You are currently viewing पत्रकार … पत्रकारिता …..
  • Post category:लेख
  • Post comments:0 Comments

पत्रकार … पत्रकारिता …..

जागतिक मराठी “साहित्य कला व्यक्ती” विकास मंचच्या सदस्या, विविध पुरस्कार प्राप्त जेष्ठ कवयित्री प्रा.सौ. सुमती पवार यांचा अप्रतिम लेख

मोठा गहन विषय आहे हा …. पत्रकार काय करू शकतो व
काय करू शकत नाही .. मोठ्या निबंधाचा विषय आहे हा…!
एका वाक्यात सांगायचे तर ….
“ पत्रकार काही ही करू शकतो ..”
होय.. हे विधान अक्षरश: सत्य आहे. आजकाल तर पत्रकार
हा समाजाचा फार महत्वाचा मोठा घटक बनला आहे.
समाज , देश घडवायचा कि उलथवायचा हे सुद्धा पत्रकार
करू शकतात.

मुळात लेखणीची ताकदच फार मोठी असते. त्यातून ती
पत्रकाराच्या हातातील लेखणी असेल तर… तिचे महत्व
आणखीनच वेगळे असते . त्यातून संपादक पत्रकार तर
महानच असतात.आजकाल राजकारण इतके अस्थिर व
बकाल बनले आहे की, कसलीही शाश्वती अशी राहिलेली
नाही. आम्ही लहान असतांना कोणत्या खात्याचा कोणता
मंत्री आहे ती नावे पाठ करत असू कारण वर्षानुवर्षे मंत्रिमंडळ
तेच असे. आज तर क्षणाचा भरवसा राहिला नाही .
हे मी अशा साठी लिहित आहे की, सरकार स्थिर असल्यामुळे
पत्रकारितेला बहर येत असे. मी नियमितपणे संपादकीय
सदर वाचत असे. कारण या संपादकीय पत्रकारांनी लिहिलेले
अग्रलेख अत्यंत अभ्यासपूर्ण व वाचनिय असत नव्हे कित्येक
वेळा ते दिशादर्शक व सूचक असत.

पंतप्रधानांपासून ते मंत्र्यांपर्यंत सारे ते अग्रलेख अभ्याासत
असत इतके ते महत्वाचे असत.पत्रकारांचे व मंत्र्यांचे संबंध
सौहार्दपूर्ण असत. आजच्या सारखी विकावू पत्रकारिता त्या
वेळी मुळीच नव्हती.मला आठवते ह. रा महाजनी यांची संपादकीय सदरे अत्यंत आवडीने वाचली जात असत.किंबहूना
कित्येक वेळा मुख्यमंत्री सुद्धा त्यांना विचारणा करत…
उद्या कुणावर निशाणा आहे तो… अत्यंत खेळीमेळीच्या
वातावरणात .. तणाव रहित अशी ती पत्रकारिता असे.
त्या अग्रलेखातून समाज घडत असे. तासंतास लोक वर्तमान
पत्र वाचत असत.व त्यावर हिरीरिने चर्चा करत असत.

हे सारे आठवले म्हणजे , गोविंद तळवलकर, कर्णिक साहेब,
भरत कुमार राऊत ह्यां सारख्या उत्तम लहिणाऱ्या संपादक
पत्रकारांची आवर्जुन आठवण येतेच! कारण ह्यांच्या संपादकियाने कित्येक पिढ्या घडवल्या. पोसल्या व आंनंद दिला. अजून नावे घ्यायची तर विद्याधर गोखले साहेब,
माधव गडकरी साहेब,मा. कुमार केतकर,मा.अरूण टीकेकर , ही त्या वेळची उत्तम पत्रकारिता होय .जुन्या काळी लोकमान्य टिळक व प्र.के. अत्रे यांच्या
अग्रलेखांनी तर .. सरकारला कापरे भरत असे. आठवा..
“सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय …?”
“पुन:श्च हरि ओम”ह्या अग्रलेखांनी सरकार इतके घाबरले
(ते ही इंग्रज सरकार),की टिळकांना तुरूंगवास भोगावा लागला.”पुन:श्च हरि ओम “ हा अग्रलेख शालेय पाठातून
कित्येक वर्षे विद्यार्थी अभ्यासत होते.अत्र्यांची सिंह गर्जना जशी
सरकारला घाबरवत असे तसेच त्यांनी लिहिलेल्या मृत्यू लेखांनी समाजाला घळाघळा रडवले आहे.असे होते जुन्या
काळचे संपादक व पत्रकार ज्यांनी इतिहास निर्माण केला व
आज ते त्या इतिहासाचे सुवर्णपान बनले आहेत.त्यांनी घणाघाती टीका ही केली पण ती कुठल्याही आकसापोटी
नव्हती.तर चुका दाखवून कारभार सुरळीत चालावा या साठी
होती.

आजकाल पत्रकारिते विषयी काय बोलावे..? बोलू नये हेच
उत्तम…! गेली काही वर्षे माझे संपादकीय वाचन बंद झाले
आहे किंबहुना वाचावेसेच वाटत नाही अशी परिस्थिती आहे.
आजकाल तर मी पेपर वाचणे सोडून दिले आहे? काय
वाचायचे? खून,बलात्कार,मारामाऱ्या,अपघात आणि चोऱ्या?
नको रे बाबा ते पेपर वाचणे असे झाले आहे.असो.

पुन्हा नव्याने अभ्यासू.. समाजहितैषी , दिशा देणारे पत्रकार
निर्माण होवोत व त्यांनी पुन्हा आपल्या वैचारिक क्रांतीने समाज घडवावा …अशी अपेक्षा व्यक्त करत पत्रकाराचे स्थान
समाजात नेहमी वरचे राहून त्यांनी देश घडविण्यात हातभार
लावावा …अशी आशा मनात बाळगत ,तुमचा निरोप घेते.
“ जयहिंद .. जय महाराष्ट्र…”

प्रा.सौ.सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)
दि: १७ नोव्हेंबर २०२१
वेळ : सकाळी ११.

“ ही फक्त माझी मते आहेत “

प्रतिक्रिया व्यक्त करा

1 × 4 =