You are currently viewing विनापरवाना ड्रोन चित्रीकरण प्रकरणी ग्रामस्थ आक्रमक

विनापरवाना ड्रोन चित्रीकरण प्रकरणी ग्रामस्थ आक्रमक

विनापरवाना ड्रोन चित्रीकरण प्रकरणी ग्रामस्थ आक्रमक

पर्यावरणीय जागांची हेरगिरी केल्याचा आरोप; कठोर कारवाईची मागणी

वेंगुर्ला :

आरवली, आजगाव दशक्रोशी परिसरातील पर्यावरणाला धोका निर्माण करणाऱ्या विनापरवाना ड्रोन चित्रीकरण प्रकरणी पर्यावरण बचाव दशक्रोशी समिती आजगाव ब्लॉक तसेच परिसरातील ग्रामस्थांनी संबंधित व्यक्तींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे. याबाबतचे निवेदन वेंगुर्ला पोलीस स्थानक, जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी तसेच तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी यांना देण्यात आले.
दिनांक ६ मे २०२६ रोजी आजगाव-धाकोरा परिसरात तसेच ७ मे रोजी आरवली, सोन्सूरे आणि आसोली परिसरात काही व्यक्ती बोलेरो पिकअप वाहनातून फिरत ड्रोनद्वारे चित्रीकरण करत असल्याचे ग्रामस्थांच्या निदर्शनास आले. चौकशीअंती संबंधितांकडे कोणत्याही शासकीय विभागाची परवानगी, आदेश किंवा स्थानिक ग्रामपंचायत व जमीनमालकांची संमती नसल्याचे आढळून आल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. ग्रामस्थांनी विचारणा करताच संबंधित व्यक्तींनी भरधाव वेगाने वाहन घेऊन पळ काढल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणात शिरोडा येथील मयुरेश चंद्रकांत शिरोडकर, नेमळे येथील दीपेश माळेकर तसेच त्यांच्यासोबत असलेल्या इतर अज्ञात व्यक्तींचा समावेश असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. ग्रामस्थांच्या मते, हे चित्रीकरण नेमके कोणाच्या आदेशाने आणि कोणत्या उद्देशाने करण्यात आले, याची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे.
आजगाव-धाकोरा मायनिंग ब्लॉकला यापूर्वीच परिसरातील आजगाव, धाकोरा, आसोली, आरवली आणि सागरतीर्थ येथील ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. रेडी परिसरातील पर्यावरणीय हानीचे उदाहरण समोर ठेवत ग्रामसभांमधून मायनिंग प्रकल्पांविरोधात ठराव मंजूर करून शासनाकडे सादर करण्यात आले आहेत. अशा परिस्थितीत ड्रोनद्वारे पर्यावरणीय संवेदनशील भागांचे चित्रीकरण करण्यात येत असल्याने ग्रामस्थांमध्ये संशय आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
सदर प्रकार हा पर्यावरणीय माहिती गोपनीयपणे संकलित करून ती अन्यत्र पुरवण्याच्या उद्देशाने करण्यात आला असावा, असा संशय व्यक्त करत संबंधितांवर कठोर कलमांखाली गुन्हे दाखल करून तातडीने अटक करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
या निवेदनावर अजित नातू, विलास चिपकर, सुधाकर राणे, तातोबा कुडव, मयुर आरोलकर, आबा चिपकर, सुहास सावळ, सावळाराम टाककर, सुनील मोरजकर यांच्यासह सुमारे ४० ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा