You are currently viewing श्रावण गुलाबी …

श्रावण गुलाबी …

जागतिक “सा क व्य” विकास मंचच्या कवयित्री प्रा.सौ.सुमती पवार, नाशिक यांची कविता.

जीवघेणा जीवघेणा बाई श्रावण महिना
वाट पाहू किती त्याची मला साजण भेटेना
झेलू दारात या किती सळसळ सळ धारा
किती सावरू पदर दांड वारा हा बधेना ….

राती येत नाही झोप खडा खडा वाजे दार
अंधारात घेई शोध नजर ती धारदार
श्रावणातल्या या सरी भिजविती अंगअंग
धारा आसवांच्या माझ्या त्याला नाहीच कदर …

किती कठोर साजण श्रावणात ही भिजेना
ताटकळली मी दारी पहा निष्ठूर येईना
आला तरी आता बाई,बोलणारच मी नाही
जणू गोठला हो काळ, याद त्याची ती जाईना …

जीवाच्या मी पायघड्या त्याच्या साठी हो घातल्या
माझ्या साठी पहा दाही दिशाच गोठल्या
पापणीचा काठ माझा ओलावतो राती
श्रावणात आठवणी …जणू मोहोळ,पेटल्या …

सोसवेना सळ सळ जीव झाला वेडा पिसा
कुणी वेडी म्हणा मला माझ्यावरती हो हसा
कधी पाहीन मी त्याला माझे आतुरले डोळे
नयनाच्या श्रावणात रूप सदा त्याचे खेळे ….

रिमझिम रिमझिम कशा बरसती सरी
झड लागताच बाई पाचू रंगवे रंगारी
लालगुलाबी फुलांचा अंगी लेवून हो शालू
आठवताच साजण मन घेईच भरारी …..

प्रा. सौ. सुमती पवार, नाशिक
(९७६३६०५६४२)

प्रतिक्रिया व्यक्त करा