You are currently viewing शाळा कॉलेजच्या वेळेनुसार ग्रामीण भागातील बस फेर्‍यांचे नियोजन करा

शाळा कॉलेजच्या वेळेनुसार ग्रामीण भागातील बस फेर्‍यांचे नियोजन करा

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने सावंतवाडी आगार प्रमुखांना निवेदन

सावंतवाडी

कोरोना महामारी मुळे सन २०२१ – २२ हे शैक्षणिक वर्ष उशिराने चालू होत आहे. २ सप्टेंबर पासून इयत्ता १०वी ते १२वी आणि ४ऑक्टोबर पासून ५वी ते ९वी व ११वी चे वर्ग शासनाच्या आदेशाप्रमाणे नियमितपणे सुरू केलेले आहेत. त्याच प्रमाणे उच्च शिक्षण वर्ग सुद्धा २० ऑक्टोंबर पासून सुरु होत आहेत. या पार्श्वभूमीवर शाळा-कॉलेज यांच्या वेळेनुसार आगारातून सुटणाऱ्या बसच्या फेऱ्यांचे नियोजन करावे अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्यावतीने सावंतवाडी आगार प्रमुखांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

एक-दीड वर्षापासून टाळेबंदीमुळे बंद असलेली एसटी बस सेवा सुद्धा आता पूर्ण क्षमतेने सुरू झालेली आहे परंतु टाळेबंदीनंतर सुरु होणारी शाळा कॉलेज हे कोरोनाचे नियम पाळून सुरू झाले असल्यामुळे शाळा-कॉलेज यांच्या वेळा या प्रत्येक वर्गवारीनुसार वेगवेगळ्या असल्याने आपल्या आगारातून सुटणाऱ्या बसच्या फेऱ्या यांच्या वेळा व शाळा कॉलेज यांच्या वेळा मध्ये काही ठिकाणी ताळमेळ बसत नसल्याने विद्यार्थी यांचे अतोनात हाल होत आहेत.

म्हणूनच तालुक्यातील शाळा व कॉलेज व्यवस्थापन यांच्याशी समन्वय साधून योग्य ती कार्यवाही करावी व तालुक्यातील ग्रामीण भागात जाणाऱ्या व येणाऱ्या गाड्यांच्या वेळा या पूर्ण कालावधी पूर्वी जशा नियमित होत्या त्याचप्रमाणे करण्यात याव्यात अशी विनंती सदर निवेदनाद्वारे मनविसे उपतालुका अध्यक्ष गोविंद मोरये यांनी केली. यावेळी मनविसेचे पदाधिकारी मनीष पालव, शुभम कोरगावकर, अनुप सोनी , आशिष सुभेदार, संतोष भैरवकर, लक्ष्मीकांत हरमलकर आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

18 + 1 =