भुईबावडा रस्त्याची झाली “चाळण”, मार्ग तात्काळ निर्धोक करा – शारदा कांबळे

भुईबावडा रस्त्याची झाली “चाळण”, मार्ग तात्काळ निर्धोक करा – शारदा कांबळे

सार्वजनिक बांधकामला निवेदन, आंदोलनाचा इशारा…

वैभववाडी

वाढत्या रहदारीमुळे वैभववाडी-भुईबावडा रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता हे ओळखणेही मुश्कील झाले आहे. दोन ठिकाणी हा मार्ग खचला आहे. या मार्गावर अपघातांची मालिका सुरू आहे. तरी सदर रस्त्याची तात्काळ डागडुजी करावी. या मागणीचे निवेदन जि. प. सदस्य शारदा कांबळे यांनी सार्वजनिक बांधकामचे कार्यकारी अभियंता यांना दिले आहे. खड्डेमय रस्त्यांमुळे प्रवासी व नागरिकांत तीव्र असंतोष पसरला आहे. जनतेतून या विरोधात उद्रेक होवून जनआंदोलन झाल्यास त्याला संपूर्ण जबाबदारी विभाग राहील असे निवेदनात सौ. कांबळे यांनी म्हटले आहे.
करुळ घाट रस्ता खचल्यामुळे या मार्गावरील संपूर्ण वाहतूक एडगांव, उंबर्डेमार्गे-गगनबावडा अशी वळविण्यात आली आहे. अवजड वाहनांच्या रांगाच या मार्गावर दिसत आहेत. त्यामुळे रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. कुसूर व उंबर्डे कुंभारवाडी या ठिकाणी रस्ता खचला आहे. साईड पट्ट्या पावसात वाहून गेल्या आहेत. तालुक्यातील जवळपास १७ गावे या परिसरात आहेत. त्यांना शासकीय कामासाठी वैभववाडीत यावे लागते. परंतु खड्डेमय रस्त्याचा सामना त्यांना नेहमी करावा लागत आहे. सदर रस्ता तात्काळ दुरुस्त करा. अशी मागणी सौ. शारदा कांबळे यांनी निवेदनातून केली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा