You are currently viewing गेम करतात की गेम होतात?

गेम करतात की गेम होतात?

सावंतवाडीत लोणचे तोंडी लावावे तशी चवीने चर्चा

सावंतवाडीत कोरोनाच्या काळात शांततेत चाललेलं राजकारण अचानक ढवळून निघाले ते नगराध्यक्ष सच्चिदानंद उर्फ संजू परब यांनी एमटीडीसी च्या कामांमध्ये घोटाळा झाल्याचे सांगत भ्रष्टाचाराचे आरोप माजी राज्यमंत्री व विद्यमान आमदार दीपक केसरकर तसेच माजी नगराध्यक्ष बबनराव साळगावकरांवर करत खळबळ उडवून दिली. संजू परब हे नगराध्यक्ष पदावर येऊन दीड वर्षांपेक्षा जास्त काळ उलटून गेला, परंतु नगराध्यक्ष पदाचा चार पाच महिन्यांचा कालावधी शिल्लक असताना ज्यांच्यावर संपूर्ण राजकीय कारकिर्दीत कधीही भ्रष्टाचाराचे आरोप झाले नाहीत त्या आमदार केसरकर व बबनराव साळगावकरांवर आरोप करण्याचे कारण काय? एमटीडीसी हे स्वतंत्र महामंडळ असताना भ्रष्टाचाराचे आरोप केसरकर, साळगावकर यांच्यावर केवळ चर्चेत राहण्यासाठी किंवा शहरवासीयांचे लक्ष वळविण्यासाठी तर नव्हेत ना?
थेट नगराध्यक्षपदाच्या पोट निवडणुकीत देवगडचे आमदार नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली सावंतवाडी पालिकेत वर्चस्व मिळविण्यासाठी प्रचाराची सूत्रे हालत होती. नितेश राणे यांनी सावंतवाडीच्या भाजी मार्केटमधील भाजी विक्रेत्या व्यापाऱ्यांशी देखील संवाद साधून अडचणी सोडविण्या संदर्भात चर्चा केली होती. शहरात आणणाऱ्या प्रकल्पांची, शहरात करण्यात येणाऱ्या विकासाची माहिती देत मतदानाच्या पूर्वसंध्येला शहराच्या संपूर्ण विकासाची जबाबदारी घेतली होती. परंतु त्याचवेळी दुसऱ्या बाजूने तत्कालीन राज्यमंत्री असलेले रवींद्र चव्हाण हे देखील पडद्या आडून सूत्रे हलवीत होते. बऱ्याच प्रमाणावर आर्थिक परिस्थिती त्यांनीच सांभाळली होती. त्यामुळे निवडणूक झाल्यानंतर आपला विजय हा रवींद्र चव्हाण साहेबांमुळे झाला असे संजू परब खाजगीत बोलल्याची चर्चा बाजारपेठेत रंगत होती. आणि त्याला मूर्त स्वरूप आलेले संजू परब आणि रवींद्र चव्हाण यांचे परब नगराध्यक्ष झाल्यानंतर जुळलेल्या स्नेह संबंधावरून दिसून आले.
परब यांनी केसरकरांवर आरोप केल्यावर केसरकरांनी केलेला पलटवार जिव्हारी लागल्याने आमदार नितेश राणे पुन्हा एकदा केसरकरांच्या पत्रकार परिषदेला उत्तर देण्यासाठी सावंतवाडीत आले. संजू परब यांच्या आरोपांची पाठराखण करत त्यांनी केसरकरांवर निशाणा साधला व केसरकरांची ईडीची चौकशी लावण्याचा इशाराच दिला. केसरकरांची गोव्यातील मालमता वगैरे संदर्भात भाष्य करत सावंतवाडीकरांना दिलेले वचन उर्वरित दिवसात पूर्ण करण्याची ग्वाही देखील दिली.
आम.दीपक केसरकर हे कच्चे खेळाडू नव्हेत, त्यांनी आम.राणेंच्या टिकेनंतर पत्रकार परिषद घेत नगराध्यक्ष निवडणुकीपूर्वी संजू परब यांनी आपल्याकडे सेना प्रवेशासाठी २कोटी ७० लाख रुपये मागितले होते व ही मिटिंग कुडाळ येथील डॉ.बाणावलीकरांच्या घरात झाली होती असे सांगत खळबळ उडवून देत संजू परब यांना सावंतवाडीकरांसमोर उघडे पाडले. घडलेल्या सर्व घडामोडींमधून आम.दीपक केसरकरांवर किंवा नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्यावर आरोप केले तरी सावंतवाडीच्या सुज्ञ जनतेस केसरकर व साळगावकर द्वयीनवर विश्वास असून त्यांच्या चारित्र्यावर कुठलाही डाग लागणार नाही.
परंतु…..
नवखे नगराध्यक्ष संजू परब यांचा खरा चेहरा सावंतवाडीच्या जनतेसमोर आणून दीपक केसरकरांनी पुढील रणनीती सावंतवाडीच्या जनतेवर सोपविली आहे. त्यामुळे घडलेल्या आरोप प्रत्यारोपांच्या खेळात संजू परबांनी कोणाचा गेम केला की संजू परबांचाच कोणी गेम केला की काय? अशी चर्चा मात्र सुरू झाली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा