You are currently viewing पाडलोस-माडाचेगावळ येथे दोन एकर मधील काजू बागायती जळून खाक…

पाडलोस-माडाचेगावळ येथे दोन एकर मधील काजू बागायती जळून खाक…

बांदा

पाडलोस माडाचेगावळ येथील काजूबागयतदार तुकाराम गंगाराम गावडे यांच्या दोन एकर वरील काजू बागेस अचानक आग लागून 52 काजू कलमे जळून खाक झाली. सहा वर्षांची उत्पन्न देणारी काजू कलमे जळाल्याने सुमारे चार ते पाच लाखांचे नुकसान झाल्याचे उपस्थित काजू बागायतदार शेतकरी व तुकाराम गावडे यांनी सांगितले.

माडाचेगावळ येथे तुकाराम गावडे यांची दोन एकरच्यावर काजू बागायत आहे. दुपारी 3 वाजताच्या सुमारास काजू बागेमधून धूर येत असल्याचे तुकाराम गावडे यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तात्काळ बागेजवळ धाव घेतली असता आपल्या बागेला आग लागल्याचे दिसले. तात्काळ पाण्याच्या साहाय्याने एका बाजूची आग त्यांनी विझवली मात्र आगीने रौद्ररूप धारण केल्यामुळे त्यांचे प्रयत्न तोकडे पडले.

सहा वर्षांची काजू झाडे मोठी करण्यासाठी मजूरसह इतर खर्च सर्व वाया गेला. पाडलोस उपसरपंच राजू शेटकर यांनी घटनास्थळी जात प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी तुकाराम गावडे यांनी सांगितले की संबंधित अधिकाऱ्यांना पंचनामासाठी कळवले परंतु कोणीही दखल घेतली नाही. उत्पन्न देणारी काजू कलमे जळाल्याने उदरनिर्वाहाचे साधन निर्माण झाले आहे. सद्यस्थितीत आपण दहा वर्षे मागे गेल्याचे श्री. गावडे यांनी उपसरपंच शेटकर यांना सांगितले. दोन दिवसांत पंचनामा न केल्यास अधिकाऱ्यांना कार्यालयात जात जाब विचारणार असल्याचा इशारा श्री. शेटकर यांनी दिला. आगीचे नेमके कारण मात्र समजू शकले नाही.

प्रतिक्रिया व्यक्त करा

3 × five =