You are currently viewing इन्सुली, वेत्ये, सोनूर्ली बेकायदेशीर काळ्या दगडांच्या खाणी पैशांचे कुरण…

इन्सुली, वेत्ये, सोनूर्ली बेकायदेशीर काळ्या दगडांच्या खाणी पैशांचे कुरण…

*सूर्या उगवला की अधिकारी होतात मालामाल*

संपादकीय…

इन्सुली पासून वेत्ये,सोनूर्ली या भागात मोठ्या प्रमाणावर काळ्या दगडाचे बेकायदा उत्खनन केले जाते. मोठ्या प्रमाणावर सुरुंग स्फोट घडवून दगड फोडले जातात, त्यामुळे कित्येक घरांना तडे गेले आहेत, कित्येकांचे आर्थिक नुकसान झाले आहे, परंतु पोलीस, महसूल आणि आरटीओ या सरकारी यंत्रणांना पैशांच्या जोरावर आपल्या खिश्यात घेऊन फिरणारे खाणमालक मात्र गडगंज झाले आहेत आणि त्यांच्याच जीवावर बेकायदा धंद्यांना आणि त्याच्या बेकायदा वाहतुकीस अभय देणारे महसूल व आरटीओ चे अधिकारी मालामाल झाले आहेत. त्यामुळे शासनाचा करोडो रुपयांचा महसूल बुडत आहे. महसूल आणि आरटीओ अधिकाऱ्यांच्या अर्थपूर्ण घडामोडींमुळे क्षमतेपेक्षा जास्त वाहतूक करून शासनाला ठेंगा दाखवला जात असून २ ब्रास क्षमता असणाऱ्या ट्रक, डंपर मधून ४ ब्रास खडीची, काळ्या दगडांची वाहतूक अगदी गोवा राज्यात देखील मोठ्या प्रमाणात केली जात आहे. त्यामुळे शासनाचा महसूल बुडत असला तरी शासनाचे नोकर असणारे महसूल आणि आरटीओ अधिकारी मालामाल झाले आहेत.

गोवा राज्यात देखील या खाणींमधून मोठ्या प्रमाणात ओव्हरलोड वाहतूक केली जात असल्याने अतिरिक्त भरलेली खडी रस्त्यात पडल्याने छोट्या वाहनांचे मोठ्या प्रमाणात अपघात होत आहेत. सुर्या नामक इन्सुली येथीलच एक व्यक्ती आरटीओ ऑफीस च्या बाहेर उभी राहून ही सर्व बेकायदा वाहतूक सांभाळत असतो. आरटीओ विभागाशी सुतराम संबंध नसलेला सुर्या बेकायदा होणाऱ्या वाहतुकदारांकडून पैसे वसूल करून आपला हिस्सा बाजूला ठेऊन उर्वरित रक्कम आरटीओ अधिकाऱ्यांना देत असतो. या सूर्याची इन्सुली येथे ३.०० कोटींची मालमत्ता असून रस्त्यावर गाड्यांकडून होणाऱ्या वसुलीतून सूर्याने कमावलेली ही मालमता आहे, यावरून अधिकारी किती कोटी कमवत असतील याची झलक दिसते.

मध्यंतरी शिवसेना तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांनी तक्रार दिल्यानंतर काही दिवस हा सुर्या मावळलेला होता, परंतु प्रकरण थंड झाल्यावर सुर्या पुन्हा आपल्या ड्युटी वर हजर झाला आहे. लाईनच्या गाड्या ज्या नेहमी एका राज्यातून दुसऱ्या राज्यात वाहतूक करतात त्यांना मात्र आरटीओ लाठीवर थांबविले जाते, परंतु इन्सुली येथून ओव्हरलोड खडीची वाहतूक होत असताना देखील यांना कधीच लाल सिग्नल नसतो, त्यांच्यासाठी सूर्याचा हिरवा सिग्नल सुरूच असतो.

महेश सावंत यांनी ही ओव्हरलोड होणारी वाहतूक तक्रार देऊन थांबवली होती, परंतु काही काळ थांबल्यावर ती पुन्हा सुरू झाली आहे. इन्सुलीतील साईप्रसाद राणे यांनी २५ मे २०२० ला तक्रार अर्ज दिला होता, त्यानंतर कारवाई होत नसल्याने २४ सप्टेंबर २०२० ला पुन्हा तक्रार केल्यानंतर ही ओव्हरलोड वाहतूक काही काळ थांबली होती.

*संवाद मीडियाच्या टीमने* ही बाब निदर्शनास आल्यावर संबंधित अधिकाऱ्यांना भेटण्याचा प्रयत्न केला असता व माहिती घेतली असता, वरिष्ठांच्या परवानगी शिवाय ओव्हरलोड वाहतुकीवर झालेल्या कारवाईबाबत माहिती देता येत नसल्याचे सांगण्यात आले. चित्रीकरण सुरू असताना एका कर्मचाऱ्याने तिथे असलेली एक मोटारसायकल लपविण्याचा प्रयत्न केला. चौकशीअंती सदर मोटारसायकल आरटीओ विभागाचे वसुली करण्याचे काम करणाऱ्या सुर्या नामक व्यक्तीची असल्याचे समजले. ओव्हरलोड माल वाहतुकीचे चित्रीकरण सुरू असतानाच आरटीओ ऑफिस मधून गेलेल्या फोन मुळे तात्काळ ओव्हरलोड वाहतूक थांबविण्यात आली, पत्रकार आलेत गाड्या सोडू नका अशा सूचना देण्यात आल्या, एवढे स्ट्रॉंग नेटवर्क आरटीओ, महसूल आणि बेकायदा उत्खनन व वाहतूक करणाऱ्या खाण मालकांचे आहे. सगळ्यांचेच हात बांधलेले असल्याने महसूल व आरटीओ अधिकाऱ्यांकडून या बेकायदा खडी, दगड वाहतुकीस अभय मिळत आहे.

महसुल व आरटीओ अधिकाऱ्यांच्या खाण मालकांना हात ओले करून घेऊन अभय देण्यामुळे सरकारचे मात्र करोडोंचे नुकसान होत आहे. वरिष्ठ अधिकारी त्यांच्या चेल्यांकडून होणाऱ्या भ्रष्टाचारावर कारवाई करणार का? असा प्रश्न आज सर्वसामान्य लोकांना पडू लागला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

1 × four =