खरंच…….

खरंच…….

सावंतवाडीची संस्कृती बदलतेय?

सिंधुदुर्ग जिल्ह्यातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील सुंदर शहर म्हणून सावंतवाडीची ओळख आहे. सावंतवाडी शहराला राजघराण्याचा वारसा आहे. सावंतवाडीची जिल्ह्यातील ओळख ही सुसंस्कृत, सुशिक्षित लोकांचे शहर अशीच आहे. सावंतवाडीत आलेली व्यक्ती सावंतवाडी सोडून जातंच नाही, येणाऱ्या प्रत्येकाला सावंतवाडीचे निसर्ग सौंदर्य, शांत वातावरण भुरळ घालतं.
सावंतवाडीतील राजकारण देखील आजपर्यंत सभ्य लोकांचेच होते, सुडाचे राजकारण सावंतवाडी शहराने कधी अनुभवलेच नाही. हि.हा.शिवराम राजेसाहेब, जेष्ठ समाजवादी नेते माजी आमदार कै. जयानंदजी मठकर, प्रविण भोंसले, दीपक केसरकर अशी खूप चांगली सुसंस्कृत माणसे राजकारणात सावंतवाडी शहराने अनुभवली आहेत. एकीकडे सावंतवाडीवर कृपाशीर्वाद ठेऊन उभा असलेला नरेंद्र डोंगर आणि शहराच्या हृदयाची खोली दडवून ठेवणारा मनमोहक मोती तलाव हे देखील शहरातील लोकांना साजेसे मायाळू, आत्मीयता जपणारेच. सावंतवाडीत लोकांचे पिढीजात व्यवसाय आहेत, सावंतवाडीला वेगळी खाद्यसंस्कृती आहे, संस्थानपासुन गजबजलेली मोठी बाजारपेठ आहे. सर्व समाजाचे, जातीधर्माचे लोक इथे गुण्यागोविंदाने राहतात. अपवादात्मक काहीवेळा एखादी वाईट घटना देखील घडली आहे, परंतु त्यावेळी विरोधक असले तरी राजकारणी लोक एकत्र येत, तरुण मंडळी पेटून उठत, अन्यायाविरुद्ध एक होऊन आवाज उठवत आणि अशा समाजविघातक कृतींना ठेचून काढत होते. शहरात पक्षीय राजकारण असले तरी एकी होती.
सावंतवाडीत अलीकडेच हळूहळू संस्कृती बदलत चालली आहे. या विषयावर लिहिण्याचाही आता वीट आला आहे इतक्या वाईट स्तरावर सावंतवाडीची संस्कृती ढासळलेली आहे. पाटेश्वराच्या या भूमीत मंदिरातील आरती, कीर्तन, घंटानाद, ऐकू यायचा. सोमवार, गुरुवार, शनिवार लोक देवदर्शनासाठी जायचे त्याच आध्यात्मिक, भक्तिरसात डुबलेल्या सावंतवाडीत आज मटक्याच्या ७/७ कंपन्या चालतात, राजरोस जुगार खेळले जातात, अवैद्य दारूधंद्यांची तर राजधानीच झाली, व्हिडिओ गेम, पत्त्यांच्या खेळाच्या नावावर जुगाराचे क्लब चालतात आणि याला छुप्या पद्धतीने पाठिंबा असतो तो या राजकारण्यांचा….किंबहुना यातील काही धंद्यांमध्ये काही राजकारण्यांची पार्टनरशिप, तर काहींची मालकी आहे, आणि काहींचे नातेवाईक, मित्रमंडळी गैरधंद्यांमध्ये यांच्याच पाठिंब्यावर पैशांच्या राशी रचत आहेत.
सावंतवाडी सारख्या छोट्याशा शहरात जिथे पर्यटन वाढीस लागले पाहिजे होते तिथे मटका, दारू, व्हिडिओ गेम चालतात. *कुठूनतरी एक पाटील फलटण घेऊन आपलं पोट भरण्यासाठी सावंतवाडीत येणार नी इथल्या चांगल्या तरुण मुलांची आयुष्य उध्वस्त करणार?* हे असं सावंतवाडीकरांनी किती दिवस खपवून घ्यायचं? आणि कोणासाठी? या गैरधंदे करणाऱ्या आणि त्यांना पाठिंबा देणाऱ्या १०/१५ लोकांसाठी की त्यांच्याकडून हफ्ता घेऊन गब्बर झालेल्या अधिकाऱ्यांसाठी? या गैरधंदे करणाऱ्यांनी करोडोंचे बंगले बांधलेत, प्रॉपर्टी जमा केली, ते गब्बर झालेत. परंतु आपली कोवळी पोरं ज्यांना स्वतःचं चांगलं वाईट अजून कळत नाही, ती मुले उध्वस्त होताना उघड्या डोळ्यांनी पहावं लागतेय याचंच दुःख जास्त. सोयरसुतक नसलेले दारुवाले मात्र तशातही दिवाळीचा फराळ वाटत आहेत, आणि लोकांना खुश करण्याचा प्रयत्न करत आहेत.
हे गैरधंदेवाले माजण्याचे कारणही स्पष्ट आहे, हफ्ता मिळत असल्याने त्यांच्यावर कोणी अधिकारी हात घालत नाहीत, आणि हात घालण्याची वेळ आली तर या गैरधंदे वाल्यांनी स्वतःची प्यादी ठेवलेली आहेत, त्यांच्यावर गुन्हे दाखल होतात, आणि हे मात्र नामानिराळे राहतात. पण दुर्दैवाने कायद्यात या गुन्ह्यांना कडक शासन नसल्याने हे नरकासुर कुणालाच भीक घालत नाहीत. सर्वसामान्य माणसाला साधे घर बांधल्यास, गाडी घेतल्यास इन्कमटक्स वाले मागे लागतात, परंतु गैर धंद्यातून गडगंज प्रॉपर्टी जमविणाऱ्या अशा लोकांवर कधी गुन्हे दाखल होत नाहीत किंवा त्यांची साधी चौकशी देखील करत नाहीत.
सावंतवाडीतून गैरधंदेवाल्यांचा भस्मासुर संपवायचा असेल तर तो फक्त संपवू शकतं ते *जन आंदोलन* सावंतवाडीची जनताच हे संपवू शकते, आणि तीच वेळ आता आलेली आहे, जनतेतून उठाव झालाच पाहिजे. सावंतवाडीतील तरुण, सुसंस्कृत वर्गाने आता पुढे आले पाहिजे, सावंतवाडीची संस्कृती वाचवायची असेल, भावी पिढी जपायची असेल तर सावंतवाडीतील व्यापारी वर्ग, लोकप्रतिनिधींनी, समाजसेवक, तरुणवर्ग, महिलामंडळ, यांनीच हा शिवधनुष्य उचलला पाहिजे आणि सावंतवाडीची संस्कृती जपली पाहिजे.

क्रमशः

प्रतिक्रिया व्यक्त करा