You are currently viewing अनर्थ घडला तर ती जबाबदारी कुणाची?

अनर्थ घडला तर ती जबाबदारी कुणाची?

संपादकीय……

सावंतवाडीच्या तलावाच्या काठावर गेली अनेकवर्षं सावंतवाडीकर पहाटे फिरायला येतात. मोकळ्या हवेत ताजेतवाने होतात, योगा, व्यायाम करतात. सकाळची शुद्ध हवा घेऊन प्रसन्न चित्ताने घरी परततात. कोरोनाचे संकट असूनही स्वतःच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी, तंदरुस्ती राखण्यासाठी म्हणून कित्येक वयोवृद्ध व्यक्ती, स्त्रिया तसेच तरुण, तरुणी सुद्धा पहाटे पासून तलावाच्या काठावर फिरायला येतात. परंतु सद्यस्थितीत फुटपाथची दुरवस्था झाली आहे.
आरपीडी हायस्कुल पासून शिवरामराजे पुतळ्यापर्यंतचा फुटपाथ तर चालण्यास योग्य नाही, संपूर्ण फूटपाथवर शेवाळ साचल्यामुळे निसरडा झालेला असून पहाटे, संध्याकाळी फिरायला येणारी एखादी व्यक्ती घसरून पडली आणि अनर्थ घडला तर ती जबाबदारी कोणाची? कोरोनाच्या काळात फिरायला आली म्हणून ती व्यक्ती दोषी की फुटपाथची अस्वच्छता न ठेवणारी नगरपालिका?
यापूर्वीचे नगराध्यक्ष अनुभवी होते, माहिती असायची त्यामुळे व्यक्तिशः लक्ष देऊन तळ्याचा काठ स्वच्छ करून घेत होते. परंतु सत्ता बदल झाल्यावर तळ्याकाठचे सौन्दर्य नाहीसे होताना दिसत आहे. मोकाट सोडलेल्या गाई मुळे संपूर्ण फुटपाथ वर शेणाचे थापे असतात. त्यावरून घसरून पडण्याची शक्यता सुद्धा अधिक आहे. नगराध्यक्षांनी स्वतः लक्ष देऊन तळ्याच्या काठावर मोकाट फिरणाऱ्या गुरांच्या मालकांना समज द्यावी व फुटपाथ गुरेमुक्त करून स्वच्छ करून घ्यावा. जेणेकरून सावंतवाडीच्या तलावाचे सौन्दर्य सुद्धा टिकून राहील, स्वच्छता होऊन सकाळी फिरणाऱ्याना तसेच पादचाऱ्यांना चालताना त्रास होणार नाही.

प्रतिक्रिया व्यक्त करा

20 − seven =