You are currently viewing यशोधरा

यशोधरा

जागतिक मराठी साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य ज्येष्ठ लेखक कवी गझलाकार श्री अरविंदजी ढवळीकर यांची काव्यरचना

कितीक फुलल्या प्रेम कथा ही महती वसुंधरेची
उपेक्षीत परि ज्योत उजळती प्रिती यशोधरेची ।।
जगावेगळी करुणा ज्याची तोच तयाचा ध्यास
प्रज्वलीत हो विवेक अंतरि हिच जयाची आंस
दिव्यत्वावर त्या ओवाळी कुरवंडी प्राणांची
उपेक्षीत परि……
राधे परि ना कृष्णसख्याची ओढ वसे हृदयी
ना मीरे परि विरही माधवा शोधे ठायी ठायी
जग संसार जयाचा बनली अर्धांगिनी त्याची
उपेक्षीत परि…….
नसे लोभ ना राज्य आकांक्षा संत संग मानसी
दंडपाणि दुहिता शाक्यांची भुले याच गुणांसि
मूर्तिमंत त्यागाशि प्रीती करि पत्नी सिद्धार्थाची
उपेक्षीत परि…..
दूर उर्मिला पती काननी तरि आंस उरे मिलना
यशोधरेच्या नशिबात पण नसे ती ही कल्पना
सर्वस्व पतीचे ध्येय यद्न्य दे आहुतीच स्वप्नांची
उपेक्षीत परि…..
प्रेम पाश आवरी स्वये अन् बुद्ध जगाला देई
निस्तब्ध शांत ती नसे अनावर बुद्ध भेट होई
आले तुमचा निरोप घ्याया वाणी जणु वेदांची
उपेक्षीत परि……
कितीक फुलल्या प्रेम कथा ही महती वसुंधरेची
उपेक्षीत परि ज्योत उजळती प्रिती यशोधरेची

अरविंद

प्रतिक्रिया व्यक्त करा

11 − ten =