You are currently viewing डंपर चालक मालक संघटनेने जनतेच्या जीविताची काळजी घ्यावी, जनतेच्या संयमाचा अंत पाहू नये – किसन मांजरेकर

डंपर चालक मालक संघटनेने जनतेच्या जीविताची काळजी घ्यावी, जनतेच्या संयमाचा अंत पाहू नये – किसन मांजरेकर

 

जिल्ह्यात सध्या चोरट्या वाळुचा खेळ चालला आहे, यात प्रशासन आणि डंपर चालकांचा खेळ होती, पण सामान्य जनतेचा जीव जातो. हा प्रकार तातडीने थांबवण्यासाठी प्रशासन आणि डंपर चालक मालक संघटनेने पावले उचलावीत, अन्यथा शिवसेनेला यात हस्तक्षेप करून जनतेच्या जीवित रक्षणासाठी याकडे आपल्या स्टाईलने पाहावे लागेल, असा इशारा शिवसेनेचे जिल्हा सचिव किसन मांजरेकर यांनी दिला आहे.

भरघाव डंपर चालकांबाबत जिल्ह्यात अनेकांच्या तक्रारी आहेत. आज कोळंब येथे असाच एक भरघाव डंपर घराच्या अंगणात घुसला. सदर ड्रायव्हर नशेत असल्याचे समजते. जनतेच्या जीवाशी चाललेला हा धोकादायक प्रकार तातडीने थांबवण्यासाठी डंपर चालक मालक संघटना आणि प्रशासन यांनी चर्चेतून योग्य ते धोरण ठरवावे. वाहतूक वैध-अवैध हा विषय आहेच, त्याहीपेक्षा चालक वैध-अवैध पाहणे गरजेचे आहे. अनेकवेळा चालकासोबत राहून मदत करणारा क्लिनर गाडी चालवतो असे दिसून येते. अधिकृत लायसन्स नसताना हा प्रकार सुरू असतो. ड्रायव्हर नशेत असल्याने अनेक अपघात घडलेले आहेत. कित्येकवेळा डंपरवर नंबरही नसतात. असा बेधुंद कारभार सुरू असताना महसूल प्रशासन, पोलीस आणि आरटीओ याकडे दुर्लक्ष का करतात, हा प्रश्न आहे. जनतेच्या जीविताच्या प्रश्नावर प्रशासनाने तातडीने कडक कारवाई करावी आणि डंपर चालक मालक संघटनेने या वाहतुकीची योग्य काळजी वाहावी. तुमचे उद्योगधंदे आवश्यक आहेत, याचा अर्थ जनतेचे जीवित कवडीमोल आहे असे समजू नये. या प्रकरणी तातडीने कारवाई न झाल्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे या प्रकरणी तक्रार दाखल करण्यात येईल, असा सज्जड दम शिवसेनेचे सिंधुदुर्ग जिल्हासचिव किसन मांजरेकर यांनी दिला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

one + 12 =