You are currently viewing रविन्द्रनाथ आणि तुकाराम

रविन्द्रनाथ आणि तुकाराम

जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य लेखक कवी अनिल देशपांडे यांचा रवींद्रनाथ टागोर जयंती निमित्त लिहिलेला अप्रतिम लेख

प्रिय वाचकहो,

आपल्यापैकी अनेकजणांना ठाऊक असेल की कालच गुरुदेव रविंद्रनाथ टागोर (रबीन्द्रनाथ ठाकूर) यांचा जन्मदिन होता. (7 मे 1861 – 7 ऑगस्ट 1941) पण आपल्याला हे ठाऊक आहे का की रविंद्रनाथांनी संतश्रेष्ठ तुकाराम महाराज (1608 – 19 मार्च 1650) यांच्या 12 अभंगांचे बंगभाषेत अनुवादन (भाषांतर) केले आहे?

होय. आणि हे 12 अभंगही त्यांनी असे निवडले आहेत की त्यांतून जणूं संत तुकारामांची संक्षिप्त जीवनीच वाचकांना कळावी. त्यातील पहिल्या 3 रचनांतून तुकारामांना काव्यरचनेची प्रेरणा कशी मिळाली व त्यांनी अभंग लिहायला कशी सुरूवात केली ते दिसते तर नंतरचे 7 अभंग हे त्यांचे व पत्नी जिजाईच्या वाद-संवादांचे दिसतात. शेवटचे 2 अभंग हे निरोपात्मक आहेत.

रविन्द्रनाथांनी आधी हे अभंग बंग भाषेत लिप्यंतरीत केलेत (बंग लिपीत लिहिलेले मराठी) आणि मग त्यांचे बंग भाषेत अनुवादन (भाषांतर) केले. ही भाषांतरे रविन्द्रनाथांच्या ‘नवरत्न’ आणि ‘मालती’ अशा 2 हस्तलिखितांतून मिळाली आहेत. त्यांना ही भाषांतरे करण्याची प्रेरणा त्यांचे द्वितीय ज्येष्ठ बंधू व भारतीय नागरी सेवेतील (ICS) पहिले अधिकारी सत्येंन्द्रनाथ टागोर (1 जून 1842 – 9 जानेवारी 1923) यांच्याकडून मिळाली.

विशेष म्हणजे ते अनुवादित 12 अभंग सहज उपलब्धही आहेत आणि उल्लेखनीय बाब म्हणजे एकाच पानावर डावीकडे तुकोबांचा सबंध मराठी अभंग (पण बंगाली लिपीत) आणि उजवीकडे त्या अभंगाचे रविंद्रनाथांनी केलेले बंगाली भाषेतील अनुवाद (भाषांतर) या स्वरूपात आहे, जेणेकरून बंगाली लोकांना मूळ मराठी अभंग काय आहे तो ही वाचता यावा.

आता नक्कीच तुमची जिज्ञासा जागृत झाली असेल की तुकोबांचे ते कोणते 12 अभंग आहेत की ज्यांचे रविन्द्रनाथांनी बंग भाषेत अनुवाद (भाषांतर) केले आहे? तर ते 12 अभंग खालीलप्रमाणे….

1. (तुकाराम गाथा अभंग क्र. 371)
माझिये मनींचा जाणा हा निर्धार । जिवासि उदार जालों आतां ।।

2. (तुकाराम गाथा अभंग क्र. 1315)
नामदेवें केलें स्वप्नामाजी जागें । सवें पांडुरंगें येऊनियां ॥

3. (तुकाराम गाथा अभंग क्र. 1316)
द्याल ठाव तरि राहेन संगती । संतांचे पंगती पायांपाशीं ॥

4. (तुकाराम गाथा अभंग क्र. 566)
मज चि भोंवता केला येणें जोग । काय याचा भोग अंतराला ।।

5. (तुकाराम गाथा अभंग क्र. 567)
काय नेणों होता दावेदार मेला । वैर तो साधिला होउनि गोहो ।।

6. (तुकाराम गाथा अभंग क्र. 568)
गोणी आली घरा । दाणे खाऊं नेदी पोरा ।।

7. (तुकाराम गाथा अभंग क्र. 569)
आतां पोरा काय खासी । गोहो जाला देवलसी ।।

8. (तुकाराम गाथा अभंग क्र. 570)
बरें जालें गेलें । आजी अवघें मिळालें ।।

9. (तुकाराम गाथा अभंग क्र. 571)
न करवे धंदा । आइता तोंडीं पडे लोंदा ॥

10. (तुकाराम गाथा अभंग क्र. 572 )
कोण घरा येतें आमुच्या कशाला । काय ज्याचा त्याला नाहीं धंदा ॥

11. (तुकाराम गाथा अभंग क्र. 4448)
आह्मी जातों आपुल्या गांवा । आमुचा रामराम घ्यावा ॥

12. (तुकाराम गाथा अभंग क्र. 1602)
तुका उतरला तुकीं । नवल जालें तिहीं लोकीं ॥

हे 12 अभंग आपण तुकाराम गाथेतच मुळातून वाचू शकता आणि रविन्द्रनाथांनी केलेले त्यांचे बंग भाषांतर खालील लिंकवर वाचू शकता. मात्र त्यासाठी आपल्याला बंग भाषेच्या लिपीचे ज्ञान हवे!

http://tukaram.com/bengal/tagore.html

@अनिल देशपांडे, कोलकाता.
09830463908

प्रतिक्रिया व्यक्त करा