You are currently viewing कुडाळमध्ये गोवंश कत्तल करणाऱ्या आंतरराज्य रॅकेटला दणका! अविनाश पराडकर यांनी थरारक पाठलाग करून कंटेनर पकडला

कुडाळमध्ये गोवंश कत्तल करणाऱ्या आंतरराज्य रॅकेटला दणका! अविनाश पराडकर यांनी थरारक पाठलाग करून कंटेनर पकडला

◼️ *कंटेनर अंगावर चढवत चिरडण्याचाही झाला प्रयत्न*

◼️ *कंटेनरमध्ये २९ बैलपाडे, १ रेडकू. एका पाड्याचा आतमध्ये गुदमरून मृत्यू*

◼️ *संतप्त जमावाने ड्रायव्हरसह चार जणांना चोपले*

◼️ *पोलीस स्टेशनमध्ये जमलेल्या संतप्त जमावामुळे वातावरण झाले तंग!*

कुडाळमध्ये रात्री नऊ नंतर शेकडोंच्या संख्येने जमाव एकत्र आल्यानंतर पोलीस स्टेशनच्या आवारात वातावरण तंग झाले होते. परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता घेऊन वरिष्ठ पोलीस अधिकारी कुडाळ पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाले. दंगल नियंत्रण पथकालाही पाचारण करण्यात आले होते.

काल रात्री नऊच्या सुमारास कुडाळमधून भरघाव वेगाने कंटेनर हायवेच्या दिशेने जात होता. काहीतरी संशयास्पद प्रकार आहे हे लक्षात येताच अविनाश पराडकर यांनी राजवीर पाटील यांच्यासह पाठलाग करत हॉर्न वाजवत थांबण्याचा इशारा केला. परंतु कंटेनर न थांबता पुढे चालला होता. अखेर एलआयसी कार्यालयाबाहेरच्या रस्त्यावर मोटारसायकल आडवी घालून कंटेनर थांबवण्याचा प्रयत्न केला असता कंटेनर तसाच पुढे अंगावर आला. प्रसंगावधान राखून मोटारसायकल पुढे घेतली गेली व दुसऱ्या प्रयत्नात कंटेनर थांबवण्यात यश आले. आतमध्ये गुरे असल्याचे व विनापरवाना कत्तलीसाठी केरळपर्यंत नेली जात असल्याचे वाहनचालकाने सांगताच तिथे उपस्थित नागरिकांनी संतप्त होत त्याला चांगलाच चोप दिला. दरम्यान पोलीस तिथे पोहोचले आणि कंटेनर ताब्यात घेत पोलीस ठाण्यात आणण्यात आला. नागरिकांनी गुरांना मुक्त करण्याची मागणी केली परंतु पोलीस कायदेशीर प्रक्रियेत वेळ काढत असल्याने पोलिस ठाण्याच्या परिसरात जमावाचा संताप आणि जय श्रीराम घोषणांचा प्रचंड गदारोळ माजला. अखेर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करत रात्री एक वाजल्यानंतर कंटेनर सरसोली धाम येथील गोशाळेत नेण्यात आला. यावेळी पंचनामा करण्यात आला तेव्हा कंटेनर मध्ये एकुण ३० गुरे आढळून आली. त्यात अत्यंत सुदृढ असे २९ बैलपाडे व एक रेडकू होते. अतिशय क्रूर पद्धतीने त्यांना गाडीत बांधण्यात आले होते. त्यामुळे चिरडून एका बैलाचा आतच मृत्यू झाला होता. पहाटे उशिरापर्यंत गुन्हे दाखल करण्याचे काम चालू होते. परंतु एवढ्या उशिराही कुडाळमध्ये शेकडो गोरक्षक जागे राहून तपासाला सहकार्य करत होते. पोलीस यंत्रणेनेही या सर्वांच्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले असून कठोर कारवाई करण्याचे आणि असले प्रकार भविष्यात होऊ न देण्यासाठी पावले उचलण्याचे आश्वासन दिले. कुडाळ पोलीस ठाण्याचे निरीक्षक फुलचंद मेंगडे स्वतः तपासावर लक्ष ठेवून होते.

यावेळी कुडाळमधील शेकडो नागरिकांनी पोलीस स्थानकात हजेरी लावली. यामध्येभाजपाचे राजू राऊळ, बंड्या सावंत, माजी नगरसेविका सौ संध्या तेरसे, पप्या तवटे, तालुकाध्यक्ष दादा साईल, मिलिंद देसाई, स्वरूप वाळके, मनोज वालावलकर, शिवप्रेमीचे रामा नाईक, माजी नगराध्यक्ष ओंकार तेली, मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परब, प्रसाद नातू, पंडित सर, माजी नगरसेवक गणेश भोगटे यांची प्रमुख उपस्थिती होती. दरम्यान अविनाश पराडकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार उशिरापर्यंत गुन्हा नोंदवण्याचे काम चालू होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

16 − 7 =