You are currently viewing परमपूज्य ती.आप्पासाहेब…..

परमपूज्य ती.आप्पासाहेब…..

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री सौ.ज्योत्स्ना तानवडे यांचा लेख*

परमपूज्य ती.आप्पासाहेब,
शि.सा.न.वि.वि
आज तुमचा वाढदिवस आहे. आज तुम्हाला शंभर वर्षे पूर्ण झालीत. या निमित्ताने तुमच्या असंख्य आठवणींनी मनात फेर धरलाय. अनेक रूपे डोळ्यांपुढे तरळत आहेत. लहान मुलासमोर आवडत्या खेळाची टोपली ओतल्यावर त्याची जशी होते तशीच काहीशी अवस्था झाली आहे.
तुमचे आणि आईचे आमच्या आयुष्यातील स्थान अतिशय मोठे, मोलाचे आहे. तुम्ही दोघे आमचे सर्वात मोठे गुरू आहात. तुम्ही वडील असलात तरी माझ्या शैक्षणिक वाटचालीतही तुमची गुरूची भूमिका खूप मोठी आहे.
आपले गाव म्हणजे तालुक्याचे छोटेसे खेडेगाव‌.गावात प्राथमिक शाळेनंतर पुढील वर्गांची सोय नव्हती. तेव्हा तुम्ही आणि तुमच्या काही सहकाऱ्यांनी गावात शाळा सुरू केलीत. काही काळ शिक्षक मिळेपर्यंत तुम्ही व इतरांनी आपले व्याप सांभाळत अध्यापनाचे कामही केलेत. तेव्हा वर्गात बसून तुमच्याकडून शिकता आले नाही. त्यावेळी शिकवणी लावण्याची फारशी पध्दत नव्हती. मग तुम्हीच घरी आम्हाला सर्व विषय शिकवायचात.
विशेषतः हिंदी, इंग्रजी, मराठी, संस्कृत या सर्व भाषा तुम्ही अतिशय सोप्या सुंदर पद्धतीने शिकवल्या. शुद्ध वाचायचे कसे, उच्चाराप्रमाणे शुद्ध लिहायचे कसे, चांगले हस्ताक्षर, पाठांतर यांची छान तयारी करून घेतलीत. तुम्ही शिकवलेल्या कुसुमाग्रज, तांबे, केशवसुत यांच्या कविता आजही आठवतात. अगदी ‘डॅफोडिल्स’ पण आठवते. संस्कृत व्याकरण तुमच्यामुळेच पक्के झाले. शुद्ध उच्चारांसह संस्कृत पाठांतर कितीतरी तुम्ही आवर्जून करून घेतलेत.
तुमच्यामुळेच अक्षर वळणदार झाले. तसेच अभ्यासाला शिस्त लागली, नोंदी काढणे, टिपणे ठेवणे, थोडक्यात अर्थपूर्ण लिहिण्याची सवय लागली. आज कोणतेही लिखाण करताना तुमची आठवण येते. तुमची रसाळ भाषाशैली, उच्चार आठवतात. शाळेच्या अभ्यासक्रमाबाहेरचे कितीतरी साहित्य तुमच्यामुळे वाचले, समजले. सर्वच भाषांची जाण समृद्ध झाली.
तुम्ही आमची निबंध, वक्तृत्व, पाठांतर स्पर्धांची तयारी खूप छान करून घ्यायचा. एका वक्तृत्व स्पर्धेसाठी ‘ माझा आवडता नाटककार – आचार्य अत्रे ‘ या विषयाची तुम्ही खूप छान तयारी करून घेतली होती. मला दुसरा नंबर मिळाला. तेव्हा माननीय ग.प्र. प्रधान यांच्या हस्ते बक्षीस मिळाले. भाषण ऐकून त्यांनी जवळ बोलावून कौतुक केले. ‘भाषा खूप छान आहे, कुणी तयारी करून घेतली’ याची चौकशी केली. मी सांगितल्यावर म्हणाले, ” असे वडील लाभलेत, खूप भाग्यवान आहेस. खूप मोठी हो.” त्यावेळी तुमचा खूप अभिमान वाटला.
खरोखरी तुमच्यामुळेच आयुष्याचा, शिक्षणाचा, त्यातल्या भाषेचा पाया पक्का झाला. विचारांना दिशा मिळाली. चांगले म्हणजे काय ?, आदर्श कसे असावेत याचे भान मिळाले. श्रध्दा डोळस झाली.
यंदा तुम्हाला जाऊन चौतीस वर्षे झाली. खरंतर तुमची आठवण आली नाही असा एकही दिवस जात नाही. ध्यानीमनी तुम्ही वसलेले आहात. तुमचे असे अकाली जाणे खूपच जिव्हारी लागून राहिले आहे.
