You are currently viewing कोविडच्या उपचारासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारावी….

कोविडच्या उपचारासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारावी….

ग्राहक पंचायत महाराष्ट्र-कोकण विभागाची मागणी

वैभववाडी
राज्य सरकारतर्फे राज्यातील सर्व रहिवाशांना महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत विनाशुल्क कोविड-१९ उपचार पुरविण्यात येतील, असे जाहीर करण्यात आले असले तरी यावर देखरेख करणारी एक स्वतंत्र यंत्रणा राज्य सरकारने निर्माण करावी अशी मागणी ग्राहक पंचायत महाराष्ट्र,कोकण विभागाच्यावतीने एका निवेदनाद्वारे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे केली आहे.
कोरोना महामारीच्या काळात रुग्णांची आणि त्यांच्या नातेवाईकांची होणारी घुसमट आणि सर्वत्र चाललेला गोंधळ लक्षात घेता यावर देखरेख करणारी यंत्रणा उभारून रुग्णांना त्याचा लाभ मिळतो की नाही याकडे तातडीने लक्ष द्यावे अशी मागणी या निवेदनात ग्राहक पंचायत महाराष्ट्राचे कोकण विभाग प्रभारी अध्यक्ष प्रा.श्री.एस.एन.पाटील यांनी केली आहे. २३ मे रोजी शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार राज्याचे रहिवासी असलेल्या सर्वांना विनाशुल्क कोविड-१९ एफबी उपचार पुरविण्यात येतील. उपचाराचा खर्च हा महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत शासनाकडून उचलण्यात येईल. या योजनेचा कोविड-१९ च्या उपचारासाठी सर्व रहिवाशांना लाभ मिळणार आहे. रुग्णाचे आधार कार्ड, रेशन कार्ड आवश्यक आहे. अंगीकृत रुग्णालय (राज्यभरात ९७३ आहेत) खाजगी असो वा शासकीय रुग्णालय, आहार ते किरकोळ तपासण्या ते आयसीयू यापैकी कशाचे शुल्क भरण्याची आवश्यकता नाही, असे असले तरी बिगर शासकीय रुग्णालये यांना नेहमीप्रमाणे नफेखोरी करता येणार येत नसल्याने ते काही प्रमाणात योजनेच्या अंमलबजावणीत आडकाठी आणत आहेत. त्याकडे ही देखरेख यंत्रणा लक्ष देईल. प्रत्यक्षात रुग्णालयाने स्वतःहून सदर योजनेचा लाभ द्यावयाचा आहे. न दिल्यास ग्राहक आयोगाकडे जाऊन भरलेले पैसे सुद्धा परत घेता येतील आणि या देखरेख यंत्रणेने यांना दंड करावा, असे ग्राहक पंचायत महाराष्ट्र यांच्यावतीने या निवेदनात नमूद केले आहे.
योग्यप्रकारे रुग्णालय प्रशासनाला त्याच्या असंवेदनशील नफेखोरीबद्दल धारेवर धरल्यास ते वटणीवर येतातच. पण त्यासाठी आपल्याला माहिती असणे गरजेचे आहे. कोणाला या प्रकारचा त्रास सहन करावा लागू नये म्हणून रुग्णाचे रेशन कार्ड, आधार कार्ड आणि शासन निर्णयाची प्रत सुरुवातीलाच रुग्णालयाकडे द्या आणि या योजनेअंतर्गत उपचार करण्याचा आग्रह धरा. जर त्यांनी स्वीकारण्यास मनाई केली तर प्रथम हॉस्पिटलला ही कागदपत्रे ई-मेलने पाठवा, म्हणजे पाठवल्याचे रेकॉर्ड राहील. कोविड-१९ च्या रुग्णाची कशी हाताळणी करायची याबद्दलच्या सूचना देखील एका दुसऱ्या शासन निर्णयात आहेत त्या माहित करुन घ्याव्यात. त्यातून रुग्णाच्या काळजी संदर्भात योग्य प्रश्न रुग्णालय स्टाफला विचारायला मदत होईल. कोविड-१९ चे रुग्ण हे सतत नजरेआड असल्याने योग्य काळजी घेतली जाते की नाही याबद्दल चिंता वाटणे सहाजिक आहे, असेही ग्राहक पंचायत महाराष्ट्र-कोकण विभागाचे प्रभारी अध्यक्ष व सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्रा.श्री. एस. एन.पाटील, जिल्हा संघटक श्री.एकनाथ गावडे व खजिनदार श्री.संदेश तुळसणकर यांनी निवेदनात म्हटले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

3 × 2 =