You are currently viewing तौक्ते वादळातील लाभार्थ्यांच्या यादीत नाव नसल्याने देवबाग मधील ग्रामस्थ संतापले

तौक्ते वादळातील लाभार्थ्यांच्या यादीत नाव नसल्याने देवबाग मधील ग्रामस्थ संतापले

मालवण तहसीलदारांना निवेदनातून मांडली कैफियत

मालवण

तौक्ते वादळात नुकसान झालेल्या घरांच्या पंचयाद्या करूनही भरपाई लाभार्थ्यांच्या यादीत आपले नाव नसल्याने देवबाग मधील महिला व ग्रामस्थांनी मालवण तहसीलदारांना निवेदन सादर करून याबाबत लक्ष वेधले. आम्हाला नुकसान भरपाई मिळणार की नाही असा सवाल निवेदनातून उपस्थित केला आहे. तहसीलदारांना निवेदन सादर करतेवेळी देवबाग येथील रमीता येरागी, अपर्णा धुरी, रेश्मा उपरकर, वैशाली कुपकर, अनघा पाटकर, रमेश येरागी, कॅलिस डिसोझा आदी उपस्थित होते.

समाज माध्यमातून प्राप्त याद्यांमध्ये आपल्या नावांचा समावेश नसल्याचे देवबाग मधील ग्रामस्थांनी स्पष्ट केले. या याद्या अधिकृत आहेत की अजून अंतिम याद्या व्हायच्या आहेत, यासंदर्भात आम्हाला मार्गदर्शन केले जावे. तसेच आम्हाला नुकसान भरपाई मिळणार की नाही, याविषयीसुद्धा प्रशासनाकडून स्पष्टता व्हावी, अशी मागणी महिला व ग्रामस्थांनी केली. घर नुकसान भरपाई वाटपाला सुरुवात झाली असून ज्यांच्या पंचयाद्या झालेल्या आहेत, त्या सर्वांना नुकसान भरपाई मिळणार आहे असे यासंदर्भात माहिती देताना निवासी नायब तहसीलदार आनंद मालवणकर यांनी सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा