अत्यंत आवश्यक असेल तरच नागरिकांनी घराबाहेर पडावे – जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी

अत्यंत आवश्यक असेल तरच नागरिकांनी घराबाहेर पडावे – जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी

सिंधुदुर्गनगरी

जिल्ह्यामध्ये 25 जुलै पर्यंत ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने दिला आहे. सद्या जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस सुरू असून नागरिकांनी अत्यंत आवश्यक असेल तरच घराबाहेर पडावे, असे आवाहन जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी केले.

            गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. जिल्ह्यातील तिलारी धरण आणि कर्ली, वाघोटनमधील पाणी पातळीत वाढ होऊन इशारा पातळीपर्यंत पोहचली आहे. नदीकाठच्या गावातील लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पाटबंधारे, महसूल, पोलीस, जिल्हा परिषद यंत्रणा सज्ज असून सावधानतेचा इशारा दिला आहे. कणकवली येथील गड नदीमधीलही पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने काही ठिकाणच्या लोकांना स्थलांतरीत करण्यात आले आहे. राज्य महामार्ग आणि राष्ट्रीय महामार्गावर काही ठिकाणी पाणी आल्याने वाहतूक बंद केली आहे. करुळ आणि भूईबावडा घाट बंद असून फोंडा आणि आंबोली मार्गे अजून वाहतूक सुरू आहे. आज आणि उद्या मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता वर्तवल्याने नागरिकांनी सतर्क रहावे.

            अत्यंत आवश्यक असेल तरच घराबाहेर पडावे, प्रशासनाला सहकार्य करावे. अधिक माहितीसाठी तसेच मदतीसाठी 1077 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा