You are currently viewing कणकवलीतील डॉ.विद्याधर तायशेट्ये यांनी स्वतःच्या संजीवनी हॉस्पिटलचा पहिला मजला केला डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर…

कणकवलीतील डॉ.विद्याधर तायशेट्ये यांनी स्वतःच्या संजीवनी हॉस्पिटलचा पहिला मजला केला डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर…

जिल्ह्यातील गाजावाजा करणारी खाजगी रुग्णालये कधी जपणार सामाजिक बांधिलकी?

विशेष संपादकीय

सिंधुदुर्ग जिल्हा गेली कित्येकवर्षे आरोग्य सुविधांच्या बाबतीत अतिशय मागासलेलाच म्हणायला हरकत नाही. कित्येक नेते, लोकप्रतिनिधी होऊन गेले, मंत्री, मुख्यमंत्री, केंद्रीयमंत्री सुद्धा झाले परंतु आरोग्य सुविधांसाठी मात्र जिल्हा गोवा, बेळगाव आणि कोल्हापूर वर अगदी झाडावरील बांडगुळासारखा अवलंबून….!
कोरोनाच्या संकटात आपल्याकडील उपलब्ध सोयीसुविधांचा वापर करत जिल्हा रुग्णालयाने कोविड-१९ चा प्रकोप उत्तमरीत्या सांभाळला, परंतु जिल्ह्यात दिवसेंदिवस वाढत असलेले कोरोनाचे आकडे पाहता जिल्हा रुग्णालयात बेड आणि सुविधा मिळणे कठीण होऊ लागले आहे. पैसा आणि परिस्थिती असूनही व्हेंटिलेटर अभावी रुग्णांना आपला जीव गमावण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.
कोरोनामध्ये प्रत्येकालाच धोका होत नाही, परंतु गंभीर आजार असणाऱ्यांसाठी कोरोना धोक्याची घंटा ठरला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात पैसे देऊनही रुग्णांना कोणत्याही खाजगी रुग्णालयात सुद्धा कोरोनाचे उपचार मिळत नाहीत. तसेच जिल्ह्यात सरकारी रुग्णालये आणि उपलब्ध डॉक्टर पाहता रुग्णांना चांगली सेवा मिळताना कठीण झाले असतानाच कणकवलीतील संजीवनी हॉस्पिटलचे डॉ.विद्याधर तायशेटे यांनी हॉस्पिटलच्या तळमजल्यावर ओपीडी सुरू ठेऊन आपल्या हॉस्पिटलचा पहिला मजला कोविड-१९ च्या रुग्णांच्या सोयीसाठी १२ बेडची व्यवस्था असणारे डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर (डिसीएचसी) करून कणकवलीतील गरजवंत रुग्णांची चांगली सोय केली आहे. त्यांच्या या कार्यात त्यांच्या सहीत कणकवलीतील सहा डॉक्टरांनी त्यांना सहकार्य केले आहे. यात त्यांचा पुतण्या डॉ.सर्वेश तायशेटे, डॉ.प्रशांत कोलते, डॉ.प्रफुल्ल आंबेरकर, डॉ.निलेश कोदे, तसेच ऑनलाईन पद्धतीने डॉ.धनश्री तायशेटे यांनी सुद्धा मोलाचे योगदान दिले आहे. कणकवलीचे आमदार वैभव नाईक यांनी हे कोविड सेंटर सुरू होण्यासाठी डॉ.तायशेटे यांच्याशी बोलून प्रयत्न केले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात नावाने आणि कार्याने, आकाराने मोठी असलेली सुद्धा काही रुग्णालये व डॉक्टर आहेत, काही कोरोनाच्या काळातही रुग्णसेवा देत आहेत, तर काही खाजगी रुग्णालये पेशंट नाकारतानाही दिसतात तर काहींनी आपले दवाखाने सुद्धा बंद ठेवण्यात धन्यता मानली आहे. स्वतःचं रुग्णालय कोविड सेंटर करण्याची तयारी इतर कुठल्याही हॉस्पिटलने अथवा डॉक्टरने दाखविली नाही. परंतु आपल्या हॉस्पिटलमध्ये कोविड सेंटर सुरू करण्याचे धारिष्ट्य डॉ. विद्याधर तायशेटे यांनी दाखविले त्यामुळे जिल्हाभरातून त्यांच्या कार्याचे कौतुक होत आहे.
डॉ. तायशेटे म्हणतात की, प्रत्येक तालुक्यात १०/१० बेडची सुविधा असणारी दोन रुग्णालये तरी व्हायला हवीत. म्हणजे खर्च करण्याची तयारी असणाऱ्यांना तरी आवश्यक सुविधा, उपचार मिळू शकतील. कोरोनावर उपचारासाठी तीन प्रकारची सेंटर अथवा हॉस्पिटल असतात. यात पहिला टप्पा लक्षणे नसून पॉझिटिव्ह असणाऱ्यांसाठी कोविड केअर सेंटर, दुसरा टप्पा मध्यम व सूक्ष्म लक्षणे असणाऱ्यांसाठी डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर. यात हॉस्पिटल चा एक भाग कोविडच्या उपचारासाठी देऊन उर्वरित रुग्णालय स्वतंत्र एन्ट्री ठेऊन ओपीडी साठी वापरता येते. तिसरा प्रकार म्हणजे डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल जिथे सर्व सुविधायुक्त उपचार असतात.
जिल्ह्यात कोविड-१९ चा प्रादुर्भाव वाढत असताना कोरोनाचे गांभीर्य ओळखून आमदार वैभव नाईक आणि डॉ. विद्याधर तायशेटे यांच्यात चर्चा होऊन डॉ. विद्याधर तायशेटे यांनी पुढाकार घेत जिल्ह्यातील पहिले खाजगी डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर आपल्या पाच सहकारी डॉक्टरांच्या मदतीने सुरू करून जिल्ह्यातील इतर रुग्णालये आणि डॉक्टरांसमोर आदर्श घालून दिलेला आहे. जिल्ह्यातील इतर तालुक्यातील खाजगी रुग्णालयांनी अशाचप्रकारे १० बेडचे जरी डिसीएच सेंटर सुरू केल्यास जिल्हा कोरोनामुक्त व्हायला वेळ लागणार नाही. फक्त गरज आहे ती सामाजिक बांधिलकी जपण्याच्या प्रामाणिक इच्छा शक्तीची….!!

प्रतिक्रिया व्यक्त करा

thirteen − 11 =