You are currently viewing गणपती स्पेशल गाड्या मडुरा स्थानकापर्यंत सोडा

गणपती स्पेशल गाड्या मडुरा स्थानकापर्यंत सोडा

पिंट्या परब यांची मागणी

बांदा

गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेतर्फे सीएसएमटी, पनवेल ते सावंतवाडी, रत्नागिरी दरम्यान 72 स्पेशल गाड्या चालविण्यात येणार आहेत. परंतु गोव्याच्या दिशेने महाराष्ट्राचे शेवटचे स्थानक असलेल्या मडुरा स्थानकाचा प्रशासनास विसर पडला आहे. अद्याप एकही गणपती स्पेशल गाडी मडुरा स्थानकापर्यंत सोडण्यात न आल्याने मडुरा दशक्रोशीसह हजारो प्रवाशांना त्रासाला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे निदान गणपती स्पेशल गाड्या मडुरा स्थानकापर्यंत सोडा किंवा एक्सप्रेस गाड्यांना थांबा द्यावा अशी मागणी, सामाजिक कार्यकर्ते प्रवीण ऊर्फ पिंट्या परब यांनी केली आहे.

मडुरा रेल्वे स्थानकात नेहमी थांबणारी सावंतवाडी-दिवा-मडगाव पॅसेंजर गाडी कोरोनामुळे बंद आहे. त्यात मध्य रेल्वेतर्फे सोडण्यात आलेल्या गाड्या सावंतवाडी स्थानकापर्यंतच धावणार असल्याने मडुरा स्थानकासह दशक्रोशीतील गावांवर अन्याय होत आहे. सावंतवाडी येथून चाकरमान्यांना आपल्या गावी येण्यासाठी पाचशे ते सहाशे रुपये मोजावे लागतात. मुळात रेल्वे तिकिटाच्या किंमतीपेक्षा अधिक आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने याकडे भावनात्मकदृष्टीने लक्ष देऊन गणपती स्पेशल गाड्या मडुरा स्थानकापर्यंत सोडाव्यात, असे श्री.परब म्हणाले. कोकणकन्या एक्सप्रेस, मांडवी एक्सप्रेस गाड्यांना मडुरा स्थानकात थांबा नाही तर राज्यराणी एक्सप्रेस गाडी गोव्याच्या दिशेने राज्याच्या शेवटच्या स्थानकापर्यंतच पोहचत नाही. त्यामुळे निदान गणपती स्पेशल गाड्या तरी मडुरा स्थानकापर्यंत सोडाव्यात, अशी मागणी पिंट्या परब यांनी केली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

19 − sixteen =