You are currently viewing निरोप घराचा

निरोप घराचा

जागतिक मराठी साहित्य कला व्यक्ती विकास मंच सदस्य दीपक पटेकर यांची अष्टाक्षरी काव्यरचना

जाता लेकरे चाकरी
होते रिकामी ते घरं
मन सांगीतसे नको
जाऊ सोडूनिया दूर

भाऊ बहीण सगळे
होते नांदत घरात
सुख भरुनी वाहले
घरदार उंबऱ्यात

नातरांच्या गोंधळात
घर वाटे जागे झाले
दिसभर कळशीशी
रहाट बावीचा बोले

पाठ टेकली भिंतीस
भिंत गारवा देतसे
गोठ्यातूंनी काळी गाय
हंबरुनी रडतसे

खोली खोली घरातली
उजेडाची वाट पाही
झरोकाच कौलातूनी
कसा डोकावत राही

सुनी सुनी ती ओसरी
पडवीत स्तब्ध झोका
गोंजारील कोण आता
चुलीवर झोपे बोका

दार धरुनी निरोप
देई म्हातारी आई
बाप अश्रू लपवित
ओझं खांदावर घेई

©[दिपी]✒️
दीपक पटेकर, सावंतवाडी
८४४६७४३१९६

प्रतिक्रिया व्यक्त करा

nineteen − fifteen =