा तसा मनाने नाजूक प्रेमळ कोमल अंतःकरणाचा असतो. पुरुष देखील संवेदनशील असतो, परंतु स्त्रिया आपलं दुःख, संवेदना व्यक्त करतात पुरुष त्याची दुःख मनात गाडून ठेवतो. आपल्या मनात काय चाललंय याची पुसटशी कल्पना देखील कोणाला येऊ देत नाही. त्यामुळे पुरुष हे व्यक्तिमत्त्व रेखाटने तसे कोणा साहित्यिकालाही जमलं नसेल कदाचित, अनेकांनी पुरुष रेखाटताना सद्गुण झाकून दुर्गुण रेखाटलेले पहावयास मिळतात. अत्याचार हिंसाचार याचा बळी केवळ स्त्रियाच नसतात तर कित्येकदा पुरुष देखील असतात. परंतु स्त्रियांवर होणारे अत्याचार दाखवले गेल्यामुळे कित्येकदा पुरुषाची प्रतिमा ही मालिन झालेलीच पहावयास मिळते. पुरुषामध्ये जेव्हा “आपला बाप, मोठा भाऊ” या व्यक्तिरेखा दिसतील तेव्हाच पुरुषाचे अंतरंग कागदावर शब्दात उतरता येईल.
सण समारंभ असो वा कुठलाही कार्यक्रम, स्त्रिया नटतात, सजतात…. वस्त्रालंकार परिधान करून सौंदर्याची उधळण करतात, त्यांची बऱ्याच प्रमाणात रेलचेल सुरूच असते परंतु पुरुष मात्र स्त्रियांच्या तुलनेत मागेच असतो. सुखात आपल्या कुटुंबाला आनंदी पाहण्यात सुख मानतो आणि दुःख मात्र स्वतःच्या खांद्यावर घेत जबाबदारी म्हणून पेलत असतो.

*मेरे करण अर्जुन आऐंगे* असा विश्वास ठेवून जगणारी आई चित्रपटात सुद्धा दाखवली जाते, परंतु वाट पाहणारा बाप मात्र कुठेही चित्रित होत नाही, ना चित्रपटात ना कुठल्या मालिकांमध्ये. संध्याकाळी ७.०० वाजता टीव्ही सुरू केली की रात्री १०.०० वाजेपर्यंत अगदी मराठी बिग बॉस देखील स्त्रीप्रधान व्यक्तिरेखाच दिसून येतात. क्षेत्र कुठलेही असले तरी पुरुष हा अधोरेखित झालेला दिसतच नाही. पुरुषाचा दिवस असो वा रात्र ही जागृतच असते…

*सकाळ होते त्याची*
*रात्रीचं ओझं वाहत*
*रात्र त्याला जागवते*
*सकाळची स्वप्न पाहत*

काहीशी अशीच अवस्था समाजात पुरुषाची झालेली असते, त्यामुळेच पुरुषाप्रति जागरूकता, आरोग्याप्रति आस्था व लैंगिक समानतेचा विकास करण्याकरिताच आंतरराष्ट्रीय पुरुष दिन साजरा करण्यात येतो. समाजात पुरुषाचे असलेले स्थान, पुरुषाचे समाजातील, कुटुंबातील योगदान, समर्पण आदी बाबी ठळकपणे दिसून याव्यात यासाठीच आंतरराष्ट्रीय पुरुष दिनाचे औचित्य साधून पुरुष ही व्यक्तिरेखा नजरेसमोर आणून जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न या दिवसाच्या निमित्ताने करण्यात आला आहे.

*जगभरातील सर्व पुरुषांना आंतरराष्ट्रीय पुरुष दिनाच्या शुभेच्छा….💐💐*

©[दिपी] दीपक पटेकर

प्रतिक्रिया व्यक्त करा