तुमचे व्यक्तिमत्व होतेच तेवढे चतुरस्त्र.किती रुपे आठवावीत तुमची ? वकिली कोट घालून कोर्टात बाजू मांडणारे तुम्ही, सर्वांसाठी “क्रॉस घ्यावी तर तुम्हीच ” असे असणारे,शाळेत झेंडावंदन करणारे,घरी सोवळे नेसून खणखणीत आवाजात ‘महिम्न’ म्हणणारे, पांढरा ड्रेस,कपाळी बुक्का,गळ्यात टाळ घालून वारीत अभंग म्हणत जाणारे, मुला-नातवंडांच्या गराड्यात चांदण्यात ओसरीवर पेटी वाजवत कटाव गाणारे, झोपाळ्यावर बसून रामरक्षा म्हणणारे तुम्ही. तुमच्या मोठेपणाचा आम्हाला खूप अभिमान वाटायचा.तुमचे व्यक्तिमत्व खूपच खास होते.पण ध्यानीमनी नसताना अचानक हे सर्व चित्र पुसले गेले.याची खंत अजूनही मनातून जात नाही.
तुम्हाला साहित्याची खूप आवड,गाण्याची आवड ,सर्व कलांची आवड होती.त्यामुळे कितीतरी मोठ्या मोठ्या लोकांना आम्हाला समक्ष पाहता,भेटता आले.
तुमचे अक्षर वळणदार,लेखन खूप सुंदर असायचे. तुमची पत्रे अजूनही जपून ठेवली आहेत.तुम्हाला येत नव्हती अशी गोष्टच नव्हती.आजच्या ‘गुगल बाबा’ सारखे तुम्ही आमच्या साठी “येथे सर्व माहिती उपलब्ध” असे होतात.खेडेगावात रहातो म्हणून कोणत्याही नवीन,प्रगत गोष्टींपासून आम्ही वंचीत रहाणार नाही हे तुम्ही आवर्जून पाहिलेत ही तर खूप मोठी गोष्ट आहे.
आमच्या सर्व गोष्टीत तुम्ही मनापासून सहभागी व्हायचात. अगदी आम्ही काढलेल्या रांगोळ्यांच्या वर तुमचा एखादा रेखीव ॐ, श्री, किंवा स्वस्तिकाचा साज साऱ्या अंगणाला चार चांद लावायचा.
नातवंडांनी डाॅक्टर व्हावे अशी तुमची इच्छा होती. माझी अश्विनी डॉक्टर झाली तेव्हा खूप आनंद झाला.तुमची तीव्रतेने आठवण झाली. तिचा आता आम्हा सर्वांना खूप मोठा आधार आहे.
तुम्ही आमच्या मनात खूप चांगल्या गोष्टींचे बीज रूजवले आहे.त्यांची चांगली रुजवण आज दिसून येतेय.पण तुमचीच उणीव खूप जाणवते.आज काहीही लेखन करताना तुमची तीव्रतेने आठवण येते.तुम्ही कसे लिहिले असते,काय विचार मांडला असता हे मनात येते.
तुमच्या माघारी ती.आईने २३ वर्षे तुमची दोघांची भूमिका उत्तम रीतीने निभावली. तुमच्यासारखे आई-वडील मिळाले हे आमचे खूप मोठे भाग्य आहे. त्यासाठी मी देवाची सदैव ऋणी आहे. आज तुमच्या शताब्दीच्या निमित्ताने आम्ही सर्व भावंडे तुमच्या आठवणींमधे गुंगून गेले आहोत. यातून आपल्या आजोबा- पणजोबांच्या चरित्रातून काय बोध घ्यावा, कोणते संस्कार घ्यावेत हे पुढच्या पिढीला कळेल असाही एक विचार आहे.
आज तुमच्या आशीर्वादाने आम्हा सर्व बहिणी भावांचे सर्व अगदी उत्तम आहे.तुमची नातवंडे आणि आमचीही नातवंडे हुशार,गुणी आहेत.पण हे सारे कौतुक तुम्ही काही पाहिलेलच नाही.याचे मात्र फार फार वाईट वाटते. एकदा तरी तुम्ही आम्हा सर्वांचे संसार डोळे भरुन पहावेत असे वाटते आणि या गाण्याप्रमाणे मनात येते,

कल्पवृक्ष कन्येसाठी
लावुनिया बाबा गेला
वैभवाने बहरून आला
याल का हो बघायाला
याल का हो बघायाला ?
तुमची
लाडकी लेक
ज्योत्स्ना.

ज्योत्स्ना तानवडे. वारजे,पुणे.५८
( ” ‘देव’माणूस “या स्मरणिकेतील लेख )

प्रतिक्रिया व्यक्त करा

twenty − 16 =